लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्यांची साखळी असल्याचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा दावा
पर्यटन व्यवसायासमवेत गोव्यात गुन्हेगारीही वाढली, हे लक्षात घ्यायला हवे !
पणजी – केंद्रीय अन्वेषण विभागाने लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याविषयी अल्तामाश अन्सारी या मूळ मुंबई येथे रहाणार्या गोव्यातील हॉटेलमधील एका आचार्याला (‘शेफ’ला) अटक केली आहे. गोव्यात लैंगिक अत्याचाराला ३ मुले बळी पडली आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
हा ‘शेफ’ गोव्यात वर्ष २०१३ पासून कामाला आहे. त्याला २२ जुलै २०२१ या दिवशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने कह्यात घेतले. त्यापूर्वी उत्तरप्रदेशमधील चित्रकुट जिल्ह्यात ५ ते १६ वर्षे वयोगटातील ५० मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी एका कनिष्ठ अभियंत्याला केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली होती. त्याची चौकशी करतांना अन्सारीचे नाव समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्सारी मुलांवर लैंगिक अत्याचार करतांनाचे चित्रीकरण करून ती दृश्ये इतरत्र प्रसारित करत असे. गेल्या १५ वर्षांपासून हे गैरकृत्य चालू असून गुन्हेगारांची एक मोठी साखळी यासाठी कार्यरत असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने केला आहे. या अत्याचाराला बळी पडलेल्या गोव्यातील ३ मुलांचे समुपदेशन करण्यात आले आहे. सुदैवाने ही तिन्ही मुले सुरक्षित आहेत. यासमवेतच भारतात इतर ठिकाणी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या नोंदीनुसार वर्ष २०१८ पासून लहान मुले गायब होण्याचे प्रमाण वाढून ३१ टक्के झाले आहे. वर्ष २०१९ मध्ये ६२ मुले गायब झाल्याचे आढळून आले. यांपैकी ३७ मुलांचा शोध लागला आहे.