Menu Close

तालिबानने चीनला संबोधले ‘मित्र’: अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी साहाय्य घेणार !

तालिबान आणि चीन यांची ‘मैत्री’ भारताला घातक असून भारताने त्यादृष्टीने आतापासूनच आक्रमक धोरण अवलंबायला हवे !

तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन

बीजिंग – अफगाणिस्तानमधील ‘तालिबान’ या जिहादी आतंकवादी संघटनेने  चीनला ‘मित्र’ संबोधले आहे. इतकेच नव्हे, तर अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी आवश्यक असणार्‍या गुंतवणुकीसाठी लवकरच चीनशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने ‘धीस वीक इन एशिया’ या नियतकालिकाशी बोलतांना दिली. ‘अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेतल्यानंतर त्याचा ८५ टक्के भाग आमच्या नियंत्रणात आला आहे’, असा दावाही शाहीन याने केला.

शाहीन पुढे म्हणाला की, चिनी गुंतवणूकदार, तसेच त्यांचे कर्मचारी आणि कामगार अफगाणिस्तानमध्ये पुन्हा येणार असतील, तर आम्ही त्यांच्या सुरक्षेची हमी देतो. आम्ही चीनचे स्वागत करतो. चीनमधील फुटीरतावादी उघूर मुसलमानांना मात्र आम्ही अफगाणिस्तानमध्ये आश्रय देणार नाही. (चीनमधील मुसलमानांवर तेथील सरकारकडून अत्याचार होत आहेत. असे असतांना त्याच्या विरोधात आवाज उठवणार्‍या उघूर मुसलमानांना तालिबानी आतंकवादी ‘फुटीरतावादी’ संबोधतात. काश्मिरी मुसलमानांवरील कथित अत्याचारांच्या संदर्भात आवाई उठवणार्‍या तालिबानचा दुटप्पीपणा यातून दिसून येतो ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) अफगाणिस्तामध्ये अल् कायदा अथवा अन्य कोणत्याही आतंकवादी संघटनांना त्यांच्या कारवाया करता येणार नाहीत. (स्वतःच आतंकवादी संघटना असलेल्या तालिबानचा विनोद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) यापूर्वी शाहीन याने तालिबानला भारतासमवेतही शांतता हवी असल्याचे विधान केले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *