-
गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी देशभर ‘ऑनलाईन’ आंदोलन !
-
मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर !
-
१६ राज्यांतील राष्ट्रप्रेमींच्या सहभागामुळे #SaveParolaFort राष्ट्रीय स्तरावर द्वितीय स्थानी !
अशी मागणी का करावी लागते ? सरकारी यंत्रणांना हे स्वतःहून का लक्षात येत नाही ?
जळगाव – महाराष्ट्रातील गड-किल्ले हे आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा लाभलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला ऐतिहासिक आहे; मात्र पडझड, भग्नावस्था, किल्ल्याचा शौचालय अन् मुतारी म्हणून वापर, आवारातील कचरा आणि घाणीचे साम्राज्य, अशी त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कुणीही देखरेख करणारे नसल्यामुळे या परिसरात मद्य पिणे, जुगार खेळणे सर्रास चालू असून किल्ल्यामध्ये डुकरांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे भुईकोट किल्ला अत्यंत दुरवस्थेत आहे. त्याची त्वरित डागडुजी करून किल्ल्याचे पावित्र्यरक्षण आणि संवर्धन करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
किल्ल्याची डागडुजी समयमर्यादा घालून पूर्ण करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ आंदोलन करण्यात आले. या संदर्भातील निवेदन राज्य पुरातत्व खाते, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री अन् जळगावचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.
देशभर आंदोलन !
वरील विषयाच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाला निवेदन देणे, हातात हस्तफलक धरलेली छायाचित्रे, स्वत:ची चित्रीकरण केलेली प्रतिक्रिया (व्हिडिओ बाईट), तसेच जनजागृतीपर संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांवर पाठवणे अशा प्रकारे आंदोलन करण्यात आले. यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, देहली, आसाम, हरियाणा, तेलंगाणा, उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, बंगाल आणि मेघालय या राज्यांतील दुर्ग आणि राष्ट्र प्रेमी नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनात हिंदु राष्ट्र सेना, झुंज प्रतिष्ठान पुणे, राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद भुसावळ, जळगाव जिल्हा दुर्ग संवर्धन, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाच्या निमित्ताने ट्विटरवर #SaveParolaFort नावाचा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. थोड्याच वेळात तो राष्ट्रीय स्तरावर द्वितीय स्थानी पोचला.
Parola fort : Historical heritage site in ruins, Dept. of Archaeology in deep slumber !https://t.co/MCMMUBV77c#SaveParolaFort
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 29, 2021
हिंदु जनजागृती समितीने केलेल्या मागण्या !
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गड-किल्ल्यांचे पावित्र्य टिकवण्यासाठी आणि त्यांचे टप्प्याप्प्याने संवर्धन करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यांनी दुर्गप्रेमींना गड-किल्ल्यांविषयीच्या सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्या दृष्टीने समितीने प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
१. गडाची डागडुजी-दुरुस्ती लवकरात लवकर चालू करावी.
२. महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही गडकिल्ले संवर्धनासाठी घेतले आहेत, त्या सूचीत भुईकोट किल्ल्याचा समावेश व्हावा.
३. पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांनी किल्ल्याला नियमित भेट देऊन परिस्थितीचा पारदर्शीपणे अहवाल सादर करावा. गडाचे पावित्र्य भंग करणार्या सर्व अयोग्य गोष्टींना गडावर प्रतिबंध करावा.
४. गडाचे महत्त्व सांगणारे विविध फलक दर्शनी भागात लावावेत.
५. किल्ल्याच्या दुरवस्थेला कारणीभूत असणार्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.