Menu Close

अश्लीलतेचा उघडपणे प्रसार करणार्‍या ‘ओ.टी.टी.’ माध्यमांवर कठोर कारवाई करावी ! – मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते

अशी मागणी का करावी लागते ? सरकारी यंत्रणा अशा माध्यमांवर स्वतःहून बंदी का घालत नाहीत ?

मुकेश खन्ना

मुंबई – केवळ राज कुंद्रा यांचे अश्लील चित्रपट सिद्ध करण्याचे प्रकरण उघड झाले, यावरच समाधान न मानता अन्वेषण यंत्रणांनी अश्लीलतेचा उघडपणे प्रसार करणार्‍या ‘ओ.टी.टी’ माध्यमांवर, तसेच असे उद्योग करणार्‍या छुप्या व्यावसायिकांवरही कठोर कारवाई करायला हवी, तरच अशांना चाप बसेल, असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले,

१. अश्लीलतेचा प्रसार करणारे राज कुंद्रा हे एकमेव नाहीत. पैशांसाठी असे अनेकजण युवकांना अश्लीलतेच्या नरकात ढकलत आहेत. तरुण मुलींना खोटे सांगून या व्यवसायात ओढत आहेत. राज कुंद्रा यांची पत्नी शिल्पा शेट्टी यांनी ‘त्यांचा राज कुंद्रा यांच्या कृत्यांना पाठिंबा आहे कि नाही ?’ हे  ठामपणे सांगितले पाहिजे.

२. ‘हॉलिवूड’च्या (‘विदेशातील चित्रपट क्षेत्रा’च्या) प्रत्येक गोष्टीत नक्कल करणे, हेच ‘बॉलिवूड’ला (‘भारतातील चित्रपट क्षेत्रा’ला) चांगले वाटते. मग त्यात ‘अनेक वेळा घटस्फोट घेणे’, हेही येते.

३. अश्लील चित्रीकरणाचा केला जाणारा व्यवसाय, हे भारतावरील आक्रमणच समजायला हवे. चित्रपटगृहात पूर्वी केवळ मोजके प्रौढ लोक चित्रपट पहात. तिथे लहानांना प्रवेश नव्हता. आमच्या काळात १८ वर्षांखालील मुलांसाठी चित्रपट न बघणे बंधनकारक होते. आता गावांतही गरीब आणि अज्ञानी असलेले अनेक बांधव अन् लहान मुले ‘इंटरनेट’ वर एक ‘बटण’ दाबून क्रिकेट, चित्रपट यांसह अश्लील चित्रफितीही बघत आहेत.

४. अमली पदार्थ, अश्लीलता किंवा देशविघातक कारवाया, ही व्यवसायाची क्षेत्रे होऊ शकत नाहीत. विदेशांत यांवर बंदी असेल; पण भारतात यांवर काहीही बंधनेही नाहीत. यासाठी कठोर कायदे सिद्ध करायला हवेत. अश्लील चित्रीकरणाचा व्यवसाय करण्याविषयी नोंद झालेला गुन्हा, ही प्रसारमाध्यमांसाठी केवळ एक ‘सनसनाटी बातमी’ असते. अन्वेषण यंत्रणांनी अनेक अवैध व्यवसायांची पाळेमुळे खणून काढावीत, अशी अपेक्षा आहे.

‘ओ.टी.टी.’ म्हणजे काय ?

‘ओ.टी.टी.’ म्हणजे ‘ओव्हर-द-टॉप.’ याद्वारे नवीन प्रदर्शित होणारे चित्रपट, ‘वेब सिरीज’, अनेक नवे-जुने चित्रपट, मालिका किंवा अन्य कार्यक्रम पैसे देऊन ‘ऑनलाईन’ पहाता येतात. पहाणार्‍याला वर्षातून एकदा त्याचे मूल्य भरावे लागते. पूर्वी याला केवळ अमेरिकेत मागणी होती; परंतु आता जगभरात ओ.टी.टी.ला मागणी आहे. भारतात ‘ओ.टी.टी.’च्या माध्यमातून प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला जातो.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *