Menu Close

पॅलेस्टाईन आणि चीन यांच्याविषयी भारताने स्पष्ट भूमिका घेऊन इस्रायलच्या बाजूने उभे रहायला हवे ! – सुशील पंडित, संस्थापक, ‘रूट्स इन कश्मीर’

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांतर्गत ‘जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने जात आहे का ?’ या विषयावर विशेष चर्चासत्र

सुशील पंडित

पुणे – इस्रायलने कारगिल युद्धाच्या वेळी भारताला युद्धसामुग्री देऊन साहाय्य केले होते, हे आपण कधीही विसरता कामा नये; पण आज इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धात आपण पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहोत, ही मित्राची उपेक्षा कशासाठी ? याच पॅलेस्टाईनने काश्मीरच्या विषयावर सतत भारताच्या विरोधात मतदान केले आहे. काश्मीरमधील जिहादी हिंसाचाराचे समर्थन केले आहे. तो कधीही आपल्या बाजूने उभा राहिलेला नाही. चीनविषयीही आपले धोरण स्वातंत्र्यकाळापासून चुकत आले आहे. भारताचे भूभाग गिळंकृत केल्यावरही आपण चीनकडे मित्रत्वाच्या नात्याने का पहातो ? आपण चीनला का खडसावत नाही ? याविषयी अमेरिकेचे माजी सचिव माईक पॉम्पिओ यांनी ‘भारताने स्पष्ट भूमिका न घेतल्यास चीन वरचढ होईल’, असे सार्वजनिकरित्या सांगितले होते. त्यामुळे भारताने पॅलेस्टाईन आणि चीन यांविषयी सावध नव्हे, तर स्पष्ट भूमिका घ्यावी अन् इस्रायलच्या बाजूने उभे रहायला हवे, असे परखड प्रतिपादन ‘रूट्स इन कश्मीर’चे संस्थापक श्री. सुशील पंडित यांनी केले. ‘हिंदु जनजागृती समिती’ने आयोजित केलेल्या ‘जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने जात आहे का ?’, या ‘ऑनलाईन’ चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात ‘युटोपिया कन्सल्टिंग’चे संस्थापक, लेखक आणि राजकीय सल्लागार श्री. निशिथ शरण, भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आदी मान्यवर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. बळवंत पाठक आणि श्री. चैतन्य तागडे यांनी केले.

हा कार्यक्रम यू ट्यूब आणि ट्विटर यांद्वारे १२ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिला.

‘कोरोना विषाणूद्वारे जैविक युद्ध कसे लढायचे ?’, यावर चीनकडून केले जाणारे प्रयोग ही तिसर्‍या महायुद्धाची नांदी ! – निशिथ शरण, ‘युटोपिया कन्सल्टिंग’चे संस्थापक, लेखक आणि राजकीय सल्लागार

निशिथ शरण

‘सार्क’मध्ये (दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनेमध्ये) स्थापन केलेल्या समितीने चिनी सरकारकडे २४ शोधनिबंध सादर केले होते. ती कागदपत्रे आता बाहेर येत आहेत. ‘चीन वर्ष २००५ पासून जैविक अस्त्र-शस्त्रांची निर्मिती करण्यामागे होता’, असे त्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. त्यात ‘कोरोना’ विषाणूचाही उल्लेख आहे. त्यामुळे ‘चीन हा गेल्या काही वर्षांपासून जैविक अस्त्रांच्या निर्मिती प्रक्रियेत होता’, हे लक्षात येते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा कोरोना विषाणूचा ‘चिनी व्हायरस’ असा उल्लेख करायचे, तेव्हा त्यावर पत्रकारांकडून आक्षेप घेतला जात होता. बहुतेक सर्वच राष्ट्रांना कोरोना ही चीनची निर्मिती असल्याचे ठाऊक आहे; मात्र कुणीही उघडपणे हे मान्य करण्यास सिद्ध नाही. जागतिक महासत्ता होण्यासाठी अमेरिकेनंतर चीन प्रयत्नशील आहे. त्यामुळे तो ‘कोरोना विषाणूद्वारे जैविक युद्ध कसे लढायचे ?’, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयोग करत आहे. ऑस्ट्रेलियाचे सॅरी मॅक्सन हे याविषयी विस्तृत पुस्तक लिहित आहेत. ‘पहिले युद्ध रासायनिक आक्रमणाद्वारे, दुसरे महायुद्ध आण्विक अस्त्रांद्वारे लढले गेले, तर तिसरे युद्ध हे जैविक स्वरूपात होण्याची दाट शक्यता आहे’, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे ‘तिसरे महायुद्ध चालू झालेलेच आहे’, असे म्हणता येईल.

युद्धकाळात देशांतर्गत सुरक्षेसाठी भारतियांना सैनिक होऊन लढावे लागेल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सध्याची एकूण परिस्थिती पहाता ‘तिसरे महायुद्ध चालू झालेलेच आहे’, असे वाटते. या युद्धाच्या प्रसव वेदना जाणवू लागल्या आहेत. आज आपण नागरिक नव्हे, तर सैनिक समजून स्वत:सह देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर व्हायला हवे. युद्धकाळात देशांतर्गत सुरक्षेसाठी भारतीय नागरिकांना सीमेवरील सैन्यांप्रमाणे सैनिक होऊन लढावे लागणार आहे. त्यामुळे येणार्‍या संकटापूर्वी आपण प्रशिक्षित होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथमोपचार आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यातून स्वत:सह गावातील नागरिक, पोलीस आणि सैनिक यांना साहाय्य करू शकतो. देशातील नागरिकांनी एकत्र येऊन संघटितपणे देशाच्या रक्षणासाठी उभे रहाणे, हा भाग कर्तव्य समजून केला पाहिजे. देशभक्त आणि धर्मनिष्ठ असणारे, तसेच ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) भावना जागृत करण्याची इच्छा असणारेच स्वत:सह कुटुंब, राष्ट्र आणि धर्मपरायण सत्त्वगुणी लोक यांचे रक्षण करतात. संकट कितीही मोठे असू दे, ते अंतर्गत असो किंवा बाहेरचे असो, त्याचा विरोध करण्यासाठी स्वत: सक्षम होऊया. युद्धकाळात अनेक गोष्टी मिळत नाहीत; म्हणून औषधे, पाणी, अन्न, वीज आदींची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी लागेल. याची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी सनातन संस्थेने ९ भाषांमध्ये ‘आपत्कालीन सुरक्षा’ नावाचे ‘अँड्रॉईड ॲप’ चालू केलेले आहे.

भारत-पाक युद्ध झाल्यास भारतातील पाक समर्थक दंगली करू शकतात ! – अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

अनिल धीर

इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध चालू झाल्यावर इस्रायलमधील अरबी लोकांनी दंगली चालू केल्या. भारत-पाक युद्ध झाल्यास भारतातही असे होऊ शकते; कारण भारतात अनेक संवेदनशील क्षेत्रे आहेत. भारतातील या स्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या देशात असे काही लोक आहेत की, ते इस्लाम आणि पाकिस्तान यांचे समर्थन करतात. युद्ध चालू झाल्यावर आपल्याला सीमेवर आणि अंतर्गत अशा दोन्ही स्तरांवर युद्ध करावे लागेल. आपण बंगाल आणि केरळ राज्यांतील हिंसक घटनांवरून अद्याप शिकलेलो नाही. यावर राष्ट्रीय धोरण निश्चित करायला हवे. पाकिस्तान घुसखोर भारतात कुठपर्यंत पोचले आहेत, हे विविध प्रसंगांतून दिसून येते. यावर कुणीही कायमस्वरूपी उपाय काढण्याचा प्रयत्न करत नाही. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर उपाययोजना काढून त्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे. नुकताच पंजाबमधील काँग्रेस सरकारने तेथील एक जिल्हा ‘मुस्लिमबहुल’ म्हणून स्वतंत्र घोषित केला. ही घटना दुर्दैवी आहे. बहुसंख्य मुस्लिम म्हणून वेगळा जिल्हा घोषित करणे, हा संदेश समाजात वेगळेपण निर्माण करणारा आहे. यातून पुढे अशा प्रकारची मागणी अन्य राज्यांतून आल्यास पुढे ते घातक ठरू शकते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *