Menu Close

फादर स्टेन स्वामी यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे इतर कैद्यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष कधी देणार ? – हिंदु विधीज्ञ परिषद

नुकतेच निधन झालेले फादर स्टेन स्वामी यांना देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने (‘एन्आयए’ने) अटक केलेली होती. त्यांच्यावर नक्षलवादाला साहाय्य आणि बेकायदेशीर कृत्ये केल्याचे गंभीर गुन्हे दाखल होते. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केलेला आहे. काही मोठ्या नेतेमंडळींनी राष्ट्रपतींनाही पत्र लिहिली आहेत. मुळात फादर स्टेन स्वामी यांना व्यवस्थित वैद्यकीय उपचार मिळत होते. त्याचबरोबर त्यांना चर्चप्रणित खाजगी इस्पितळात ठेवण्याची विशेष मुभाही उच्च न्यायालयाने दिली होती. याउपरही त्यांच्या निधनानंतर राजकारण होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर यातून कारागृहातील अन्य कैद्यांच्या स्वास्थ्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. फादर स्टेन स्वामी यांच्याप्रमाणे अन्य किती कैद्यांच्या प्रश्‍नाकडे हे तथाकथित पुरोगामी, सेक्युलर आणि नेतेमंडळी किती लक्ष देतात ? आर्थर रोड कारागृहामधील नालासोपारा खटल्यातील आरोपी सुधन्वा गोंधळेकर आणि गणेश मिस्कीन यांना उपचार मिळावेत म्हणून अर्ज करूनही त्यांच्याकडे लक्ष का दिले जात नाही ? अशा प्रकरणांमध्ये तथाकथित पुरोमागी आणि सेक्युलर मंडळी गप्प का बसतात ? या कैद्यांनाही फादर स्टेन स्वामी यांच्याप्रमाणे उपचार घेण्याची मुभा मिळायला हवी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली आहे.

आर्थर रोड कारागृहामधील नालासोपारा खटल्यातील आरोपी सुधन्वा गोंधळेकर यांच्या दोन्ही बाजूच्या दाढा किडलेल्या असून त्यांना उपचारही मिळत नाहीत. जोपर्यंत त्यांना उपचार मिळत नाही तोपर्यंत जेवताही येत नाही, अशी त्यांची गंभीर स्थिती गेले दोन महिने आहे. तर दुसरीकडे आणखीन एक आरोपी गणेश मिस्किन यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होत आहे. त्यांनाही पूर्ण उपचार मिळत नाहीत. न्यायालयात अर्ज करूनही आत्तापर्यंत त्यांना उपचार मिळाले नाहीत. फादर स्टेन यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करणारे अशा कैद्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येणार आहेत का ? कि हे केवळ एका मृत्यूवरून होणारे राजकारण आहे ? प्रत्यक्षात ही यंत्रणा कधी जागी होऊन समान न्याय करणार आहे ? हा प्रश्‍न हिंदु विधीज्ञ परिषदेने उपस्थित केला आहे.

कैद्यांना व्यवस्थित उपचार मिळाले पाहिजेत आणि त्यांचे खटले लवकर निकाली निघाले पाहिजेत. गेली सहा वर्षे दाभोळकर खून खटल्यात कारागृहात असणारे निरपराधी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचेही दुःख फादर स्टेन स्वामी यांच्या दुःखाहून कमी नाही. याचीही दखल घ्यावी, अशी आमची भावना असल्याचे हिंदु विधीज्ञ परिषदेने म्हटले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *