Menu Close

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद गांधी यांचे निधन !

  • ५० वर्षांहून अधिक काळ अविरतपणे हिंदूसंघटनाचे कार्य !

  • पितृछत्र हरपल्याची सातारा जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांची भावना !

अधिवक्ता गोविंद गांधी

सातारा – अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद पुखराज गांधी (वय ७१ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ३ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. ते राजस्थान दौर्‍यावर असतांना जयपूर येथे ही घटना घडली. ५० वर्षांहून अधिक काळ तन, मन आणि धन यांचा त्याग करून अविरतपणे हिंदूसंघटनाचे कार्य करणार्‍या अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या निधनामुळे सातारा जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये पितृछत्र हरपल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा उमेश गांधी, २ मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

४ ऑगस्ट या दिवशी त्यांचे पार्थिव शाहूपुरी (सातारा) येथील देशपांडे मारुती जवळील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर दुपारी १.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घालून दिलेले कोरोनाचे सर्व नियम पाळून शोकसभा घेण्यात आली. या वेळी गांधी यांचे कुटुंबीय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या निधनाने हिंदुत्वाच्या कार्यात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद गांधी हे देव, देश आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात तळमळीने कार्य करणारे हिंदु महासभेचे नेते होते. हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, मंदिर सरकारीकरण कायदा, देवतांचे होणारे विडंबन किंवा सातारा येथे धर्मद्रोही संघटनांकडून घेण्यात आलेली मूर्तीदानासारखी अशास्त्रीय मोहीम यांविरुद्धच्या आंदोलनांमध्ये ते स्वत: सहभागी होत किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवत असत. अखंड हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे आणि हिंदूंचे संघटन व्हावे, यांसाठी त्यांनी भारतभर भ्रमण केले आहे. या प्रवासात त्यांनी अनेक लोकांना जोडले. ते केवळ एक अधिवक्ताच होते असे नाही, तर ते एक अधिवक्त्यांचे संघटन करणारे कुशल संघटक, तसेच नेतृत्व करणारा उत्तम कार्यकर्ताही होते. अधिवक्ता गांधी यांच्या निधनाने हिंदुत्वाच्या कार्यात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या अंत्यसंस्कारानंतर झालेल्या शोकसभेमध्ये विविध मान्यवरांनी व्यक्त केलेली मनोगते

१. श्री. अनुपजी केणी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय हिंदु महासभा – अधिवक्ता गोविंद गांधी ५० वर्षांहून अधिक काळ हिंदु महासभेमध्ये कार्यरत होते. ७१ वर्षांचा हा युवक निघून गेल्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

२. श्री. धनराज जगताप, सातारा जिल्हाध्यक्ष, हिंदु महासभा – अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या निधनामुळे सातारा हिंदु महासभेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.

३. श्री. दत्तात्रेय सणस, माजी सातारा जिल्हाध्यक्ष, हिंदु महासभा – स्वभावाने अत्यंत प्रेमळ, नम्र आणि शिस्तप्रिय असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गेल्यामुळे आम्ही पोरके झालो आहोत.

४. श्री. मिलिंद एकबोटे, माजी नगरसेवक, प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा गोरक्षक, पुणे – सातारा येथील कोणत्याही कार्यासाठी आम्ही हक्काने अधिवक्ता गोविंद गांधी यांच्याकडे येत होतो. राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म यांतील जाणकार व्यक्तीमत्त्व हरपले, याचे आम्हाला अतीव दुःख होत आहे.

५. श्री. निमिषजी शहा, शिवसेना, सातारा – माझे सासरे, तसेच सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ आणि भक्त अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या अकाली निधनाने आमचा मोठा आधार गेला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *