मुंबई : कन्हैया कुमारचा गळा दाबणारे लोक भारत माता की जय म्हणणार नाही, अशी उद्दाम भाषा करणार्या ओवैसीचा गळा दाबण्याचे धाडस दाखवणार का ?, पठाणकोटचा सूड घेऊ, असे आमचे संरक्षणमंत्री सांगतात; पण पाकिस्तानचा गळा दाबण्याचे धाडस दाखवणार आहात का ? असे अनेक प्रश्न देशात विचारले जात आहेत; तेच प्रश्न शिवसेनेने भाजपला विचारले आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्यावर पुण्याला जात असतांना विमानात झालेल्या आक्रमणाच्या कथित घटनेवर शिवसेनेने त्यांचे मुखपत्र असलेल्या सामनातील संपादकीयातून हे प्रश्न विचारले आहेत.
संपादकीय मधील काही सूत्रे,
१. पंतप्रधान मोदी जगभ्रमंती करत आहेत; पण दुष्काळग्रस्त मराठवाड्यात का फिरकले नाहीत ? हा प्रश्न कन्हैयाने विचारला आहे. कन्हैयाची पंतप्रधानांवरील टीका आम्हाला मान्य नाही.
२. हिंदुस्थानची जनता दुष्काळाने होरपळत आणि तहान-भुकेने तडफडत असतांना मोदी यांनी स्वदेशात राहून जनतेची फिकीर करावी, या लोकभावना आहेत.
३. महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांतील २५६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असून तेथील तब्बल ३३ कोटी जनता दुष्काळाच्या फेर्यात तडफडत आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दोनेक दिवस काढले असते, तर बरे झाले असते.
४. सध्या त्यांचे निवडणूक दौरेही जोरात आहेत. आसाम, बंगाल मध्येही मोदीसाहेब प्रचार सभा घेत आहेत; पण महाराष्ट्राचा आक्रोश ऐकून ते येथे पोहोचू शकले नाहीत, हे दु:ख मराठवाड्याच्या मनात खदखदत आहे आणि कन्हैया कुमारसारख्या टिनपाटांना त्यामुळे बोलायला विषय मिळाला आहे.
५. पंतप्रधान यांच्यावर टीका करावी, अशी लायकी कन्हैयाची नाही; पण कन्हैयाची मूर्ती घडवून त्यात राजकीय प्राण फुंकणारे कोण, याचे आत्मपरीक्षण भाजपने केले, तर बरे होईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात