Menu Close

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

मुंबई – श्रीगुरूंनी भक्त, शिष्य आणि साधक यांना जन्मोजन्मी तत्त्वरूपे सांभाळले आहे. अशा प्रीतीस्वरूप आणि भक्तवत्सल गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! या दिवशी १ सहस्र पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ सर्वांना व्हावा, यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मराठी, गुजराती, कन्नड अन् मल्ल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री व्यासपूजन, तसेच सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवण्यात आला.

या मंगलसमयी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘आपत्काळात हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते. भगवान श्रीकृष्णाने ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’, म्हणजे ‘माझ्या भक्तांचा कधी नाश होणार नाही’, असे वचन भक्तांना दिले आहे. त्यामुळे आपण साधना वाढवून देवाचे भक्त बनायला हवे. यापूर्वी आनंदप्राप्तीसाठी साधना करा, असे आम्ही सांगत होतो; मात्र येणारा आपत्काळ इतका भीषण असणार आहे की, ‘आता जिवंत रहाण्यासाठी साधना करा’, अशी सांगण्याची वेळ आली आहे. साधनेच्या संदर्भात सनातन संस्थेच्या वतीने साप्ताहिक ‘ऑनलाईन साधना सत्संग’ घेण्यात येतात. या सत्संगांचा जिज्ञासूंनी अवश्य लाभ घ्यावा.’

या महोत्सवांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यापूर्वी केलेल्या मार्गदर्शनांची संग्रहित ध्वनीचित्रफीत, तसेच ‘आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता’ या विषयावरील ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली. स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता सांगणारी प्रात्यक्षिके (बचाव आणि आक्रमण) या महोत्सवाचे आकर्षण ठरले. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांची संकेतस्थळे, तसेच त्यांचे ‘यू ट्यूब चॅनेल्स’ यांद्वारे या कार्यक्रमाचा लाभ साधारण २५ सहस्र जिज्ञासू आणि साधक यांनी घेतला.

यंदा ११ भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्ल्याळम् या भाषांमधील ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव २३ जुलै या दिवशी पार पडले, तर हिंदी, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांमधील ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन २४ जुलै या दिवशी करण्यात आले आहे.

आपत्काळात रक्षण होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घ्या ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु नंदकुमार जाधव

सध्या भारतासह संपूर्ण पृथ्वी संकटकाळातून जात आहे. या वर्षभरात पूरस्थिती, दंगली, महामारी, आर्थिक मंदी इत्यादी संकटांचा परिणाम देशाला भोगावा लागला. वर्ष २०२० ते २०२३ हा काळ भारतच नव्हे, तर चीन, युरोप, अमेरिका अशा संपूर्ण जगासाठीच आपत्तींचा काळ असणार आहे. या काळात आर्थिक मंदी, गृहयुद्ध, सीमापार युद्ध, तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सामना जनसामान्यांना करावा लागेल. अशा आपत्काळात जिवंत रहाणे आणि सुसह्य जीवन जगणे, हे एक आव्हान ठरणार आहे. आपत्काळाच्या दृष्टीने स्वरक्षण, प्रथमोपचार, अग्नीशमन प्रशिक्षण, जलतरण, वाहन चालवणे आदी विविध प्रकारच्या विद्या शिकण्यासाठी प्रत्येकाने प्राधान्य द्यायला हवे.

सनातन संस्थेच्या हिंदी भाषेतील पहिल्या ‘ई-बुक’चे प्रकाशन !

सनातन संस्थेचे ग्रंथ आता ‘ई-बुक’ स्वरूपात ‘अमेझॉन किंडल’ यांवर उपलब्ध झाले आहेत. यांपैकी ‘त्योहार मनाने की उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या हिंदी भाषेतील पहिल्या ‘ई-बुक’चे प्रकाशन ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे माजी समूह-संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यांसह हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांतील अन्य ७ ग्रंथांचे प्रकाशनही या ऑनलाईन महोत्सवांत करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *