Menu Close

पुस्तकाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर इंडियन एक्सप्रेस समूह कारवाई करणार का ?

हिंदु जनजागृती समिती चा इंडियन एक्सप्रेस समूहाला प्रश्न

आपल्या वृत्तपत्र समूहातील ‘लोकसत्ता’ या मराठी दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात महाराष्ट्राच्या इतिहासात मानाचे स्थान असणारे छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह तुलना करतांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अनेक आक्षेपार्ह बाबी प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी गादीसाठी रक्तपात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. सध्या कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे लोकांमधील संतापाचा उद्रेक दिसत नाही; मात्र तो सुप्त अवस्थेत खदखदत आहे. कोल्हापूर येथील छत्रपती गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे संपादक असल्याने त्यांची वैचारिक भूमिका ही एकप्रकारे लोकसत्ता समूहाची आहे; कारण एखाद्या बुद्धीवाद्याची वैचारिक भूमिका ही कार्यालयीन वेगळी आणि वैयक्तिक वेगळी असे असू शकत नाही. तरी गिरीश कुबेरांच्या सदर पुस्तकातील विचारांचे लोकसत्ता समर्थन करणार आहे का ? हे आपण स्पष्ट केले पाहिजे.

संपादक हा दिशादर्शक असतो. समाजातील व्यासपिठावर गेल्यावर तो त्या दैनिकाचा संपादक म्हणूनच भूमिका मांडत असतो. अशा वेळी त्या वादग्रस्त पुस्तकातील भूमिका स्वतंत्र म्हणता येणार नाही. यापूर्वीही मदर तेरेसा यांच्या संदर्भात श्री. कुबेर यांनी लिहिलेल्या संपादकीयाच्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. त्या तुलनेत छत्रपती संभाजी महाराज हे तर महाराष्ट्रातील अधिक वंदनीय महापुरुष आहेत.

आपल्या वृत्तपत्राने समाजहिताची भूमिका घेत भ्रष्टाचार करणार्‍यांना उघडे पाडले आहे, तर आक्षेपार्ह पुस्तक लिहून वैचारिक भ्रष्टता पसरवण्याच्या विरोधातही आपण स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, अशी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची मागणी आहे ! या विषयी लोकसत्ताने कोणतेही मत व्यक्त न केल्यास महाराष्ट्रातील मराठी जनता आणि वाचक त्याला आपले समर्थन समजून निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत, हे आपण लक्षात घ्यावे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *