राजू यादव यांचे गांधीनगर येथील व्यापार्यांना आवाहन
चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन प्रत्येक व्यापार्यापर्यंत पोचवणारे शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांचे अभिनंदन !
प्रत्येक व्यापार्याने याला प्रतिसाद देत राष्ट्रकर्तव्य म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे अत्यावश्यक आहे !
गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) – गांधीनगर येथून कोकण, गोवा आणि कर्नाटक येथे मोठ्या प्रमाणात विविध वस्तू पाठवल्या जातात. गणेश चतुर्थी आणि दीपावली या सणांच्या निमित्ताने विद्युत् माळा, आकाशकंदील, तसेच विविध वस्तू यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. तरी गणेशोत्सव-दीपावली या निमित्ताने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनची आर्थिक नाकेबंदी करावी, अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी गांधीनगर येथील प्रत्येक व्यापार्याला दिले. निवेदन स्वीकारल्यावर व्यापार्यांनी चिनी वस्तू विक्रीला न ठेवण्याचे आश्वासन दिले.
व्यापार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनची जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ भारत देश असून चीन भारतीय बाजारपेठेत प्रत्येक वर्षी किमान ६२ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करतो. चीन नेहमीच भारतीय सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न करतो, तसेच चीन नेहमी पाकिस्तानला भारताच्या विरोधात साहाय्य करतो. त्यामुळे चीनची आर्थिक नाकेबंदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. यानंतरच्या काळात गणेशोत्सव आणि दीपावली या सणांच्या वेळी चिनी वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आढळल्यास शिवसेना पद्धतीने उत्तर देण्यात येईल.
या वेळी सर्वश्री राजू सांगावकर, विनोद खोत, बाळासाहेब नलवडे, विभागप्रमुख दीपक पोपटाणी, वीरेंद्र भोपळे, दीपक अंकल, दत्ता फराकटे, अशोक माने, प्रवीण जाधव, नितीन काळे, संजू सुतार, योगेश लोहार, शिवाजी लोहार यांसह अन्य उपस्थित होते.