बागपत (उत्तरप्रदेश) : काही हिंदू दर्ग्यात जाऊन तेथील कबरीची पूजा करतात, हे अयोग्य आहे. हिंदूंनी केवळ आपल्याच धर्मातील देवतांची पूजा केली पाहिजे. दर्ग्यात जाण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन द्वारका आणि शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे. ते हरिद्वार अर्धकुंभ मेळ्यातून परत जात असतांना शामनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
शंकराचार्य पुढे म्हणाले,
१. पूर्वी शाळांमध्ये मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात होते. त्यामुळे मुले संस्कारीत आणि धार्मिक बनत होती; परंतु आता मुसलमान आक्षेप घेतील, या भीतीमुळे शाळांमध्ये रामायण, गीता आदींचे ज्ञान दिले जात नाही.
२. अयोध्येत कधीही मशीद नव्हती, तर तेथे राममंदिरच होते. राममंदिर हा संतांचा विषय आहे आणि तेच तो पूर्णत्वास नेऊन राममंदिर उभारतील.
३. सध्या मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्याचा विषय धार्मिक नसून तो राजकीय केला आहे. जर त्या महिला धार्मिक असत्या, तर त्यांनी कधीही दर्ग्यातील कबरीवर जाण्याची भाषा केली नसती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात