Menu Close

केवळ विवाहासाठी धर्मांतर करणे अयोग्यच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

न्यायालयाकडून जोधा-अकबर यांचे उदाहरण

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अकबर आणि जोधाबाई यांनी धर्मांतर न करता विवाह केला. त्यांनी एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही. धर्म आस्थेचा विषय आहे आणि तो आपली जीवनशैली दर्शवतो. ईश्‍वराप्रती भाव प्रकट करण्यासाठी एखादी विशिष्ट पूजा पद्धतच असणे आवश्यक नाही. विवाह करण्यासाठी समान धर्माचे असणेही आवश्यक नाही. केवळ विवाहासाठी धर्मांतर करणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे मत व्यक्त करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने विवाहाच्या वेळी धर्मांतरापासून दूर रहाण्याचा सल्ला दिला.

उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यात जावेद याने एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला होता. त्याने मुलीचे धर्मांतर करण्यासाठी कागदावर तिची स्वाक्षरी घेतली होती. तिचे धर्मांतर केल्यानंतर त्यांचा विवाह झाला; मात्र या मुलीने न्यायदंडाधिकार्‍यांपुढे तिची फसवणूक झाल्याचे म्हटले. त्यामुळे जावेद याला अटक करण्यात आली. या अटकेवर जामीन मिळण्यासाठी जावेदने अर्ज केला. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील मत व्यक्त केले.

१. उच्च न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकारच्या धर्मांतरात धर्माविषयी विशेष आस्था नसते. हा निर्णय केवळ दबाव, भीती आणि लालसा यांपोटी घेतला जातो. केवळ विवाहासाठी धर्मांतर चुकीचे आहे. यास काही घटनात्मक मान्यता नसते. वैयक्तिक लाभासाठी केले गेलेले धर्मांतर हे केवळ वैयक्तिक हानीच करत नाही, तर ते देश आणि समाज यांसाठीही घातक असते. अशा प्रकारच्या धर्मांतराच्या घटनांमुळे धर्माच्या ठेकेदारांना बळ मिळते आणि विघटनकारी शक्तींना प्रोत्साहन मिळते.

२. न्यायालयाने या याचिकेवरील निर्णयात म्हटले की, धर्म श्रद्धेचा विषय असतो. कुणीही त्यांच्या पूजा पद्धतीनुसार ईश्‍वराविषयी श्रद्धा व्यक्त करू शकतो. विवाह करण्याामध्ये कोणती पूजा पद्धत अथवा धर्म आड येऊ शकत नाही. धर्मांतर न करताही विवाह केला जाऊ शकतो.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *