Menu Close

कालाय तस्मै नमः ।

काही दिवसांपूर्वी पुरी पिठाचे शंकराचार्य जगद्गुरु निश्चलानंद सरस्वती यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये संदेश देतांना पुढील आशयाची विधाने केली, ‘सध्या येणार्‍या नैसर्गिक आपत्ती या मानवाच्या अधर्माचरणामुळे येत आहेत. सर्वांनी सनातन धर्माचा पुरस्कार केला, तर चांगले दिवस दूर नाहीत. एक दिवस भारत जगाला दिशा दाखवेल. राज्यकर्त्यांनी अजूनही सावध झाले पाहिजे. आमचे बोल खरे ठरतात. काळ पालटणार आहे.’ ‘काळ हा शक्तीशाली असल्याने त्याला नमस्कार असो’, असे सांगितले जाते. आता हा काळ पालटत असून हिंदु राष्ट्राची पहाट दूर नाही. पूर्वी समाजाला साधना रूचत नसे. आता मात्र स्थिती पालटली आहे. त्याची काही उदाहरणे आपण अभ्यासली पाहिजेत. अलीकडेच लोकप्रिय मालिका प्रसारित करणारी एक अत्यंत प्रतिथयश वाहिनी काही मासांपूर्वी डबघाईला आली होती. त्याच वेळी देवतांची एक मालिका या वाहिनीवर प्रसारित होऊ लागली. त्यानंतर तिचा ‘टी.आर्.पी.’ एवढा वाढला की, त्या वाहिनीवर आता प्रतिदिन २ – ३ आध्यात्मिक मालिका चालू झाल्या आहेत.

दळणवळण बंदी चालू झाल्यापासून ‘ऑनलाईन आध्यात्मिक सत्संग’ ऐकणार्‍यांमध्ये सहस्रोंच्या संख्येने वाढ झाली. रामायण आणि महाभारत या मालिका मोठ्या प्रमाणात पुन्हा पाहिल्या गेल्या.

समझौता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोटाच्या अन्वेषणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍याने नुकत्याच दिलेल्या त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या त्यागपत्रात लिहिले, ‘मला कृष्णभक्तीत तल्लीन व्हायचे आहे.’ ही सारी उदाहरणे कशाची द्योतक आहेत ? जसा आपत्काळ परिसीमा गाठत आहे, तसे समाजातील भक्तीचा पिंड असणार्‍यांची भक्ती वाढत आहे, तर अधर्मियांची सिंहासने डळमळू लागली आहेत. हे सारे आशेचे किरण सर्वत्र दिसत असले, तरी अजूनही मोठ्या कठीण काळाला सर्वांना तोंड द्यायचे आहे आणि ‘काळाला संपूर्णपणे शरण गेलो, तर तो सुसह्य होणार आहे’, असे सर्व संत सांगत आहेत.

काळ कठीण आहे…!

जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी ‘बुडीत अधिकोषात ठेवलेल्यांचे ५ लाख रुपयांपर्यंतचे पैसे ९० दिवसांत परत मिळतील’, असे केंद्रशासनाने घोषित केले आहे. याचाच दुसरा अर्थ काय आहे ? सध्या मोठ्या प्रमाणात अधिकोषांतील घोटाळे बाहेर पडत आहेत आणि यापुढेही ते पडणार आहेत. ३ वर्षांपूर्वी कुणी सांगितले असते की, आख्खे जग तोंडाला पट्ट्या बांधून फिरेल किंवा मुंबईत लोकलगाड्या थांबतील, तर कुणी तरी विश्वास ठेवला असता का ? तसेच हे अविश्वसनीय आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाचे प्रतिदिन १ लाखांहून अधिक रुग्ण मिळत असल्याने पुन्हा हीच स्थिती भारतात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. महामारी आणि नैसर्गिक आपत्ती यांच्या रौद्र रूपाने सध्या जगभरातील जनता पूर्ण भरडली गेली आहे. आपत्काळाची झळ बसली नाही, असा जगातील एकही माणूस नाही. महामारी आणि बेरोजगारी यांचे संकट घोंगावत असतांनाच गेले आठवडाभर देशातील विविध राज्यांत आणि महाराष्ट्रात आलेल्या मुसळधार पावसाच्या संकटाने होत्याचे नव्हते केले. केवळ द्रष्टे संतच नव्हे, तर युद्धतज्ञ आणि वैज्ञानिक हेही जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे सांगत असल्याने वाहिन्यांवरील या वृत्तांचे प्रमाणही वाढले आहे. सद्य:स्थितीत तालिबान्यांनी अर्ध्याहून अधिक अफगाणिस्तान गिळंकृत केला आहे आणि तेथील अडीच लाखांहून अधिक जनता निर्वासितांचे अत्यंत क्लेशदायी, दयनीय आणि भयग्रस्त जीवन कंठत आहे. तालिबानी आतंकवादी जगासाठी धोकादायक ठरणार, असे चित्र आहे.

वासे उलटे फिरू लागले आहेत !

धर्मांतर अणि लव्ह जिहाद यांच्या घटना वाढत आहेत. त्यांच्या विरोधात आता निदान आवाज तरी उठवला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून माध्यमे ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’ हे शब्द वापरून वृत्ते देऊ लागली आहेत आणि त्यांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात सनातन धर्माच्या व्यापक अंगाचे दर्शन अधूनमधून घडत असते. त्यामुळे ‘ते सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करतात’, याचे भान जनतेला आहे. सध्या अधर्मीवाद्यांकडून ऋषिमूनींच्या ज्ञानाला ‘छद्म’ (खोटे) ठरवले जात आहे. ऋषिमुनींच्या ज्ञानाने पावन झालेल्या या धरतीवर त्या ज्ञानाला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आता जवळ आली आहे. आजही महाराष्ट्रातील इयत्ता पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या पूर्ण मुखपृष्ठवर डार्विनच्या सिद्धांताचे ‘माकडाचा मानव कसा झाला’, हे चित्र आहे. सार्‍या जगाने डार्विनचा सिद्धांत खोटा ठरवून वर्षे लोटली, तरी भारतातील विद्यार्थ्यांना कुठले शिक्षण मिळत आहे ? हे खरे ‘पुरातन’ शिक्षण नव्हे का ? आणि हे पालटण्याची वेळ आता आली आहे. आपण आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांच्या भांडणात गुंतलो आहोत अन् विदेशात दोघांच्या संयोगाने उपचारपद्धती चालू आहेत. सध्या धर्म आणि अधर्म यांचा तराजू तोलला जात आहे. अधर्माने परमावधी गाठली गेल्याने काळाच्या नियमानुसार परत एकदा सनातन धर्माच्या विजयाची गुढी लवकरच उभारली जाण्याची शुभचिन्हे दिसू लागली आहेत. जगातील स्वार्थ आणि अहं यांमुळे बळावलेल्या दुर्जनतेचा अंत त्यात होणार आहे. आज सभोवताली कितीही अराजक माजलेले दिसले, लोक एकमेकांच्या जीवावर उठलेले असले, विविध देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असलेले दिसले, नैसर्गिक आपत्तींनी रुद्रावतार धारण केला असला, तरी पृथ्वीच्या पाठीवर जिथे जिथे म्हणून लोक साधना करत आहेत, देवाला शरण जाऊन भजत आहेत, तिथे तिथे ते सुरक्षित आहेत, असे अनुभवाला येत आहे. सर्वाधिक युवा संख्या असलेला, उत्तम नैसर्गिक स्थिती आणि जगाच्या तुलनेत सर्वाधिक सहिष्णुता असलेल्या भारत देशाकडे जग आशेने पहात आहे. भारतियांनी याचे भान ठेवून आत्मबळ वाढवण्यासाठी साधनेचे प्रयत्न वाढवले पाहिजेत. त्यामुळेच कठीण काळात तरून जाण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होऊन जग त्यांचे अनुयायी बनेल !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *