जेथे साधूच असुरक्षित असतील, तेथे सर्वसामान्य जनतेचे रक्षण कसे होणार ?
शासनाने या प्रकरणाचे निष्पक्ष अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करावी !
उज्जैन (मध्यप्रदेश) : उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वामध्ये दत्त आखाड्यातील साधू तपेश्वरी सरस्वती गिरी महाराज यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याची घटना घडली. या आक्रमणात त्यांच्या मानेवर वार करण्यात आले असून त्यांच्यावर इंदूर येथील एम्.वाय. रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत.
साधू तपेश्वरी हे गुजरातमधील सावरकुंडला या गावातील महंत गंगागिरी महाराज यांच्यासमवेत सिंहस्थपर्वासाठी आले आहेत. येथील दत्त आखाडा क्षेत्रात त्यांचा आश्रम आहे. गंगागिरी महाराज यांनी सांगितले की, सकाळी ते आश्रमातील अन्नक्षेत्रातील भोजनाची व्यवस्था पहात होते. त्या वेळी एका शिष्याने तपेश्वरी महाराज यांच्या मुखातून रक्त येत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांच्या मानेवर खोलवर घाव असल्याचे लक्षात आले. त्यांना तात्काळ इंदूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले, ही घटना घडली त्या वेळी तेथे ४ ते ५ सेवक उपस्थित होते. आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो; मात्र तपेश्वरी यांना रक्ताची उलटी झाल्याचे सांगून तेथील साधूंनी पोलीस अधिकार्याला परत पाठवून दिले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित साधूंची सूची सिद्ध केली असून भाजी चिरण्याच्या काही सुर्या जप्त केल्या आहेत. तपेश्वरी यांची स्थिती चांगली झाल्यावरच अधिक माहिती मिळू शकणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात