Menu Close

धर्मावरील आघातांचा वारकरी संप्रदायाने प्रतिकार करून धर्मरक्षण केले ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

यवतमाळ – जेव्हा जेव्हा धर्मावर आघात झाले, तेव्हा तेव्हा वारकरी संप्रदायाने त्यांचा प्रतिकार केला आणि त्यातून धर्मरक्षण केले. वारकर्‍यांनी संघटितपणे विरोध केल्याने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील २७ पैकी १४ कलमे वगळण्यात आली, तसेच साडेचार लक्ष मंदिरे कह्यात घेणारा ‘मंदिर सरकारीकरण कायदा’ रहित करावा लागला, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ‘कोरोनामुळे समाजात तणाव निर्माण होऊन अनेकांचे मनोबल खचले आहे. समाजाला मानसिक आधार देऊन संतवाणीतून अध्यात्मप्रसार करणे आवश्यक आहे’, या हेतूने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नुकतेच विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन कीर्तनकार परिसंवादा’चे आयोजन करण्यात आले. त्यात ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर श्री. घनवट मार्गदर्शन करत होते. परिसंवादामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार आणि भागवताचार्य यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्र, धर्म अन् परंपरा यांच्यावरील आघातांच्या विरोधात संघटितपणे लढण्याचा निर्धार केला. या परिसंवादाला कीर्तनकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसंवादाचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन श्री. पराग बिंड यांनी केले.

श्री. घनवट पुढे म्हणाले…

१. निधर्मी व्यवस्थेने हिंदूंचा घात केला आहे. अल्पसंख्यांकांच्या नावाखाली ख्रिस्ती आणि मुसलमान विद्यार्थ्यांना शाळेमध्ये धर्मशिक्षण दिले जाते; मात्र बहुसंख्य हिंदूंना शाळेमध्ये धर्मशिक्षण दिले जात नाही, हा बहुसंख्य हिंदूंवरील अन्याय आहे. ‘सेक्युलर व्हायरस’ला (निधर्मीपणाच्या विषाणूला) ‘हिंदु राष्ट्र’ नावाची लस द्यावी लागेल.

२. देश स्वतंत्र झाला, तरीही इंग्रजकालीन कायदे अजूनही आहेत, ते पालटण्याची आवश्यकता आहे. तसेच संपूर्ण देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे, धर्मांतर बंदी कायदा करणे, गोहत्या बंदी कायदा लागू करणे आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ रहित करणे आवश्यक आहे.

क्षणचित्र

‘परिसंवादातील माहिती आणि आयोजन चांगले होते’, असे उपस्थितांनी सांगितले.

कीर्तनकारांचे उत्स्फूर्त अभिप्राय

१. आताची पिढी निधर्मी आणि नास्तिक होत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी परिसंवादामध्ये महत्त्वपूर्ण विषय मांडले गेले. – ह.भ.प. किरण महाराज शिंदे, मेहकर, जिल्हा बुलढाणा

२. राष्ट्र-धर्माची हानी करण्यासाठी जागतिक स्तरावरून प्रयत्न होत आहेत. तसेच भ्रष्टाचाराने समाजाची पिळवणूक होत आहे. परिसंवादातील सर्व विषय आवडले. – ह.भ.प. गजानन महाराज चराटे, अमरावती

३. हिंदु धर्मामध्ये अनमोल साहित्य असतांनाही काही लोक दुसर्‍यांचे साहित्य आणून हिंदूंची दिशाभूल करत आहेत. परिसंवादाचा उद्देश पवित्र आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन कार्य करावे. कार्यक्रम चांगला झाला. आयोजकांचे आभार ! – ह.भ.प. मनोज महाराज मिरकुटे, अमरावती

४. मंदिर सरकारीकरणामुळे जर देवनिधीचा दुरुपयोग होत असेल, तर या मंदिरांना भक्तांनी अर्पण का द्यावे ? इंग्रजांनी आपली गुरुकुल शिक्षणपद्धत बंद केल्याने शालेय अभ्यासक्रमात धार्मिकता शिकवली जात नाही. त्यामुळे नवीन पिढी धार्मिकतेला अंधश्रद्धा मानते. शालेय अभ्यासक्रमात धार्मिकता शिकवली गेली पाहिजे. परिसंवादामध्ये वक्त्यांनी चांगली माहिती दिली. – ह.भ.प. महादेव महाराज निमकंडे, वारकरी साहित्य परिषद, जिल्हाध्यक्ष, अकोला

५. वारकरी संप्रदायाने एकत्र येणे आणि संघटित होणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून संस्कार देणे चालू करावे. – ह.भ.प. देवराव वनवे महाराज, नागपूर

६. हिंदूंनी आपसांतील मतभेद बाजूला सारून हिंदु राष्ट्रासाठी एकत्र आले पाहिजे. – ह.भ.प. गजानन महाराज हिरुळकर, दर्यापूर, अमरावती

७. सर्व मंदिरांवरील राजकीय पक्षांचे अधिग्रहण रहित झाले पाहिजे. – ह.भ.प. दिगंबरबुवा नाईक, नागपूर

८. परिसंवादात सर्वांशी चांगल्या प्रकारे संवाद साधता आला. – ह.भ.प. पंकज महाराज सुतार, सांगली

वैशिष्ट्यपूर्ण

१. ‘विठाई बस’वरील श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबना थांबवण्यासाठी परिवहन मंडळाला सर्वांनी एकत्रितपणे निवेदन देण्याचे ठरवले.

२. कीर्तनकारांची पाक्षिक बैठक नियमित घेण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली.

३. राष्ट्र-धर्म यांच्या आघातांच्या संदर्भातील विषय कीर्तनामध्ये मांडण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली.

कीर्तन आणि प्रवचने यांत सांगितल्या जाणार्‍या कृती भक्तांकडून होण्यासाठी त्यांचा आढावा घ्या ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पू. अशोक पात्रीकर

समारोप करतांना सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर कीर्तनकारांना म्हणाले, ‘‘कीर्तनाद्वारे तुम्ही भरकटलेल्या समाजाला दिशादर्शन करून भवसागरातून पार करण्याचा मार्ग दाखवता. साप्ताहिक प्रवचनांमध्ये भक्तांना धार्मिक कृती करण्यास सांगून त्यांच्याकडून सप्ताहभर ती कृती होण्यासाठी त्यांचा आढावा घ्यावा. समाजाला आधार देणार्‍या पवित्र कार्याची गती वाढवावी, तसेच अधिकाधिक युवकांना धर्मशिक्षण द्यावे.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *