हिंदुु धर्माचे वैशिष्ट्य आणि परंपरा यांवर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश
बनारस हिंदु विश्वविद्यालयाची अभिनंदनीय कृती ! अशाच प्रकारचे अभ्यासक्रम देशातील अन्य विश्वविद्यालयांनीही चालू करणे आवश्यक. अशाने खर्या अर्थाने नीतीमान आणि चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण होईल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
काशी – बनारस हिंदु विश्वविद्यालय (बी.एच्.यू.) अभ्यास केंद्रामध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आधारित अभ्यासक्रमाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता वेद, पुराण, रामायण, महाभारत, दर्शन, स्थापत्य, लोकनाट्य, ज्ञान मीमांसा, तसेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आणि परंपरा यांवर आधारित अभ्यासक्रमांचा लाभ घेता येणार आहे. हा अभ्यासक्रम याच म्हणजे २०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून चालू होणार आहे.
BHU To Offer Degree Course On Hinduism For The First Time; Hindu Knowledge Traditions, Arts and Science To Be Taughthttps://t.co/nuYpHPyQLJ
— Swarajya (@SwarajyaMag) August 19, 2021
१. या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या एका बैठकीमध्ये बनारस हिंदु विश्वविद्यालय (बी.एच्.यू.), जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (जे.एन्.यू.), आयआयटी, कानपूर येथील विद्वान, तसेच देशभरातील अन्य विद्वानांनी ‘बी.एच्.यू.’मध्ये हिंदु धर्माविषयी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
२. या अभ्यासक्रमाला कला शाखेमधील भारत अध्ययन केंद्राने प्रारंभ केला आहे. या अंतर्गत भारतातीलच नाही, तर जगभरातील विद्यार्थ्यांना सनातन हिंदु धर्माची प्राचीन विद्या, परंपरा, युद्ध कौशल्य आणि धर्म-विज्ञान अन् वैदिक परंपरा यांनी पारंगत करण्यात येणार आहे. २ वर्षांच्या या अभ्यासक्रमासाठी ४० जागा निर्धारित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ‘ऑनलाईन’ आवेदन भरण्याची अंतिम दिनांक ७ सप्टेंबर असून प्रवेश परिक्षा ३ ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे.
३. या अभ्यासक्रमासाठी विश्वविद्यालयामध्ये अत्याधुनिक कक्ष सिद्ध करण्यात आला आहे. यात गुरुकुल शिक्षणपद्धतीसह प्राचीन धर्मशास्त्राच्या व्यावहारिक पैलूंवर सखोल अन् प्रायोगिक अभ्यास शिकवला जाणार आहे.
४. अभ्यासक्रमाशी संबंधित अभ्यास मंडळात असलेले प्रा. राकेश उपाध्याय यांच्या मते, भारतात हिंदु धर्म आणि शास्त्रे यांविषयी मनाप्रमाणे व्याख्या करण्यात येते. ज्यांना संस्कृत भाषेचा गंध नाही, असे इतिहासकारही हिंदु धर्म, शास्त्र आणि सनातन परंपरा यांच्या व्याख्या करत आहेत. त्यांतील अनेकांना हिंदु धर्म समजून घेण्यापेक्षा त्याचा अपप्रचार करण्यातच अधिक रस आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हिंदु धर्माला केंद्रस्थानी ठेवून प्राचीन शास्त्रे, योग, ज्ञान, सैन्य आणि शस्त्र परंपरा यांचे शिक्षण दिल्यानंतर त्यांचा जगभरात प्रसार होणार आहे. या उपक्रमामुळे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य समजल्यावर आगामी पिढीलाही अभिमान वाटेल.