भविष्यात अशी स्थिती येऊ नये; म्हणून शासनकर्त्यांनी समाजाला साधना शिकवून त्यांच्यामध्ये संयम आणि नैतिकता निर्माण केली पाहिजे !
देशात सध्या ४ पुरुषार्थांपैकी केवळ ‘अर्थ’ आणि ‘काम’ यांचेच प्राबल्य वाढल्याने ‘धर्म’ अन् ‘मोक्ष’ यांचा कुणीही विचार करत नाही, याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत !
भोपाळ (मध्यप्रदेश) – भारत हा पुराणमतवादी समाज आहे. भारत अजून सामाजिक विचारसरणीमध्ये त्या स्तरावर पोचला नाही जिथे कोणत्याही धर्माची अविवाहित तरुणी केवळ मजा म्हणून तरुणांसमवेत शारीरिक संबंध ठेवेल. विवाहाचे किंवा भविष्यासंदर्भात काही आश्वासन दिले असेल, तर अशा गोष्टी घडू शकतात, असे मत भोपाळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुबोध अभ्यंकर यांनी एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले. या वेळी न्यायालयाने बलात्काराच्या प्रकरणामध्ये आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
लग्नाच्या हमीशिवाय भारतात अविवाहित मुली शरीरसंबंध ठेवत नाहीत : मध्य प्रदेश हायकोर्ट https://t.co/HXp67xvH3y #MadhyaPradesh | #HighCourt | #Indore | #SubodhAbhyankar | #Rape |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 15, 2021
१. न्यायाधीश सुबोध अभ्यंकर पुढे म्हणाले की, शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेण्याआधी तरुणानेही त्याचे काय परिणाम होतील, याची जाणीव ठेवली पाहिजे आणि काही अनपेक्षित झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी सक्षम असले पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये कायम तरुणींनाच त्रास सहन करावा लागतो; कारण गरोदर रहाण्याची आणि या नात्याविषयी समजले, तर समाजाकडून बोल लावले जाण्याची भीती तिला असते; मात्र तरुणांनीही होणार्या परिणामांचा विचार करून त्याला तोंड देण्यासाठी सिद्ध असले पाहिजे. केवळ संमतीने शारीरिक संबंध ठेवून नंतर तुम्ही तिला सोडू शकत नाही.
२. उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या या प्रकरणामध्ये आरोपी तरुणाने विवाहाचे आमीष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचा खटला होता. बलात्कार, अपहरण आदी कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला; मात्र आरोपीच्या अधिवक्त्यांंनी ‘मागील २ वर्षांपासून आरोपी आणि पीडित यांचे नाते होते. विवाहाच्या आश्वासनानंतर या २१ वर्षांहून अधिक वय असणार्या तरुणीने तिच्या इच्छेने शारीरिक संबंध ठेवले. ही तरुणी आता हे प्रकरण ३ वर्षांपूर्वी घडल्याचा बनाव करत आहे’, असा दावा केला.
३. या दोघांच्या पालकांनी दोघेही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने विवाहाला विरोध करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. ‘दोघांनाही परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवल्याने याला बलात्कार म्हणता येणार नाही’, असा युक्तीवाद करण्यात आला.
४. आरोपीने या तरुणीला ‘माझे दुसरीकडे लग्न ठरले असून मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही’, असे सांगितले. त्यानंतर या तरुणीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
५. न्यायालयाने ‘या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने ती या नात्याविषयी अधिक गंभीर होती आणि तिने केवळ मौजमजेसाठी शारीरिक संबंध ठेवले नव्हते’, असा निष्कर्ष काढत आरोपीला जामीन नाकारला. ‘बलात्कार पीडितेने प्रत्येक वेळी आत्महत्येचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते’, असेही न्यायालयाने म्हटले.