पाटणा : बिहारमध्ये वाढलेल्या आगीच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने अजब सूचना जनतेला देऊ केल्या आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत कोणीही अग्नी प्रज्वलित करू नये, तसेच ‘यज्ञ’ आणि ‘पूजा’ सकाळी ९ च्या आधीच उरकण्यात याव्यात, असे पत्रक काढण्याचे आदेश मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्याचे मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्या असून पाटणा, नालंदा, भोजपूर, रोहतास, बक्सर, भबुआ या सहा जिल्ह्यांचा उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे.
तसेच खबरदारी म्हणून या भागात ज्या ठिकाणी खुल्या विद्युत वाहक तारा आहेत त्या बदलण्याच्या सूचना राज्याच्या ऊर्जा सचिवाला देण्यात आल्या आहेत. आगीच्या घटनांमधील मृतकांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यासोबतच आग रोखण्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त सामग्री तत्काळ खरेदी करण्यासाठीचे प्रस्ताव ठेवण्याचे निर्देशही दिले.
मुख्यमंत्र्यांनी एक विशेष बैठक बोलवून या संदर्भात चर्चा केली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मुख्यसचिव अंजनीकुमार सिंग आणि राज्याचे पोलीस प्रमुख पी. के. ठाकूर आणि अन्य विभागाचे सचिव उपस्थित होते.
दरम्यान, ‘राजद’चे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी देखील रविवारी राज्यात आगीच्या घटना वाढल्याप्रकरणी चिंता व्यक्त करत अग्नीचा वापर कमी करण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यानंतर नितीशकुमार यांनी दिलेल्या या अजब आदेशामुळे देशभरात याची चर्चा सुरू आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स