मोदी सरकारने ‘फेसबूक’ला पर्याय स्वदेशी अॅप विकसित करावे ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगणा
आज देशातील हिंदुत्ववादी संघटनांना सोशल मिडिया चालवणार्या विदेशी आस्थापनांकडून लक्ष्य केले जात आहे. फेसबूककडून त्यांची पाने बंद केली जात आहेत, तर ट्विटरकडूनही भारताच्या उपराष्ट्रपतींचे, तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अधिकृत खात्याचे ‘ब्ल्यू टीक’ काढले जाते. ‘सुदर्शन न्यूज’सारख्या वाहिनीचेही पान बंद केले जाते. मी लोकप्रतिनिधी असतांनाही माझे फेसबूकवर खाते उघडण्यावर बंदी घातली गेली आहे. दुसरीकडे आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा डॉ. झाकीर नाईक, हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे अकबरूद्दीन ओवैसी, पाकिस्तानमधील अनेक आतंकवादी संघटना यांची मात्र फेसबूक, ट्वीटर आदि समाजमाध्यमांवरील खाती राजरोसपणे चालू आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली, तरी आपल्यावर विदेशी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य करीत आहेत. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, आपण कधीपर्यंत विदेशी ‘फेसबूक’ला हजारो कोटी रुपये कमवून देणार आहोत ? ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर भारत सरकारने फेसबूकप्रमाणे स्वदेशी अॅप विकसित केले पाहिजे, असे आवाहन भाजपचे तेलंगणा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले.
‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘फेसबूकचा हिंदुद्वेष’, या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त ते बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर 8,684 लोकांनी पाहिला. या विषयावर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन ट्विटरवर #Facebook_Suppress_Hindu_Voices या नावाने चालवलेल्या टे्रंडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात 72 हजार ट्वीटस् करून नागरिकांनी फेसबूकचा निषेध केला. फेसबूकवरील या अन्याय बंदीच्या विरोधात 5 हजार लोकांनी ऑनलाईन पिटीशन साईन केली.
आता फेसबूकवरच भारत सरकारने बंदी आणावी ! – सनातन संस्था
या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले की, ‘टाइम’सारख्या विदेशी प्रसिद्धीमाध्यमाने अहवाल दिला म्हणून फेसबूकने सनातन संस्था, सनातन प्रभात, सनातन शॉप यांच्यासह अनेक फेसबूक पाने बंद केली आहेत. कोणतेही ठोस कारण नसतांना भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात हस्तक्षेप करून अशा प्रकारे निवडक पाने बंद केली जात असतील, तर फेसबूकवरच सरकारने बंदी आणावी, अशी आमची मागणी आहे.
या वेळी बोलतांना ‘भारत जागृती सोशल नेटवर्कींग ग्लोबल साईट’चे संस्थापक श्री. भारत भूषण म्हणाले की, केवळ हिंदु धर्माचा प्रसार करणार्या पानांना प्रतिबंधीत गेले जाते, दुसरीकडे ख्रिस्त्यांच्या चंगाई सभेची पाने विना अडथळा धर्मांतराचे काम करत आहेत. ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, डेटाचोरीप्रकरणी अमेरिकी न्यायालयात दंड भरून माफी मागणारे फेसबूकचे मार्क जुकेरबर्ग यांनी प्रथम लष्कर-ए-तोयबापासून अनेक आतंकवादी, नक्षलवादी यांची चालू असलेली फेसबूक खाती बंद करण्याची हिंमत दाखवावी ! भारतात पैसे कमवण्यासाठी आलेली विदेशी आस्थापने आमच्या विचार-लेखन स्वातंत्र्यावर बंदी कशी काय आणू शकतात ?