उज्जैन : अयोध्येत श्रीराम मंदिराचे जलद निर्माण, प.पू. संतश्री आसारामबापू यांच्यासह साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांवर लावण्यात आलेले खोटे आरोप मागे घेण्यात यावे, शासन अधिग्रहित मंदिरांचा निधी गोरक्षणासाठी खर्च करावा, मुंबईतील देवनार पशुवधगृह बंद करण्यात यावे, गायीला राष्ट्रीय माता घोषीत करण्यात यावे आदी विविध मागण्या संतश्री आसारामबापू यांच्या ७९ व्या प्रकट दिनाच्या निमित्ताने श्री योग वेदांत सेवा समितीने काढलेल्या भव्य फेरीत करण्यात आल्या. या वेळी विश्व हिंदु परिषद, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि संत यांनी एकत्र येऊन भव्य फेरी उज्जैन शहरात काढली. या वेळी प.पू. संतश्री आसारामबापू यांचे मध्यप्रदेश राज्यातील सहस्त्रो भक्त सहभागी झाले होते. श्री चामुंडामाता चौक, देवास रोड, श्री महाकालेश्वर महादेवर देवस्थान आणि भूखीमाता मंदिर अशी फेरी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत काढण्यात आली.
या वेळी भारत जागृती अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजय पटेल, राष्ट्रीय उपाध्यक्ष स्वामी अशोकानंदीजी, भरूच (गुजरात) येथील महामंडलेश्वर स्वामी रामानंदपुरी महाराज, साध्वी महामंडलेश्वर मैत्रीगिरीजी, स्वामी स्वात्मबोधानंद महाराज, शिव ओम मिश्रा, स्वामी चैतन्यदासजी महाराज, महंत भरतरामदासजी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, वैदिक सनातन धर्म एवं राष्ट्र रक्षा अभियानाचे डॉ. गंगाराम तिवारी आणि अन्य अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
या वेळी वृंदावन येथील स्वामी घनश्यामानंदजी महाराज यांनी सूत्रसंचालन करून संत आणि धर्म यांवर होत असलेल्या अन्यायाविषयी जागृती केली. या वेळी साधू-संत यांचा मोठा कुंभ भरलेला असतांना संतश्री आसरामबापू अद्याप कारागृहात कसे ?, संतश्री आसारामबापूंवर एकही आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांना तात्काळ मुक्त करण्यात यावे, हिंदुत्वनिष्ठ शासन असतांनाही संतश्री आसारामबापू यांना जामीन का मिळत नाही ? आदी प्रश्न घोषणा आणि गीत यांच्या माध्यमांतून शासनाला जाब विचारण्यात आला.
संतांवर अन्याय करणे थांबवावे अन्यथा रावण, कंस आणि कौरवांप्रमाणे नाश होईल ! – पू.(डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
आजही समाजात राम, कृष्ण, पांडव यांना वनवासात पाठवण्यास तत्पर असणारे रावण, कंस आणि कौरव जिवंत आहेत. प्रत्येक कुंभमेळ्यात मंथन होते. त्यातून अमृत जसे बाहेर येते, तसे विषही बाहेर येते. आज दुर्दैवाने आपल्याला विष प्यावे लागत आहे; मात्र हे लक्षात घ्यायला हवे की, जो विष पितो तो शंकर असतो. शंकराचा कोप ज्याच्यावर होतो. त्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व नष्ट होते. त्यामुळे संतांवर अन्याय करणे सोडून द्या अन्यथा ज्याप्रमाणे रावण, कंस आणि कौरव यांचा नाश झाला, तसा तुमचाही नाश होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी समारोपाप्रसंगी श्री महाकालेश्वर मंदिर परिसरात केले. या वेळी जय जय महाकाल असा जयजयकार करत फेरीची सांगता झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात