Menu Close

छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रीय विचारांची आज देशाला नितांत आवश्यकता आहे ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

पुणे – इतिहासासह आपण जगत असतो. त्यामुळे इतिहास कधीच जुना होत नाही, तर नेहमीच ताजा असतो. छत्रपती शिवरायांनी प्रथम राष्ट्रीय विचार मांडला. आज देशाला राष्ट्रीय विचारांची नितांत आवश्यकता आहे. छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीयत्व हा स्थायीभाव झाला पाहिजे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ४ ऑगस्ट या दिवशी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांच्या कार्यासंदर्भात झालेल्या सर्व लिखाणाचा वापर वर्तमानकाळात व्हायला हवा. छत्रपती शिवरायांसंदर्भात वेगवेगळ्या पातळीवर संशोधन होत आहे. संशोधनासाठी अभ्यास महत्त्वाचा असतो याचे भान नवलेखकांनी बाळगले पाहिजे. शिवसृष्टीतून नव्या पिढीला छत्रपती कळले पाहिजेत, या उद्देशाने शिवसृष्टी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्याकडे डोंगरी, किनारी, सागरी, भुईकोट असे ३५२ किल्ले आहेत. त्यातील २९२ किल्ले मी पाहिले आहेत. आज किल्ल्यांची अवस्था बिकट आहे; मात्र संवर्धनासाठी जे करता येईल, ते केले पाहिजे. शिवकार्यासाठी मला आणखी काही वर्षे आयुष्य हवे आहे. माझी आई म्हणजे संस्कारांची शिदोरी होती. त्यामुळे माझे आई-वडील आणि माझ्यावर प्रेम करणारे लोक यांना मी कधीच विसरू शकणार नाही.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *