Menu Close

आसाममध्ये मंदिरांपासून ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची खरेदी आणि विक्री यांवर बंदी येणार !

आसाम शासनाचे नवे ‘गुरे संरक्षण विधेयक’

आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्याविना गुरांची हत्या करता येणार नाही !

आसाम राज्य असा कायदा करू शकते, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या शासनाकडून नवे ‘गुरे संरक्षण विधेयक’ विधानसभेत मांडण्यात आले आहे. गुरांच्या संरक्षणार्थ असलेल्या या विधेयकानुसार मुख्यतः हिंदु धर्मीय, जैन, शीख आणि गोमांस न खाणारा समाज रहात असलेल्या भागांत गोमांस किंवा गोमांस उत्पादनांची खरेदी अन् विक्री करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. कोणतेही मंदिर, मठ आदींच्या ५ कि.मी.च्या परिसरातही ही बंदी असणार आहे. काही धार्मिक सणांच्या वेळी यात सवलत दिली जाऊ शकेल.

मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की,

१. या विधेयकाचा उद्देश ‘गुरांची हत्या आणि अवैध वाहतुकीचे नियमन करणे’, हा आहे. हे विधेयक संमत झाल्यास आधीचा ‘आसाम गुरे संरक्षण अधिनियम १९५०’ हा कायदा रहित होणार आहे. आधीच्या कायद्यात हत्या, जनावरांच्या मांसाचे सेवन आणि वाहतुकीचे नियमन, यांविषयी पुरेशी कायदेशीर तरतूद नव्हती.

२. नवीन कायद्याचा उद्देश ‘ठराविक ठिकाणांव्यतिरिक्त अन्य कुठेही गोमांस खरेदी आणि विक्री करण्यावर बंदी घालणे’, हा आहे. देशातील अनेक राज्यांत गुरांच्या हत्येच्या विरोधात कायदे आहेत; मात्र त्या राज्यांनी गोमांस आणि गोमांस उत्पादनांची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी आसामच्या कायद्याप्रमाणे विशिष्ट क्षेत्रे वगळलेली नाहीत.

३. या विधेयकानुसार नोंदणीकृत पशूवैद्यकीय अधिकार्‍याकडून आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्याविना गुरांची हत्या करता येणार नाही. अधिकारी प्रमाणपत्र तेव्हाच देऊ शकतील, जेव्हा त्या गुरांचे वय १४ वर्षांपेक्षा अधिक असेल. जर गाय किंवा वासरू अपंग असेल, तर त्यांची हत्या करता येणार आहे. केवळ परवानाधारक पशूवधगृहांनाच गुरांची हत्या करण्याची अनुमती देण्यात येणार आहे.

४. या विधेयकानुसार कुणी दोषी आढळला, तर त्याला न्यूनतम ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ५ लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. जर कुणी दुसर्‍यांदा दोषी आढळला, तर त्याला दुप्पट शिक्षा करण्याचे प्रावधानही या कायद्यात आहे.

(म्हणे) ‘मुसलमानांना लक्ष्य करणारा कायदा !’ – काँग्रेस

काँग्रेस धर्मनिरपेक्ष भारतातील राजकीय पक्ष आहे कि इस्लामी देशांतील मुसलमानांचा पक्ष ? प्रत्येक वेळी केवळ मुसलमानांचा विचार करणार्‍या या पक्षाला बहुसंख्य हिंदूंनी देशातील सत्तेतून हाकलल्यानंतरही हिंदुविरोधी भूमिका घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे आत्मघात आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !

या विधेयकाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना काँग्रेसचे विरोधी पक्षनेते देबाब्रत सैकिया म्हणाले की, मुसलमानांना लक्ष्य करण्यासाठी हा कायदा करण्यात येत आहे. या विधेयकावर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. यातील ५ कि.मी.ची तरतूद हास्यास्पद आहे. कुणीही कुठेही मंदिर बांधू शकतो; म्हणून हे विधेयक फारच संदिग्ध आहे. यामुळे जातीय तणाव बर्‍याच प्रमाणात वाढू शकतो.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *