Menu Close

देशात धर्माधिष्ठित राज्य निर्माण होण्यासाठी प्रतिदिन समाजाचे प्रबोधन करायला हवे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

जळगाव – बलोपासनेमुळे भक्त सत्त्वगुणी आणि नंतर गुणातीत होतो; मात्र सत्त्व गुणाकडे जाण्यासाठी प्रतिदिन साधना करून साधक व्हायला हवे. प्रतिदिन नामजप आणि साधनेचे प्रयत्न करून आपल्यातील दोष आणि अहं यांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. असे केल्याने संकटकाळी देवाचे विचार ग्रहण करण्यास साहाय्य होईल. ईश्वराचा भक्त होण्यासाठी साधनेचे बळ असणे आवश्यक असते. तसेच मनोबल वाढण्यासाठी आणि चांगला शिष्य ते चांगला भक्त होण्यासाठी आपण साधनेचे झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. साधनेनेच व्यक्तीमध्ये व्यापकता येऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. देशात धर्माधिष्ठित राज्य निर्माण होण्यासाठी प्रतिदिन समाजाचे प्रबोधन करायला हवे. त्यासाठी अधिकाधिक ठिकाणी धर्माचा प्रसार करायला हवा, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते धर्मप्रेमींसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र शौर्यजागृती शिबिरा’त मार्गदर्शन करत होते. या शिबिरामध्ये विविध जिल्ह्यांतील ६३५ धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या शिबिराचे सूत्रसंचालन रत्नागिरी येथील कु. नयना दळवी आणि संभाजीनगर येथील कु. शताक्षी देशपांडे यांनी केले. या शिबिरात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले.

बलोपासनेत आत्मविश्वास आणि प्रतिकारक्षमता निर्माण करण्याचे सामर्थ्य ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

समर्थ रामदासस्वामी यांनी भक्ती आणि शक्ती यांचा संगम होण्यासाठी बलोपासना चालू केली. याद्वारे बलाचा परिणामकारक उपयोग करून शरीर प्रतिकारक्षम कसे करायचे ? हे समजते. बलोपासनेत आत्मविश्वास आणि प्रतिकारक्षमता निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. तसेच यात शिकवलेल्या व्यायाम प्रकारांनी शारीरिक बळ वाढते. शारीरिक बळ वाढवण्यासह मनाचे बळही वाढवायला हवे. त्यासाठी मनात येणार्‍या प्रतिक्रियांचा अभ्यास करायला हवा. आपण विवेकी विचार करून प्रामाणिकपणे कृती करायला हवी. तसेच आध्यात्मिक दृष्टीकोनातून मनाची स्थिरता आणि आत्मिक बळ वाढवायला हवे. स्वरक्षण ही एक विद्या असून तिचा योग्य वेळी उपयोग व्हायला हवा.

गावागावांत हिंदूंचे संघटन उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

आपण सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. यासाठी नियोजनबद्ध धर्मकार्य करून गावागावांत हिंदूंचे संघटन उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीत खारीचा नव्हे, तर हनुमंताचा आणि सिंहाचा वाटा उचलण्याची वेळ आता आली आहे. यासाठी सर्वांच्या योगदानाची आवश्यकता आहे.

धर्मप्रेमींचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. राजेश घुगे, नाशिक – शिबिरातील मार्गदर्शन उत्साहवर्धक होते. हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्वप्न साकार करण्यासाठी काय करायला हवे ? हे शिबिरामधून समजले.

२. हेमा दिवाकर – हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य संघटितपणे करण्यासाठी मित्र-मैत्रिणी, नातेवाइक, शेजारी आणि ओळखीचे यांना स्वरक्षणाविषयी माहिती सांगणार.

३. गणेश भोसले – शिबिरातील मार्गदर्शन ऐकल्यानंतर भाव जागृत झाला. हिंदु राष्ट्राचा विषय सहजतेने आकलन झाला. हिंदु राष्ट्र येण्यासाठी कोणती सिद्धता करायला हवी ? त्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये कुठे कमी पडतो आणि कोणते प्रयत्न वाढवायला हवेत ? हे लक्षात आले.

४. दीपक वाघ, नाशिक – छोट्या छोट्या कृतींमधून धर्मकार्यात कसे सहभागी होता येते ? हे अनेक उदाहरणांतून लक्षात आले. मी स्वत:च्या दोषांवर ताबा मिळवण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया गांभीर्याने राबवेन. यापुढे साधना आणि बलोपासना करण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणार.

५. साक्षी दडगल, अकोला – समष्टी साधना कशी करावी ? तसेच हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ? हे शिबिराच्या माध्यमातून लक्षात आले. शिबिरातील मार्गदर्शन ऐकून शक्ती आणि स्फूर्ती मिळाली. श्रीकृष्णच सर्वांना मार्गदर्शन करत असून स्वतःसमवेत इतरांनाही स्वरक्षणासाठी प्रशिक्षित करायला हवे, हे लक्षात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *