पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन राष्ट्रीय अध्यक्ष, तर अधिवक्त्या रंजना अग्निहोत्री संस्थापक अध्यक्षा !
हिंद साम्राज्य पक्षाला सर्व हिंदूंचे समर्थन मिळून हिंदु राष्ट्राचे ध्येय लवकर पूर्ण होईल, अशी शुभेच्छा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
नवी देहली – सर्वाेच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता पू. हरिशंकर जैन यांच्या अध्यक्षतेखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘हिंद साम्राज्य पार्टी’ या पक्षाची अधिकृतरित्या स्थापना करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन यांनी ही घोषणा केली. या वेळी संस्थापक अध्यक्षा अधिवक्त्या रंजना अग्निहोत्री, सचिव आणि राष्ट्रीय संयोजक श्री. जितेंद्रसिंह बिसेन आणि राष्ट्रीय सहसंयोजक श्री. सुबेसिंह यादव हे उपस्थित होते.
हिंद साम्राज्य पक्षाची ध्येयधोरणे
१. भारताच्या पुण्यभूमीवर सनातन धर्मावर आधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि ८०० वर्षांच्या गुलामीचे दोरखंड फेकून देण्यासाठी हिंद साम्राज्य पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय परिवर्तन करण्यासाठी हिंदु वीर आणि वीरांगना यांना राष्ट्राच्या वर्तमान स्थितीमध्ये आमूलाग्र पालट करण्यासाठी, तसेच सांस्कृतिक मूल्यांना प्राप्त करण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
२. आमचा संकल्प आहे की, हा पक्ष वर्तमान राजकीय पक्षांपेक्षा वेगळा असेल. जनता जनार्दनामध्ये प्रखर राष्ट्रवादाची भावना निर्माण केली जाईल, देशाच्या सीमा सुरक्षित होतील, देशाची गेलेली भूमी परत आणली जाईल, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वाभिमान ठेवून स्वतःचे अस्तित्व स्वीकारत अन्य देशांशी संबंध स्थापन करण्यात येतील.
३. आजचा तरुण शिक्षणक्षेत्रामध्ये परिवर्तन मागत आहे. त्याला रोजगार देणारे शिक्षण हवे आहे. त्यातून तो चरितार्थ चालवू शकेल. त्यामुळे सध्याच्या प्रणालीमध्ये आमूलाग्र पालट करण्याची आवश्यकता आहे. या पालटाद्वारे प्रत्येक करदात्याचा सन्मान होईल. सामान्य जनता कराच्या दबावाखाली भरडली जाणार नाही आणि तिच्या धनाचा योग्य वापर केला जाईल.
४. देशात हरित क्रांती आवश्यक आहे, तसेच शेतकर्यांना निःशुल्क वीज, खत, पाणी, औषध आणि निवास यांसारख्या मूलभूत सुविधा मिळायला हव्यात.
५. कोणत्याही क्षेत्रामध्ये कर्मचारी आणि कामगार यांचे शोषण होऊ नये. त्यांना योग्य वेतन आणि निवृत्ती वेतन मिळावे, सुरक्षा मिळावी, यांसाठी पक्ष संघर्ष करील.
६. बहुसंख्य हिंदू त्यांच्या सांस्कृतिक वारसांची पुनर्स्थापना करू इच्छित आहेत. वर्ष १९९२ नंतर तोडण्यात किंवा नष्ट करण्यात आलेली मंदिरे, धार्मिक स्थळे आणि मठ यांची पुनर्स्थापना करण्यात यावी, हे लक्ष्य आहे. बहुसंख्य हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे. हिंदूंचे अहित करणारे कायदे रहित करणे प्राधान्य असेल.
७. जोपर्यंत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नवीन राज्यघटना बनवली जात नाही, तोपर्यंत आपल्याला सध्याच्या राज्यघटनेच्या अंतर्गत जनतेला न्याय देण्यासाठी संघर्ष करावा लागेल.
८. धार्मिक अल्पसंख्यांकांना राज्यघटनाविरोधी पद्धतीने दिलेले लाभ समाप्त करणे आमचे पहिले प्राधान्य असेल.
९. राज्यघटनेचे कलम ३०, वक्फ कायदा, वक्फ कौन्सिल, अल्पसंख्यांक मंत्रालय, पूजा स्थळ (विशेष) अधिनियम १९९१ आदी कायदे रहित करण्यासाठी पावले उचलली जातील.
१०. श्रीरामजन्मभूमीप्रमाणेच मथुरा, काशी आणि भोजशाला (धार, मध्यप्रदेश) येथील मंदिरे मुक्त करणे प्राधान्य असेल.
११. धार्मिक अल्पसंख्यांकांना राज्यघटनेच्या आधारे अनुरूप आरक्षणाचा लाभ देता येऊ शकत नाही. यामुळे धार्मिक अल्पसंख्यांकांना मागासवर्गियांच्या सूचीतून बाहेर काढून केवळ अनुसूचित जाती-जमाती यांनाच आरक्षणाचे लाभ दिले जातील.
१२. न्यायपालिका पंगू होत आहे. निर्धन लोक न्यायापासून वंचित होत आहेत. न्यायाधिशांची नियुक्ती, सरकारी अधिवक्त्यांनी नियुक्ती, तसेच न्यायिक प्रकियेमध्ये परिवर्तन करून ती निष्पक्ष करावी लागेल. त्यामुळे जनतेला निष्पक्ष न्याय मिळेल.
आमच्या या कार्यात आणि महान रक्तहीन क्रांतीत भागीदार व्हा अन् देशातील जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देण्यासाठी, तसेच न्यायिक प्रक्रियेला जनताभिमुख बनवण्यासाठी आम्हाला साहाय्य करा, असे आवाहन पक्षाने केले आहे.
हिंदु राष्ट्राचा उद्देश हिंदूंचा विकास असेल ! – पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन
जे हिंदु राष्ट्राची गोष्ट करतील, ते आमच्या समवेत असतील. निवडणुका लढवल्या जातील; मात्र कोणत्याही पक्षाला समर्थन करून मंत्री बनणार नाही. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर शासन चालवण्यात येईल. याचा उद्देश हिंदूंचा विकास असेल. हिंदुत्वाचे सूत्र असेल. शासन आल्यावर ‘घरवापसी’चा (धर्मांतरित हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्याचा) कार्यक्रम केरळमधून चालू करण्यात येईल. राजकीय भ्रष्टाचार समाप्त केला जाईल, असे प्रतिपादन पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केले.
‘हिंद साम्राज्य पार्टी’च्या वाटचालीस शुभेच्छा ! – सनातन संस्था
अध्यात्मप्रसार करणार्या सनातन संस्थेचे समष्टी ध्येय हिंदु राष्ट्राची स्थापना हे असून याकरिता संस्था आध्यात्मिक स्तरावर कार्यरत आहे. ‘हिंद साम्राज्य पार्टी’ हिंदु हितासाठी हिंदूंचे संघटन करेल. हिंदु राष्ट्राकडे मार्गक्रमण करणार्या पक्षाच्या मंदिररक्षण, संस्कृतीरक्षण इत्यादी विषयांवरील कार्यक्रमांमधून हिंदु राष्ट्राची स्थापना होवो, ही ईश्वचरणी प्रार्थना आणि ‘हिंद साम्राज्य पार्टी’च्या वाटचालीस शुभेच्छा ! – कु. कृतिका खत्री, प्रवक्त्या, सनातन संस्था
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात