Menu Close

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ या तेलुगु चित्रपटातून आदी शंकराचार्य लिखित ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ स्तोत्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे विडंबन !

हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघटित प्रयत्नांमुळे चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला !

चित्रपटाच्या दिग्दर्शकाची जाहीर क्षमायाचना !

  • धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अभिनंदन ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात
  • केवळ हिंदीच नव्हे, तर भारतभरातील विविध भाषांतील चित्रपटांमध्ये हिंदूंच्या देवतांचे सर्रास विडंबन केले जाते. हे रोखण्यासाठी कठोर कायदेच हवेत ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात

भाग्यनगर – ‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ (आता नाहीतर केव्हा ?) या तेलुगु चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रसारित झाला. त्यातील एका अश्लील दृश्यामध्ये आदि शंकराचार्य लिखित ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ या पवित्र संस्कृत स्तोत्राचा पार्श्वसंगीत म्हणून वापर करण्यात आला होता, तसेच एका संभाषणातून भगवान श्रीकृष्णाचेही विडंबन करण्यात आले होते. या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटितपणे प्रयत्न केले. त्यानंतर या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्यात आला असून या चित्रपटाच्या दिग्दर्शकानेही जाहीर क्षमायाचना केली आहे.

१. एक ऑगस्ट या दिवशी सकाळी ‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित झाला. त्यात ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ या पवित्र संस्कृत स्तोत्राचे विडंबन करण्यात आल्याचे लक्षात आले. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन जनार्दन यांनी एका ‘व्हॉट्सॲप’ गटामध्ये ‘पोस्ट’ पाठवली आणि संघटितपणे कृती करण्याचे आवाहन केले.

२. त्याच दिवशी हिंदु जनजागृती समिती, श्री आदीबटला श्री कला पीठम्, श्रीरामराज्यम् आध्यात्मिक चैतन्य वेदिका, हरेकृष्ण फाऊंडेशन आदी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ‘तेलुगु फिल्म प्रोड्युसर कौन्सिल’चे (तेलुगु चित्रपट निर्माता परिषदेचे) सचिव प्रसन्न कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर प्रसन्न कुमार यांनी पुढाकार घेऊन तात्काळ चित्रपटाच्या निर्मार्त्यांशी चर्चा केली आणि संबंधित चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्यास सांगितले.

३. चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांविषयी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला माहिती देण्यात आली. ‘मंडळानेही हे विडंबन थांबवण्यास सांगू’, असे आश्वासन दिले.

४. त्याच दिवशी सायंकाळी या चित्रपटाशी संबंधित पदाधिकार्‍यांनी हिंदुत्वनिष्ठांना त्यांच्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावले. या वेळी त्यांनी या चित्रपटात स्तोत्राचा अयोग्य ठिकाणी वापर करण्यात आल्याविषयी क्षमायाचना केली आणि त्यांच्या चित्रपटातून आक्षेपार्ह भाग काढून टाकत असल्याचे सांगितले.

५. त्यानंतर ‘आदित्य म्युझिक’, ‘एम्.एस्. एन्टरटेन्मेंट’ या यू ट्यूब वाहिन्यांवर असलेल्या या चित्रपटातील ट्रेलरमधून आक्षेपार्ह भाग वगळण्यात आल्याचे आढळून आले.

६. ‘तेलुगु फिल्म प्रोड्युसर कौन्सिलचे (‘टी.एफ्.पी.सी.’चे) सचिव प्रसन्न कुमार यांनी ‘टी.एफ्.पी.सी.’च्या अधिकृत ‘यू ट्यूब’ वाहिनीवर ‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ या चित्रपटातून ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ या स्तोत्राचा अयोग्य वापर करण्यात आला होता. या चुकीविषयी आम्ही क्षमायाचना करतो’, अशा आशयाची चित्रफीत प्रसारित केली.

७. चित्रपटाचे दिग्दर्शक वाय. युगांधर यांनीही क्षमा मागणारी एक चित्रफीत सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केली.

क्षणचित्रे

१. चित्रपटातील विडंबानाविषयी माहिती एका ‘व्हॉट्सॲप’ गटामध्ये पाठवल्यानंतर त्याला ‘श्रीरामराज्यम् आध्यात्मिक चैतन्य वेदिका’ या संघटनेचे अध्यक्ष श्री. अंडकोंड रमूडु यांनी त्वरित प्रतिसाद दिला.

२. चित्रपट अभिनेत्री कराटे कल्याणी या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी संबंधित चित्रपटातील आक्षेपार्ह भागाविषयी हिंदुत्वनिष्ठांना घरी बोलावून चर्चा केली. हे विडंबन हटवण्याविषयी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.

३. या विडंबनाविषयी अनेक धर्मप्रेमींनी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संबंधित ‘यू ट्यूब’ वाहिनीकडे निषेध नोंदवला.

४. केवळ ६ घंट्यांमध्ये चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनी क्षमायाचना करून ‘यू ट्यूब’वरून चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळले. याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता केली.

चित्रपटामध्ये श्रीकृष्णाचे अश्लाघ्य विडंबन !

चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये पती-पत्नी यांच्यात संवाद आहे. यात पती पत्नीला स्वत:च्या मुलाला श्रीरामाप्रमाणे वेशभूषा करायला सांगतो. पत्नी मात्र मुलाला श्रीकृष्णाप्रमाणे वेशभूषा करते. त्या वेळी पती पत्नीला सांगतो, ‘श्रीराम हा एकबाणी आणि एकपत्नी होता. श्रीकृष्णाच्या हातात बासरी आहे. बासरीला जशी भोके असतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णाला १६ सहस्र ‘भोके’ होती.’ (श्रीकृष्णाला १६ सहस्र पत्नी होत्या, हे त्याने अत्यंत अश्लाघ्य पद्धतीने सांगून श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले.)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *