नागपूर येथे आयोजित ४ दिवसांच्या योग कार्यशाळेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मार्गदर्शन !
रामटेक (नागपूर) – मार्च २०२० पूर्वी कुणी सांगितले असते की, येणार्या काळात जग एका असाध्य रोगाने ग्रासले जाईल आणि जगभरातील कार्य ठप्प होईल, तर कुणीही विश्वास ठेवला नसता; मात्र आज ती भयावह स्थिती आपण अनुभवत आहोत. भविष्यवेत्ते, संत आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले या सर्वांनी सांगितले की, येणारा काळ कठीण आहे. महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे. आपत्काळात तणाव वाढतो. स्वयंसूचना दिल्यास तो घालवता येतो. तणावमुक्तीसाठी साधनेविना पर्याय नाही, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले. येथील ताई गोळवलकर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ४ दिवसांच्या योग कार्यशाळेच्या प्रथम दिवशी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन डॉ. चंद्रमोहन सिंह यांनी, तर आभार डॉ. राहुल हँगर यांनी केले. प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी कार्यशाळेसाठी पुढाकार घेतला होता. १०० हून अधिक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
राष्ट्र-धर्मावर होणारे आघात दूर करण्यासाठी प्रत्येकाने दिवसातील २ घंटे राष्ट्र-धर्मकार्यासाठी द्यावेत ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती
१. आज न्याय, बंधुता आणि समता कुठे आहे ? राज्यघटनेतील कलम २८ आणि २९ हे अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करते. त्यांना धर्माचे शिक्षण घेण्यास बंधने नाहीत; पण राज्यघटनेतील कलम ३० हे हिंदूंना त्यांच्या शाळांमधून धार्मिक शिक्षण देण्यास निर्बंध घालते. राष्ट्र-धर्मावर होणारे आघात दूर करण्यासाठी प्रत्येकाने दिवसातील २ घंटे राष्ट्र-धर्मकार्यासाठी द्यावेत.
२. भारतात आजही शहर, गाव आणि चौक अशा ७०४ ठिकाणी मोगल आक्रमकांची नावे दिलेली आहेत. या दुःस्थितीला शिक्षणव्यवस्था, धर्मशिक्षणाचा अभाव आणि बेगडी धर्मनिरपेक्षता कारणीभूत आहे.
३. विमानांचा शोध राईट बंधूंच्या आधी महर्षि भारद्वाज यांनी लावला. प्लास्टिक सर्जरीचा शोध महर्षी सुश्रुत यांनी, तर गुरुत्वाकर्षणाचा शोध आचार्य भास्कराचार्य यांनी लावला. महर्षि कणाद हे परमाणू शास्त्राचे जनक होते.
४. आजची युवा पिढी पाश्चात्त्य संस्कृतीच्या अधीन झाल्याने त्यांचे आदर्श म्हणजे चित्रपटातील नायक किंवा नायिका असतात. मागील ७४ वर्षांत प्रेरणा देणारे एकही असे आदर्श व्यक्तिमत्त्व नाही. ही स्थिती पालटण्यासाठी प्रत्येकाने महान अशा भारतीय संस्कृतीचे अनुकरण करायला हवे.
व्याख्यानाच्या आयोजनाच्या संदर्भात प्राचार्य डॉक्टर राजेश सिंगरू यांची दिसून आलेली तळमळ !
१. ‘साधनेचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ हा विषय आधी ऐकल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश सिंगरू यांनी योगदिनानिमित्त असाच विषय शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांच्यासाठी घ्यावा, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे २१ जून या दिवशी योगदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
२. ‘तुम्हाला जो विषय वाटतो, तो तुम्ही निःसंकोचपणे आणि परखडपणे मांडावा’, असे ताई गोळवळकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी पहिल्याच संपर्कात सांगितले होते. हा विषय सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा, अशी त्यांची तळमळ होती. त्यामुळे उद्घाटन सत्रात त्यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना विषय मांडण्याची संधी दिली. ‘ऑनलाईन’ प्रसारणाचे नियोजन शिक्षकांनीच केले होते.
३. समितीचे कार्यकर्ते सांगत असलेली सूत्रे प्राचार्य डॉ. सिंगरू स्वीकारून कृतीत आणली. ‘सर्व नियोजन उत्तम प्रकारे केले’, असे त्यांनी नम्रपणे सांगितले. ते म्हणाले, ‘‘व्याख्यान प्रभावी होणार, याची मला निश्चिती होती आणि ते त्या पद्धतीने मांडलेही गेले !’’
क्षणचित्रे
१. शिक्षक डॉ. चंद्र मोहन सिंग यांनीही व्याख्यान प्रभावी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक असे झाल्याचे सांगितले. ‘असे कार्यक्रम नेहमी व्हायला हवेत’, असेही ते म्हणाले.
२. सनातन संस्थेच्या सौ. सुनीता खाडे यांचा योगदिनानिमित्त ‘स्वामी विवेकानंदांचे विचार’ हा लेख एका दैनिकात प्रकाशित झाला होता. डॉ. वंदना खटी यांनी त्यातील विषय उत्स्फूर्तपणे कार्यशाळेत मांडला.