मध्यप्रदेशचे भाजप शासन शंकराचार्यांची मागणी मान्य करील का ?
सुमेरूमठ काशीचे शंकराचार्य जगद्गुरु नरेंद्रानंद सरस्वती यांचा मध्यप्रदेश शासनाला प्रश्न
उज्जैन : धारमधील भोजशाळेत शुक्रवारी मुसलमानांना नमाज पठण करण्याची अनुमती आहे, तशी अनुमती हिंदूंना मशिदींमध्ये हनुमान चालिसा म्हणण्यास द्यावी, तरच खर्या अर्थाने देशात धार्मिक सद्भाव कायम राहू शकतो, असे प्रतिपादन सुमेरूमठ काशीचे शंकराचार्य जगद्गुरु नरेंद्रानंद सरस्वती यांनी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलतांना केले. या संदर्भातील निर्णय राज्य शासनाला पाठवण्यात येईल, असेही ते म्हणाले.
शंकराचार्य जगद्गुरु नरेंद्रानंद सरस्वती म्हणाले, काही मासांपूर्वी झालेल्या भोजशाळा आंदोलनाच्या वेळी राज्यशासनाने त्या ठिकाणी पूजन आणि नमाज पठण दोन्ही होऊ देण्यासाठी आमच्यावर दबाव आणला होता; मात्र त्या वेळी सनातन धर्मातील परंपरेचे रक्षण करण्यासाठी असे काही करण्यास मी नकार दिला होता. प्रत्येक धर्माचे स्वतःचे असे उपासना स्थळ असते. हिंदू मंदिरात पूजाअर्चा करतात, मुसलमान मशिदींमध्ये जाऊन त्यांचे धर्मपालन करतात, तर ख्रिस्ती चर्चमध्ये प्रार्थना करतात. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु काही लोकांकडून दुसर्याच्या धर्मात हस्तक्षेप करण्यात येत असेल, तर ते सहन केले जाणार नाही.
पहिल्या अमृत स्नानाच्या वेळी सामान्य जनतेला १० किलोमीटर लांब रोखण्यात आले होते; परंतु मंत्री आणि अधिकारी यांचे कुटुंबीय शासकीय वाहनांमधून घाटावर पोहोचले होते. हा जनतेवर अन्याय आहे. शासन शासकीय संस्थांना कोट्यवधींच्या सुविधा पुरवत आहे; परंतु संतांना प्लॉट मिळवण्यासाठीही मेळा कार्यालयात चकरा टाकाव्या लागल्या, असेही शंकराचार्य जगद्गुरु नरेंद्रानंद सरस्वती म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात