Menu Close

शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या साम्यवादी नेत्यांच्याविरोधात शासनाने फौजदारी खटले प्रविष्ट करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादांतर्गत ‘भारतातील साम्यवादी चीनचे गुलाम’ या विषयावर विशेष चर्चासत्र

पुणे – देशभक्तीपेक्षा कोणतीही विचारधारा मोठी असू शकत नाही; मात्र शत्रूराष्ट्र चीनशी मैत्री ठेवणार्‍या साम्यवादी विचारसरणीच्या नेत्यांना केवळ स्वत:ची विचारधारा महत्त्वाची वाटते. त्यांना भारताशी, तसेच भारतीय संस्कृतीशी काही देणे-घेणे नाही. एका बाजूला आपले सैनिक सीमेवर चीनविरोधात लढत आहेत, तर दुसर्‍या बाजूला ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ या पक्षाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चिनी दूतावासाने नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतातील प्रमुख साम्यवादी नेत्यांनी उपस्थित राहून चीन, तसेच चीनच्या धोरणांची प्रशंसा केली. हा देशद्रोहच आहे. हे कुठल्याही अतिरेकी कृत्यांपेक्षा कमी धोकादायक नसून भारत तोडण्याचे काम आहे. यातून साम्यवाद्यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे. केंद्र सरकारने या साम्यवादी नेत्यांच्या विरोधात फौजदारी खटले प्रविष्ट करावेत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता गौरव गोयल यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादांतर्गत ‘भारतातील साम्यवादी चीनचे गुलाम’ या विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात ‘युवा ब्रिगेड’चे मार्गदर्शक आणि लेखक श्री. चक्रवर्ती सुलिबेले अन् सनातन संस्थचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक हेही उपस्थित होते. हा कार्यक्रम सामाजिक माध्यमांद्वारे ३ सहस्र ७०० हून अधिक जणांनी पाहिला.

भारतातील साम्यवादी चीनचे हस्तक ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता गौरव गोयल

१. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो; परंतु शत्रूचा मित्र हाही आपला शत्रूच असतो. भारतातील साम्यवादी देशाच्या शत्रूशी म्हणजेच चीनशी मैत्री करतात. त्यामुळे ते एक प्रकारे भारताचे शत्रू आणि चीनचे हस्तक आहेत. ते भारताची संस्कृती, परंपरा आणि हिंदुत्व यांना विरोध करतात अन् केवळ साम्यवादी विचारसरणीशी निष्ठा दाखवतात.

२. चीनशी लागेबांधे असणारे साम्यवादी हे भारताचे नागरिक म्हणून अल्प, तर चीनचे गुप्तहेर म्हणून अधिक भूमिका निभावतात. भारतीय परराष्ट्र विभागाचे निवृत्त सचिव विजय गोखले यांनीही त्यांच्या पुस्तकात ‘चिनी साम्यवादी पक्ष भारतातील साम्यवादी पक्षांशी घनिष्ठ संबंध ठेवून त्याचा भारतीय धोरणांच्या विरोधात उपयोग करतात’, असा आरोप केला आहे.

३. साम्यवादी विचारसरणीने अनेक आतंकवादी विचारांना जन्म दिला असून ती विचारसरणी संपूर्ण जगाने धिक्कारली आहे. जगभरात जेथे साम्यवादी विचारसरणी उदयाला आली, तेथे या विचारसरणीच्या लोकांनी कोट्यवधी लोकांचा नरसंहार केला आहे.

४. चीनमध्येही मुसलमानांवर अत्याचार होतात; पण त्याविषयी हे साम्यवादी मौन बाळगतात, तसेच हेच साम्यवादी लोक हिंदूंचा प्रचंड तिरस्कार करतात. एकूणच साम्यवाद्यांचे वागणे, हा ढोंगीपणा आहे.

साम्यवाद्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत सतत प्रयत्नरत राहिले पाहिजे ! – चक्रवर्ती सुलिबेले, मार्गदर्शक आणि लेखक, युवा ब्रिगेड

चक्रवर्ती सुलिबेले

१. साम्यवाद्यांना त्यांच्या पक्षाचे सिद्धांत हे देशापेक्षा मोठे वाटतात. याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे, ‘जेव्हा पक्षाचे सिद्धांत हे देशभक्तीपेक्षा मोठे होतात, तेव्हा देशाच्या विभाजनाचे संकट येऊ शकते.’ त्याप्रमाणे भारतातील साम्यवादी देशापेक्षा आपले आणि आपल्या पक्षाचे सिद्धांत मोठे मानून भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. साम्यवाद्यांचा आतापर्यंतचा इतिहास भारताच्या विरोधातच आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई होईपर्यंत आपण सतत प्रयत्नरत राहिले पाहिजे.

२. हिंदूंचे धर्मांतर करणारे, जिहादी, माओवादी आणि नक्षलवादी हे एकत्रितपणे भारताच्या विरोधात कार्य करत आहेत. त्यांचा ढोंगीपणाचा बुरखा फाडायला हवा.

३. भारताला पूर्वीपासूनच म्हणजे अगदी काँग्रेसच्या राजवटीच्या काळातही चीनचा धोका होता. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात चीनच्या ‘चायनीज कम्युनिस्ट पक्षा’शी करार केला होता; मात्र हा करार कोणत्या सूत्रांवर झाला होता ? हे कधीही बाहेर आले नाही. यावर चर्चा झाली पाहिजे.

४. शिक्षणासह विविध क्षेत्रांत साम्यवाद्यांनी त्यांचे जाळे पसरवले असून ते भारताच्या बाजूने कधीच रहाणार नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.

चीनचे ‘स्लीपर सेल’ म्हणून कार्य करणार्‍या साम्यवाद्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

१. वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील. नक्षलवाद जन्माला घालणारे हे साम्यवादी चीनच्या ‘स्लीपर सेल’प्रमाणे (गुप्तपणे कार्य करणारे गट) काम करत आहेत. सरकारने या स्लीपर सेलची पाळेमुळे नष्ट करायला हवीत, तसेच केंद्रशासनाने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करायला हवी.

२. भारतातील साम्यवादी भारताशी नाही, तर चीनशी प्रामाणिक रहातात. या साम्यवादी पक्षांना चीन आणि रशिया या साम्यवादी देशांतून आर्थिक साहाय्य मिळते. त्याच्याच आधारे ते भारतविरोधी भूमिका घेतात. वर्ष २०२० मध्ये पत्रकार राजीव शर्मा यांना भारतीय गुप्तहेर संघटनेने त्यांनी चीनसाठी केलेल्या हेरगिरीच्या कारणासाठी अटक केली होती. त्यावरून साम्यवादी पत्रकारांनी वादंग निर्माण करत राजीव शर्मा निर्दोष असल्याचा कांगावा केला.

३. हिंदूंचे सण, धर्मग्रंथ यांपासून ते भारताच्या सीमेवरील विकासकामांना साम्यवादी सतत विरोध करत असतात. भारतात एकेकाळी साम्यवादी पक्षाचे ५७ टक्के खासदार निवडून येत होते; मात्र आज केवळ ५ ते ६ खासदार निवडून येतात. साम्यवाद्यांचे खरे स्वरूप समाजाला दिसून येत असल्याने त्यांची अशी अवस्था झाली आहे.

४. भारतातील साम्यवादी देशाचे तुकडे करणे यांसाठीच कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याच्या विरोधात येणार्‍यांना धडा शिकवला. आपणही महाराजांचा आदर्श समोर ठेवून विविध मार्गांनी देशाच्या विरोधात कार्यरत असणार्‍या साम्यवादी विचारसरणीच्या संघटना आणि पक्ष यांवर बंदी येईपर्यंत, तसेच ते कारागृहात जाईपर्यंत हा लढा चालू ठेवला पाहिजे. यासाठी साम्यवाद्यांच्या देशद्रोही कारवाया समाजासमोर आणण्यासाठी प्रत्येकाने जागृती आणि कार्य करण्याची आवश्यकता आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *