Menu Close

युवा साधकांनी प्रत्येक कृती साधना आणि धर्माचरण म्हणून करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरीय ‘ऑनलाईन’ युवा साधक सत्संगाचे आयोजन

पू. रमानंद गौडा

कर्नाटक – येणार्‍या भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी आपल्याला साधनेचा वेग वाढवून गुरुकृपा संपादन केली पाहिजे. सध्या अनेक मुले अनावश्यक वेळ वाया घालवतात. त्यांनी स्वतःकडील कौशल्य साधनेसाठी वापरले पाहिजे. तसेच साधनेत पुढचे पुढचे मार्गदर्शन मिळण्यासाठी नियमितपणे सत्संगाला जोडले पाहिजे. आपण सर्वजण हिंदु राष्ट्राची भावी प्रजा आहोत. त्यामुळे आपली प्रत्येक कृती साधना आणि धर्माचरण म्हणून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरु-शिष्य परंपरा ही भारताने जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. गुरु शिष्याचा उद्धार करतात. आपल्या जीवनातही श्रेष्ठ गुरु लाभले आहेत, हे आपले परमभाग्य आहे. आपण सर्वजण अशा गुरूंची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटकमधील युवा साधकांसाठी पू. रमानंद गौडा यांनी नुकतेच ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ ३०८ हून अधिक युवा आणि बालसाधकांनी घेतला. या मार्गदर्शनामुळे सर्व युवा साधकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून अधिकाधिक साधना आणि धर्मकार्य करण्याचा त्यांनी निश्चय केला.

अभिप्राय !

 कु. प्रणिता उप्पर, जिल्हा धारवाड – साधना म्हणजे काय, ते समजले होते; परंतु कृती होत नव्हती. आम्ही मार्ग चुकलो, तरी गुरुदेव त्याच क्षणी आमचा हात धरून पुन्हा आम्हाला साधनेच्या मार्गावर आणून ठेवतात, हे लक्षात आले.

कु. ऐश्वर्या, उजिरे, दक्षिण कन्नड – मार्गदर्शनातील प्रत्येक विषयाचे महत्त्व समजले. ‘आपण करत असलेली व्यष्टी आणि समष्टी साधना भावपूर्ण केली पाहिजे’, असे वाटले. या सत्संगाने पुष्कळ भावजागृती झाली.

कु. सौम्या के. पुत्तुरु, दक्षिण कन्नड – आजच्या सत्संगात भगवंताचे स्मरण कसे करावे, तसेच पुढे येऊ घातलेल्या आपत्काळाविषयी काय करावे, यांविषयी चांगले मार्गदर्शन मिळाले. त्याप्रमाणे कृती करण्याचा मी अधिकाधिक प्रयत्न करीन.

कु. बालाजी आणि अपूर्वा, हासन – संतांचे मार्गदर्शन अमूल्य होते. ते आम्हाला लाभले, ही आमची पूर्वजन्मीची पुण्याई आहे. या जन्मात करत असलेल्या चुका आमच्या साधनेत हानीकारक ठरत आहेत, हे लक्षात आले. अधिक सेवा करण्यासमवेत व्यष्टीकडे लक्ष दिले पाहिजे, असे वाटते.

कु. अमरनाथ हुळिपल्लेद, बादामी – मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात आले. ‘पू. अण्णांच्या मार्गदर्शनातील प्रत्येक सूत्र जीवनात लागू केले पाहिजे’, असे वाटले.

कु. रागिणी, शिकारीपूर – पू. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे मला या मनुष्यजन्मात मोक्षप्राप्ती करून घ्यायची आहे. सध्या आपत्काळात सर्व हिंदूंची एकजूट होण्यासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ‘आपण सर्वांनी सेवा केली पाहिजे’, असे वाटले.

कु. मंजुनाथ उप्पार, हळियाळ – देवावरील श्रद्धा आणि भक्ती वाढवली पाहिजे, याचे महत्त्व लक्षात आले. मी नामजपादी उपायही वाढवणार आहे.

वैशिष्ट्यपूर्ण !

हा सत्संग, म्हणजे अंतर्यामी गुरुदेवांनी दैवी जिवांना मायेच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी संतांच्या माध्यमातून रचलेली दैवी लीलाच होती. ईश्वर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पुढच्या पिढीला सिद्ध करत आहे, हे या सत्संगातून लक्षात आले, असे सहभागींनी सांगितले.

एका युवा साधकाची सत्संगाच्या दिवशी दुपारी ३ वाजता परीक्षा होती; परंतु त्याला सत्संगात सहभागी होण्याची तीव्र इच्छा होती. त्याला प्रार्थना करण्यास सांगितल्यावर त्याने तसे केले. आदल्या रात्री ‘उद्या परीक्षा सायंकाळी ५.३० वाजता आहे’, असे त्याला समजले. त्या साधकाला सत्संगही लाभला आणि परीक्षेलाही बसता आले.

क्षणचित्रे

मार्गदर्शनासाठी ८० टक्के युवा साधक वेळेत उपस्थित होते.

युवा साधक पू. रमानंददादांनी सांगितलेल्या सूत्रांना ‘चॅट बॉक्स’द्वारे तत्परतेने प्रतिसाद देत होते.

मनोगत व्यक्त करतांना प्रत्येक जण मार्गदर्शनात सांगितलेल्या सूत्रांमधून काय शिकायला मिळाले, हे सांगत होता. यावरून प्रत्येकाने सूत्रे मनापासून ऐकल्याचे आणि प्रतिसाद दिल्याचे लक्षात आले.

धर्मकार्यात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांचे अभिप्राय घेण्यासाठी एक ‘गूगल फॉर्म’ देण्यात आला होता. त्याची ‘लिंक’ पाठवल्यावर ५ मिनिटांमध्ये ३४ युवा साधकांनी आणि ५ घंट्यांत २५० युवा साधकांनी ‘गूगल फॉर्म’ भरला.

मार्गदर्शनानंतर अनेक युवा साधक विविध प्रकारच्या सेवा करण्यासाठी, तसेच सेवा शिकण्यासाठी आणि युवा साधकांच्या सत्संगाला येण्यासाठी उत्सुक असल्याचे लक्षात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *