- हरियाणातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
- गोरखधंदा या शब्दाचा अयोग्य वापर केवळ हरियाणात होत नसून भारतभरात होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही या शब्दाच्या अयोग्य वापरावर संपूर्ण भारतात बंदी घालणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
चंडीगड – हरियाणा सरकारने ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या अयोग्य प्रकारे होणार्या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी गोरखनाथ समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी या शब्दाच्या अयोग्य वापरावर बंदी घालण्यात येत असल्याचा नुकताच शासकीय आदेश काढला.
‘गोरखधंदा’ हा शब्द नवनाथांपैकी एक असलेले गुरु गोरखनाथ यांनी केलेल्या बुद्धीअगम्य गोष्टींमुळे प्रचलित झाला होता. अलीकडे विविध माध्यमांकडून कोणत्याही वाईट गोष्टींसाठी ‘गोरखधंदा’ हा शब्द सर्रास वापरण्यात येऊ लागला. त्यामुळे गोरखनाथ यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जात होत्या. त्यामुळे या शब्दावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री खट्टर यांच्याकडे केली होती. या वेळी मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, ‘‘गुरु गोरखनाथ एक संत होते. कोणतीही राजभाषा, भाषण किंवा अन्य कोणत्याही संदर्भात ‘गोरखधंदा’ या शब्दाचा उपयोग झाल्याने गोरखनाथ अनुयायांच्या भावना दुखावल्या जातात. त्यांच्या भावनांचा आदर करून यापुढे या शब्दाचा वापर संपूर्ण राज्यात प्रतिबंधित राहील.’’