फेसबूककडून हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संघटना यांच्या पानांवर घातलेल्या बंदीचा राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांच्याकडून ट्विटरवरून विरोध !
मुंबई – गेल्या काही मासांमध्ये फेसबूकने हिंदुत्वाचा प्रसार करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. फेसबूकने आतापर्यंत सनातन संस्था, सुदर्शन टीव्ही, सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार टी. राजासिंह आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या पानांवर बंदी घातली आहे. आता सनातन प्रभात, सनातन शॉप तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून राष्ट्र आणि धर्म यांसाठी चालवण्यात येणारी पानेही बंद करण्यात आली आहेत. दुसरीकडे जिहाद आणि समाजात द्वेष पसरवणारे डॉ. झाकीर नाईक, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, रझा अकादमी आदींची पाने चालू ठेवली आहेत. यातून फेसबूकचा हिंदुद्वेष दिसून येत आहे. यामुळेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्याकडून ट्विटरवर #Facebook_Targets_HJS हा हॅशटॅग ट्रेंड करून विरोध करण्यात आला. हा ट्रेंड काही काळातच राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तिसर्या क्रमांकावर होता. याद्वारे धर्माभिमान्यांनी या संघटनांच्या आणि नेत्यांच्या पानांवरील बंदी हटवण्याची मागणी फेसबूककडे केली. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हापर्यंत या ट्रेंडवर ४५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या होत्या. हिंदु जनजागृती समितीकडून या अन्यायाच्या विरोधात ऑनलाइन अभियानही चालवण्यात येत आहे.