हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात ‘ऑनलाईन वक्ता-प्रवक्ता शिबिरा’चे आयोजन !
पुणे – आज हिंदु धर्मावर तथाकथित पुरोगामी, नास्तिकतावादी आणि बुद्धीवादी असे अनेक जण टीका करत आहेत. हिंदु धर्मातील श्रद्धा आणि परंपरा यांवर आक्षेप घेऊन धर्माची अवहेलना करत आहेत. हे रोखण्यासाठी आणि ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी अन् धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूने वक्ता-प्रवक्ता होणे आवश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले. समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी आयोजित ‘ऑनलाईन वक्ता-प्रवक्ता शिबिरा’चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या शिबिराला पुणे शहर, हडपसर, भोर, शिरवळ आणि पिंपरी-चिंचवड येथील अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. या वेळी श्री. घनवट यांनी ‘आदर्श वक्ता होण्यासाठी आपण नियमित अभ्यास करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’, तसेच ग्रंथांचे वाचन करणे, चालू घटनांचा तत्परतेने अभ्यास करणे, श्रोत्यांना सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे’, असेही सांगितले. हे संपूर्ण शिबिर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये निर्विघ्नपणे पार पडले.
विशेष
शिबिराच्या पहिल्या सत्रात धर्मप्रेमींनी त्यांना दिलेले विषय अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे मांडले. दुसर्या सत्रात ‘कुंभमेळा हा मरकज झाला आहे का ?’ आणि ‘सामाजिक संकेतस्थळावरून हिंदु धर्म, देवता आणि धर्मग्रंथ यांचा होणारा प्रचार आणि विडंबन’ यावर धर्मप्रेमींची ‘ऑनलाईन’ गटचर्चा घेण्यात आली.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. धर्मप्रेमींनी शिबिरात विषय मांडल्यावर त्यामध्ये त्यांना सुधारणा सांगण्यात आल्या. त्या वेळी धर्मप्रेमींनी त्या मनापासून स्वीकारल्या. यातून त्यांची धर्मकार्य करण्याची तळमळ दिसून आली.
२. शिबिरापूर्वी धर्मप्रेमींना पाऊस आणि इंटरनेट यांच्या अडचणींना सामोरे जावे लागले; परंतु धर्मप्रेमींची तळमळ अधिक असल्याने ते सर्वजण अडचणींवर मात करून शिबिरामध्ये मनापासून सहभागी झाले.
३. श्री. सुनील घनवट यांच्या मार्गदर्शनानंतर सर्वांनी ‘आम्ही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आदर्श वक्ता बनण्यास सिद्ध आहोत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आतापासून प्रयत्नांना प्रारंभ करू’, असे उत्स्फूर्त अभिप्राय दिले.
धर्मप्रेमींचा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद
‘आदर्श वक्ता होण्यासाठी आपण पूर्वसिद्धता आणि प्रत्यक्ष सिद्धता कशी करायला हवी, तसेच मार्गदर्शन झाल्यानंतर स्वतःचा कसा आढावा घ्यायला हवा’, याविषयीची पद्धत श्री. सुनील घनवट यांनी प्रभावीपणे धर्मप्रेमींसमोर मांडली. तसेच त्यांनी ‘आपल्याला केवळ वक्ता व्हायचे नसून साधक वक्ता, शिष्य वक्ता व्हायचे आहे’, असे सांगितल्यावर सर्व धर्मप्रेमींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच शिबिर झाल्यानंतर चांगला वक्ता होण्यासाठी आवश्यक सिद्धता लगेच करण्याचा सर्वांनी निश्चय केला. याचसमवेत सर्वांची नियमितपणे पाक्षिक बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले.