केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाची पत्राद्वारे माहिती !
मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती करणारा ‘मुंबई सागा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग अस्पष्ट केल्याची माहिती केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने २४ जून या दिवशी पत्राद्वारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांना कळवली आहे. चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती केल्याप्रकरणी संघाचे मुंबईतील कार्यकर्ते श्री. महेश भिंगार्डे यांनी अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांच्या माध्यमातून चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना नोटीस पाठवून केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी केली होती.
श्री. भिंगार्डे यांनी ‘मुंबई सागा’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संजय गुप्ता, निर्माता कृष्णकुमार, अनुराधा गुप्ता संगीता अहीर, चित्रपटाची निर्मिती करणार्या ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रीज् प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार दुआ, तसेच संस्थेचे अधिकारी, ‘व्हाईट फेदर फिल्म्स’चे हनीफ रब्दुल रझाक चुनावाला यांना नोटीस पाठवली होती. ‘मुंबई सागा’ या चित्रपटातील अभिनेत्याच्या तोंडी असलेल्या संवादामध्ये ‘भाऊच्या संघटनेचा सदस्य’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या संघटनेचे सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याप्रमाणे संघाचा गणवेश, हातात लाठी, तसेच शाखेत ध्वजाला प्रमाण करतांना दाखवण्यात आले होते. ‘अनेक स्वयंसेवक पोलीस विभागात जातात आणि नंतर भ्रष्टाचार करतात’, असा संवादही या चित्रपटामध्ये होता.
चित्रपट निर्माते क्षमा मागत नाही, तोपर्यंत खटला मागे घेणार नाही ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर
चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलेल्या सूचनेवरून त्यांनी ‘ॲमेझॉन प्राईम’वरील ‘मुंबई सागा’ चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खोडसाळ, तसेच मानहानीकारक चित्रण आणि संवाद अस्पष्ट केला आहे. या चित्रपटाची निर्मिती केलेल्या ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, व्हाईट फिदर लिमिटेड यांनी या प्रकरणी स्वत:ची चूक मान्य करून आक्षेपार्ह दृश्ये अस्पष्ट करून घेतली असली, तर अद्याप याविषयी सार्वजनिकरित्या क्षमा याचना केलेली नाही. जोपर्यंत याविषयी चित्रपटाचे निर्माते क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावरील खटला मागे घेणार नाही, अशी माहिती अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या प्रतिनिधीला दिली.