Menu Close

… मग सावित्री नदीत वाहून गेलेल्या ४० हून अधिक जणांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ? – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

  • सावित्री नदी दुर्घटना प्रकरणी चौकशी आयोगाकडून सर्वांना ‘क्लीन चीट’ (निर्दाेषत्व) देण्याच्या धक्कादायक प्रकाराविषयी समितीचा रोखठोक प्रश्न !

  • पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चौकशी आयोगावर ताशेरे !

डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार, समितीचे मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी आणि समितीच्या सौ. विशाखा आठवले

रायगड – २ ऑगस्ट २०१६ या दिवशी झालेल्या अतीवृष्टीत सावित्री नदीवरील पूल वाहून गेला होता. त्यात २ बस आणि १ चारचाकी गाडी वाहून गेल्याने ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रशासनाच्या गंभीर चुका ढळढळीत दिसत असतांना चौकशी आयोगाने सर्वांना ‘क्लीन चीट’ (निर्दाेषत्व) दिली. हा दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार असून याला ‘क्लीन चीट’ नव्हे; तर ‘चिटींग क्लीन’ (स्पष्टपणे फसवले) म्हणायला हवे. हा अहवाल दुर्घटनाग्रस्तांवर अन्याय आहे. एका संवेदनशील घटनेचे अन्वेषण करण्यासाठी नियुक्त केलेला आयोगच जर दोषींना पाठीशी घालून असंवेदनशीलता दाखवत असेल, तर मग सावित्री नदीत वाहून गेलेल्या ४० पेक्षा अधिक जणांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ? असा सडेतोड प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केला आहे. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेला ५ वर्षे पूर्ण होऊनही दोषींवर कारवाई झाली नाही, या विषयाला वाचा फोडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तत्कालीन सरकारने ५ वर्षांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेच्या न्यायालयीन अन्वेषणासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शहा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एक सदस्यीय आयोगाने ३० नोव्हेंबर २०१७ या दिवशी अहवाल सादर केला; मात्र यामध्ये दुर्घटनेतील गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आयोगाच्या या अहवालाची तज्ञांकडून पुनर्पडताळणी करण्यात यावी आणि या दुर्घटनेसाठी उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी या वेळी डॉ. धुरी यांनी केली.

पत्रकार परिषदेला त्यांच्यासमवेत हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार अन् समितीच्या सौ. विशाखा आठवले उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेची प्रस्तावना सौ. विशाखा आठवले यांनी केली.

आयोगाची फलनिष्पत्ती काय ?

उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, त्यांच्या साहाय्यासाठी सचिव, स्वीय साहाय्यक आणि वरिष्ठ अधिवक्ता यांची नियुक्ती करून, तसेच त्यांचे वेतन, भत्ते, कार्यालयीन दुरुस्ती यांवर लाखो रुपयांचा व्यय करूनही आयोगाने या सर्व गंभीर गोष्टींविषयी कुणावरही ठपका ठेवलेला नाही. वेतन आणि कार्यालयीन असा आयोगाचा व्यय अनुमाने २४ लाख रुपयांहून अधिक झाला. त्यात अहवाल सादर करण्यासाठी आयोगाला ६ मास असतांना आणखी २ वेळा प्रत्येकी ३ मासांची मुदतवाढ देण्यात आली. एवढ्या कालावधीत आयोगाने सादर केलेला अहवाल हा पीडितांना न्याय देणारा असेल, अशी आशा होती; मात्र आयोगाने सुचवलेल्या उपाययोजना अगदी प्राथमिक स्तराच्या आहेत, उदा. पुलावर फलक लावणे, पुलावरील छोटी झाडे काढणे, धोक्याची पातळी दाखवणारे रंग देणे इत्यादी. ‘या सूचना सामान्य व्यक्तीनेही सुचवल्या असत्या. त्यासाठी आयोगाची काय आवश्यकता होती ?’ असा प्रश्नही डॉ. धुरी यांनी विचारत आयोगाचे पितळ उघडे पाडले.

आणखी दुर्घटना घडल्यानंतर धोकादायक पुलांची दुरुस्ती करणार का ? – सागर चोपदार, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

जुलै २०२० मध्ये देशाच्या महालेखापालांनी पुलाच्या देखभालीचे नियोजन नसल्याचे नमूद केले आहे; मात्र आजही स्थिती पालटलेली नाही. रायगड जिल्ह्यातील नागोठणे, रोहा, रेवदंडा, खारपाडा आदी पुलांवर अद्याप कोणतेही फलक लावलेले नाहीत, ना तेथे प्रकाशाची (वीजेच्या खांबांची) व्यवस्था आहे. रोहा आणि नागोठणे येथील पूल तर डागडुजीला आले आहेत. सावित्री पुलावरील दुर्घटनेनंतर आयोगाने पुलांच्या दुरुस्तीच्या केलेल्या शिफारसींवर ४ वर्षांनंतरही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे असे आयोग स्थापन करून त्यांच्या शिफारसी बासनात गुंडाळण्यात येत असतील, तर ही जनतेची फसवणूक आहे. सावित्री नदीवरील दुर्घटनेप्रमाणे भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास पुन्हा ‘आयोगाचा फार्स’ करणे आणि त्यावर लाखो रुपयांचा व्यय करून अहवालात दोषींना ‘क्लीन चीट’ देण्याचे उद्योग चालू ठेवणे राज्याला परवडेल का ? याचा विचार व्हायला हवा.

पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी जाणून घेतली येणार्‍या आपत्काळाविषयी माहिती !

वैद्य उदय धुरी यांनी पत्रकार परिषदेत ‘येणारा काळ हा ‘आपत्काळ’ असेल’, असे अनेक संतांनी सांगितले असल्या’चा उल्लेख पत्रकार परिषदेत केला. परिषद झाल्यानंतर काही पत्रकारांनी ‘संतांनी आपत्काळाविषयी काय सांगितले आहे ?’ याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा दाखवली. वैद्य धुरी आणि श्री. चोपदार यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली, तसेच आपत्काळाच्या दृष्टीने सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कोणती सिद्धता करण्यास सांगितली आहे, याविषयीही विस्ताराने सांगितले. या प्रसंगी प्रथमोपचार प्रशिक्षण, स्वरक्षण प्रशिक्षण, औषधी वनस्पतींची लागवड, आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता यांविषयी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांची माहितीही पत्रकारांना देण्यात आली.

अद्यापही रायगड जिल्ह्यातील पुलांची दुरवस्था कायम !

या पुलांच्या दुरुस्तीसाठी प्रशासन आणखी कोणत्या दुर्दैवी घटनेची वाट पहात आहे ?

विजेच्या खांबांची व्यवस्था नसलेला आणि छोटी झुडपे उगवल्यामुळे ढासळण्याच्या स्थितीत असलेला नागोठणे येथील जुना पूल (यावरून अद्यापही वाहतूक चालू आहे.)

बांधकामाला भेगा गेलेले (भेग गोलात दाखवली आहे.) आणि केवळ विजेचे खांब उभे करून त्यावर दिव्यांची सोय नसलेला खारपाडा येथील पाताळगंगा नदीवरील पूल (या पुलावर मोठे खड्डेही पडलेले आहेत.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *