भारत त्यातही विशेष करून महाराष्ट्र हा गड-किल्ल्यांनी नटलेला आहे. हे गड-किल्ले केवळ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत एवढेच नाही तर प्रत्येक गड-किल्ल्याला आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय पराक्रमाचा, बलिदानाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे किल्ले आपल्या पराक्रमी पूर्वजांची साक्ष देणारे आहेत. खरे तर पुढील पिढीकडे हा अमूल्य असा ऐतिहासिक वारसा पोहचवण्याचे कर्तव्य आपले आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला हा असाच एक ऐतिहासिक वारसा आहे. या किल्ल्याची देखरेख करण्याचे दायित्व हे पुरातत्व खात्याकडे आहे.
दैदिप्यमान इतिहास
अठराव्या शतकात म्हणजे पेशवाईत उभारलेल्या या भुईकोटचा इतिहास दैदिप्यमान आहे. पारोळ्याचे वैभव असलेला भुईकोट किल्ला हा इ.स.१७२७ मधे जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधल्याची नोंद आहे. पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी व्यापारी पेठ म्हणून उदयास आली. पेशव्यांचे सरदार नेवाळकर यांच्या कारकिर्दीत हे गाव त्या काळी व्यापारीपेठ म्हणून भरभराटीस आले. वर्ष १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि हिंदवी स्वराज्य लयास गेले. संपुर्ण भारतात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. वर्ष १८२१ मध्ये पारोळा आणि आसपासच्या परिसरात इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊन बंड उठवले. कॅप्टन ब्रिग्ज याच्या खूनाचा प्रयत्न झाला. याचा ठपका लालभाऊ झाशीकर यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला. पुढे वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात झाशीच्या राणीस पारोळ्याच्या किल्लेदारांनी साहाय्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि इंग्रजांनी जहागिरदारांची सर्व संपत्ती जप्त केली. वर्ष १८५९ मध्ये इंग्रजांनी किल्ला आणि शहर कह्यात घेतले. वर्ष १८६० मध्ये जहागीरी खालसा केली. याच काळात किल्ल्यामध्ये इंग्रजांनी अनेकांना फाशीची शिक्षा दिली. शिवाय किल्ल्याची बरीच मोडतोडही केली. त्या घटनांचे भग्न अवशेष किल्ल्यात आजही आढळतात. राणी लक्ष्मीबाईंच्या माहेरचे वंशज म्हणजे तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात.
खंदक
किल्ल्याच्या चारही बाजूला तटबंदीभोवती दगडांनी बांधलेला २० फुटी खोल खंदक आहे. शत्रूने किल्ल्यात प्रवेश करू नये यासाठी खंदकात मगरी सोडल्या जात. त्यामुळे पाण्यातून किल्ल्यात प्रवेश करणे शक्य नसे. सध्या या खंदकाच्या काठावर अतिक्रमण झाल्याने किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही. पण आतील बाजूने पाहिल्यास मात्र पाण्यात बाटल्या आणि इतर कचरा तरंगताना दिसतो.
आतील भाग
किल्ल्याच्या आत आल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी देवढ्या दिसतात. त्यास लागूनच घोड्यांसाठी पागा आहे. खंदकाला लागून २० फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीवरुन जाण्यासाठी *फांजी आहे. तटबंदीमधे शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग *जंग्या असुन वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तटबंदीत अकरा बुरुज आहेत.
इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे.
पूर्वेला महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे एक भुयार असून ते ८ किलोमीटरवर नागेश्वर मंदीरात उघडते अशी समजूत आहे. गडावर अजुन दोन ठिकाणी या भुयाराचा मागोवा दिसतो. बालेकिल्ल्याच्या बुरुजाला लागून गणपतीचे मंदिर आहे. दोन हौद आहेत. १० विहिरी आहेत. आजही त्यांची रचना जशीच्या तशी दिसते. एके ठिकाणी पाणी काढण्यास रहाट आहे. यावरून गड पाण्याने समृद्ध होता, असे दिसते.
* फांजी – तटबंदिशेजारून जाण्या-येण्यासाठीचा मार्ग
* जंग्या – तटबंदीवरुन शत्रूवर आक्रमण करतांना बंदूक ठेवण्याची जागा
कमालीची अस्वच्छता
किल्ल्याची देखरेख नसल्याने किल्ल्यात अस्वछता आहे. अनेक भागांची पडझड झाली आहे. घनदाट वृक्ष, वेलींमुळे भग्नावस्था आली आहे. काही नागरिक आजही किल्ल्याचा शौचालय/मुतारी म्हणुन वापर करतात. त्यांना कोणतीही भीडभाड नाही. किल्ल्याच्या आत प्रवेश करण्यास कुणाचीही अनुमती घ्यावी लागत नसल्याने अनेक लोक परीसरात मद्य पिणे, जुगार खेळणे, विश्रांती घेणे असे कृत्य सर्रासपणे करतात. आज किल्ल्याच्या परिसरात अस्वच्छता, कचरा यांचे साम्राज्य दिसते. आतमध्ये डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसतो. येथे कोणत्याही प्रकारची ऐतिहासिक माहिती देणारा फलकही लावलेला दिसत नाही. एवढी दयनीय अवस्था पाहून प्रश्न पडतो की पुरातत्व खाते नेमके करते काय ? या खात्याकडे नेमके काम काय असते ?
हे केवळ पारोळा येथील किल्ल्याच्या बाबतीत असे आहे असे नाही, आपण जर नीट लक्ष घातले तर आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रात अशी अनेक ऐतिहासिक मंदिरे, किल्ले, समाधी स्थळे आहेत की ज्यांची वर्तमान अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि याला कारणीभूत सर्वस्वी पुरातत्व खात्याने केलेले दुर्लक्ष आणि तेवढीच आपली सर्वांची उदासीनता ही आहे. आपणच आता आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत.
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य टिकवण्यासाठी आणि त्यांचे टप्प्याप्प्याने संवर्धन करण्यासाठी पाऊल उचलले असून दुर्गप्रेमींनी गड किल्ल्यांविषयीच्या सूचना, प्रस्ताव त्वरित ‘मुख्यमंत्री संकल्प कक्षा’ला पाठवण्याचे आवाहन केले आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श पथावर मार्गक्रमण करणारा पक्ष सरकारमध्ये असल्याने गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होईल, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
या प्रकरणी आमच्या मागण्या
1. गडाची डागडुजी – दुरुस्ती लवकरात लवकर चालू करावी.
2. शासनाने राज्यातील काही गडकिल्ले संवर्धनासाठी घेतले आहेत. त्या सूचीत या भुईकोटाचा समावेश व्हावा.
3. पुरातत्व खात्याने या किल्ल्याला नियमित भेट देऊन परिस्थितीचा पारदर्शीपणे अहवाल शासनाला सादर करावा.
4. गडाचे पावित्र्य भंग करणार्या गोष्टींवर (गडाचा मुत्रालय म्हणून उपयोग, अस्वच्छता, डुकरांचा वावर), तसेच अशा सर्वच अयोग्य गोष्टींना गडावर प्रतिबंध करावा.
5. या गडाविषयी संपूर्ण महत्त्व सांगणारे विविध फलक येथे सर्वांना दिसतील, अशा दर्शनी भागात लावण्यात यावेत.
6. या किल्ल्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणार्या दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हावी.
7. किल्ल्याचे संवर्धन आणि पावित्र्य रक्षण करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, जिल्हा प्रशासन आणि पुरातत्त्व विभाग यांच्या एकत्रित बैठकीचे तातडीने आयोजन करावे.