मुंबई – नुकतेच ‘फायनॅन्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये जगातील खाद्यपदार्थ बनवणारे आस्थापन ‘नेस्ले’ने म्हटले आहे, ‘तिचे ६० टक्के खाद्यपदार्थ जंक फूड या श्रेणीमध्ये येतात आणि ते आरोग्यास चांगले नाहीत.’ आज जंकफूडच लोकप्रिय अन्न बनले आहे. अनेक विदेशी आस्थापने जंक फूडची विक्री करत असून ते खाऊन भारतियांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच ही आस्थापने भारतियांचे सहस्रो कोटी रुपये परदेशात नेत आहेत. याच्या विरोधात राष्ट्रप्रेमींनी केलेला #NoJunkFood_StayHealthy हा हॅशटॅग तृतीय स्थानावर ट्रेंड करत होता. यावर ३५ सहस्रांहून अधिक जणांनी ट्वीट्स केल्या. ट्वीट्स करणार्यांनी विदेशी आस्थापनांचे जंक फूड खाऊन आरोग्याची हानी करण्यापेक्षा भारतीय आहारपद्धतीचा स्वीकार करावा, असे आवाहन केले.