आरोग्याला हानीकारक ‘जंक फूड’च्या आहारी न जाता स्वदेशी आणि ताजे अन्न ग्रहण करा अन् स्वस्थ रहा ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय
‘जंक फूड’ला आयुर्वेदात ‘विरुद्धअन्न’ म्हटले आहे. सरबत, नारळ पाणी यांसारखे भारतीय पेय पिण्याऐवजी आरोग्याला हानीकारक असणार्या कोल्ड्रिंक्स्च्या आहारी आपण जात आहोत. मॅगी, बिस्किट यांसह अन्य विविध पॅकबंद पदार्थांच्या वेष्टनांवर प्रोटीन, कॅलरी वैगेरे अशा अनेक चांगल्या गोष्टी असल्याचा दावा विदेशी आणि देशी आस्थापनांकडून केला जातो, पण हे खरे नसते. विविध आकर्षित पद्धतीने ‘जंक फूड’ची जाहिरात करून जनतेची दिशाभूल होत आहे. सरकारने यावर तात्काळ बंदी आणली पाहिजे. ‘जंक फूड’ देशी असो वा विदेशी त्याचा भारतीयांनी त्याग करायला हवा. आयुर्वेदात सांगितल्यानुसार ज्या अन्नावर हवा, सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश स्पर्श किंवा संपर्क आला आहे, असेच अन्न खायला हवे. आरोग्याला हानीकारक ‘जंक फूड’च्या आहारी न जाता स्वदेशी आणि ताजे अन्न खाऊन स्वस्थ रहा, असे आवाहन ‘आयुष मंत्रालया’चे राष्ट्रीय गुरु वैद्य सुविनय दामले यांनी केले. ते ‘राष्ट्रीय चिकित्सक दिना’च्या निमित्ताने ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने आयोजित ‘विदेशी जंक फूड : पोषण कि आर्थिक शोषण ?’ या ऑनलाईन विशेष संवादात बोलत होते. हा कार्यक्रम समितीच्या Hindujagruti.org या संकेतस्थळाद्वारे, तसेच यू-ट्यूब आणि ट्वीटर यांद्वारे 3,033 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.
‘नेस्ले’ या विदेशी कंपनीचे वास्तव उघड करणारे उत्तरप्रदेश येथील ‘भूतपूर्व सैनिक कल्याण संघटने’चे संघटन मंत्री श्री. इन्द्रसेन सिंह म्हणाले की, प्रत्येक खाद्यपदार्थाची गुणवत्ता पाहून त्याचा अहवाल जनतेसमोर उघड केल्यावरच त्याच्या विक्रीला अनुमती मिळायला हवी; मात्र आता असे होताना आता दिसत नाही. अनेक आस्थपनांकडे ते पुरवणारे ‘पॅकबंद’ अन्न आणि पाणी यांविषयी नीट परवाने नसतांना त्यांना आपल्या देशात व्यवसाय करू दिला जात आहे. ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ आणि ‘एफ्.डी.ओ.’ यांसारख्या संस्था जोपर्यंत निष्पक्ष आणि भ्रष्टाचारमुक्त काम करणार नाहीत. तोपर्यंत भारतीयांना पौष्टीक अन्न मिळणे जवळपास अशक्य आहे.
या वेळी खाद्य आणि पोषण विशेषज्ञ सौ. मीनाक्षी शरण म्हणाल्या की, जंक म्हणजे कचरा ! ज्या अन्नात कोणतेही पोषकतत्त्व नसतात, त्याला ‘जंक फूड’ म्हटले जाते. ‘जंक फूड’ खाणे म्हणजे स्वत:च्या पोटात कचरा भरण्यासारखे आहे. याने शरीराचे पोषण न होता उलट कुपोषण होते. यामध्ये सर्व बेकरी, हवाबंद पदार्थ आणि पेय येतात. केवळ लहान मुलेच नव्हे, तर पालकदेखील ‘जंक फूड’ला बळी पडले आहेत. भारतीय आहारशास्त्राचा जीवनात अवलंब करायला हवा. या वेळी ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या समन्वयक अश्विनी कुलकर्णी म्हणाल्या की, प्रशासनाच्या अनास्थेमुळे देशभरात सर्वत्र निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध होताना दिसत आहे. अन्नामध्ये भेसळ आढळल्यास याविरोधात कुठे तक्रार करायची, हे सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसते. ‘अन्नामधील भेसळ’ याविषयी शालेय पाठ्यक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जावे, अशी मागणी आम्ही सतत करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही देशातील कोणत्याही राज्याच्या आयुक्ताने दूध आणि अन्नातील भेसळ यांविषयी कार्यशाळा घेतलेल्या नाहीत. याविरोधात आम्ही न्यायालयात याचिका दाखल करत आहोत.