Menu Close

वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘ऑनलाईन’ भक्तीमेळ्याला वारकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री. मनोज खाडये

रत्नागिरी – वर्ष १९८५ मध्ये पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे प्रथम सरकारीकरण झाले. त्या वेळी काही ठराविक हिंदूंनीच त्याला विरोध केला होता. सर्वत्रच्या वारकर्‍यांकडून मंदिर सरकारीकरणाला विरोध झाला नव्हता. त्या वेळी मंदिर सरकारीकरणाविषयी ‘तो पंढरपूरच्या मंदिराचा विषय आहे. तेथील लोक किंवा वारकरी काय ते पहातील’, अशी हिंदूंची मानसिकता होती. खरे तर ‘हिंदूंची मंदिरे हा चैतन्याचा स्रोत देणारी आधारशीला आहेत’, हे धर्मशास्त्र ठाऊक नसल्यामुळे त्या वेळी मोठ्या प्रमाणावर मंदिर सरकारीकरणाला विरोध झाला नाही. परिणामी पुढे एकेक करून अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले. आजच्या घडीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या सरकारी समितीच्या कह्यात असलेल्या पश्चिम महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग येथील ३ सहस्र ६७ मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे. यातून हिंदूंना धर्मशास्त्र सांगण्याची आवश्यकता दिसून येते. त्यामुळे आपल्यासारखे वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार मंडळींनी हिंदूंना धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यातील वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका ‘ऑनलाईन’ भक्तीमेळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या मेळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतील वारकरी आणि कीर्तनकार यांची विशेष उपस्थिती लाभली.

या मेळ्यात श्री. मनोज खाडये यांनी काळाच्या दृष्टीने साधनेची आवश्यकता, कोरोना महामारीच्या काळात धर्मप्रसाराची सेवा कशा पद्धतीने आपण परिणामकारक करू शकतो ? याविषयीची माहिती दिली. तसेच त्यांनी हिंदु धर्मावर सातत्याने होणारे आघात आणि त्या आघातांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे विविध माध्यमांतून चालू असलेले कार्य याविषयी माहिती दिली.

मेळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकर्‍यांचे अभिप्राय

१. ह.भ.प. वसंत महाराज चव्हाण, अध्यक्ष, वारकरी संप्रदाय गाथा पारायण समिती, अलोरे पंचक्रोशी – खेडोपाडी हा धर्मजागृतीचा विषय पोचला पाहिजे. तुम्ही केव्हाही हाक मारा, आम्ही सदैव तुमच्या समवेत राहून हे कार्य पुढे नेऊ.

२. ह.भ.प. सिद्धेश महाराज पालांडे, युवा कीर्तनकार – आजच्या मार्गदर्शनातून स्फूर्ती मिळाली. धर्मकार्यासाठी सर्वांनीच सहकार्य केले पाहिजे. आपत्काळात नामस्मरण तारून नेईल, हे समाजाला सांगण्याची वेळ आली आहे.

३. ह.भ.प. नंदकुमार कालेकर महाराज, करंजाणी, तालुका दापोली – आज हिंदु जनजागृती समितीने जो संवाद आयोजित केला, तो अतिशय सुंदर होता. आज सर्वांनाच या विषयाची आवश्यकता आहे. अशा प्रकारे समाजामध्ये प्रबोधन करता यावे, यासाठी प्रत्येक १५ दिवसांनी जर अशा प्रकारचा कार्यक्रम घेता आला, तर चांगले होईल. त्यामुळे कीर्तन आणि प्रवचनातून हे विषय मांडण्यासाठी उपयुक्त होईल.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *