सांगली – औरंगजेबासारख्या मोगल बादशहाने अनेक प्रयत्न करूनही पंढरीची आषाढी यात्रेची परंपरा बंद पडू शकली नाही. ती परंपरा मोडण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. कोरोनासारख्या आजाराशी लढा देण्यासाठी समाजाला मानसिक बळ देण्याचे सामर्थ्य असलेल्या आषाढी वारीसारख्या परंपरा या वर्षी चालू करण्याची अनुमती आघाडी सरकारने द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ह.भ.प. निशिकांत शेटे महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, ‘कोणत्याही जिवाचा न घडो मत्सर’ अशी भागवत धर्माची शिकवण आहे. या शिकवणीनुसार वारकरी संप्रदायाने राज्य सरकारचा निर्णय स्वीकारून गेल्या वर्षापासून वारी, तुकाराम बीज, भजन, कीर्तन, प्रवचन यांसारखे आध्यात्मिक कार्यक्रम साजरे केले नाहीत. नाम चिंतनाने शारीरिक आणि मानसिक व्याधींशी लढण्याचे मोठे बळ मिळते, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. सध्याच्या घडीला औषधोपचारासमवेतच समाजाला मानसिक आधाराची आवश्यकता आहे. आता समाजाचे अन्य व्यवहार हळूहळू पूर्ववत् होत आहेत. अशा स्थितीत आषाढी यात्रेसारखी परंपरा खंडित करू नये, अशी विनंती सातत्याने होते आहे. त्यामुळे सरकारने ही मागणी मान्य करावी, अशी मागणी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात येत आहे.