Menu Close

आदर्श व्यवस्थेसाठी प्रत्येकाने जागरूक राहून संविधानिक मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, समन्वयक, ‘सुराज्य अभियान’, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘चला स्वराज्याकडून सुराज्याकडे…’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

पुणे – स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशाची अवस्था दयनीय आहे. सर्वत्र अनाचार आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे. आज असे एकही क्षेत्र शेष राहिलेले नाही, जेथे भ्रष्टाचार नाही. मोगल आणि इंग्रज येण्यापूर्वी आपला देश विकसित होता. आता लोकशाही अयशस्वी ठरतांना दिसत आहे. आपल्याला जर आदर्श व्यवस्था हवी असेल, तर प्रत्येकाला जागरूक राहून स्वतःचे अधिकार आणि कर्तव्ये जाणून संविधानिक मार्गाने प्रयत्न करावे लागतील. त्याद्वारे भारतात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी असलेली आदर्श व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आरोग्य साहाय्य समिती आणि सुराज्य अभियान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चला स्वराज्याकडून सुराज्याकडे…’ या विशेष संवादात ते बोलत होते. या संवादात ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाच्या प्रतिनिधी सौ. गौरी कुलकर्णी आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि श्री. विपुल भोपळे यांनी केले. या कार्यक्रमाचा २ सहस्र २०० हून अधिक जणांनी लाभ घेतला.

श्री. मिलिंद धर्माधिकारी
श्री. विपुल भोपळे

अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी मांडलेली सूत्रे

१. भारतात प्रभु श्रीरामचंद्र यांच्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत सर्व राजांनी प्रजा आणि धर्म यांचे रक्षण केले आहे. आदर्श राज्यव्यवस्था, तसेच प्रशासन कसे असावे ?, राज्यव्यवस्था कशी चालवावी ?, हे त्यांनी दाखवून दिले. पिता या नात्याने ते प्रजेचे पालन करत होते. त्या काळी कोणत्याही अनुचित प्रकाराला धर्माच्या अधीन राहून शिक्षा केली जात असे. प्राचीन काळी भारतात धर्माच्या आधारावर आदर्श राज्यव्यवस्था आणि न्यायव्यवस्था अस्तित्वात होती.

२. सहस्रो वर्षांची सुवर्णमय परंपरा सोडून आपण वर्ष १९४७ मध्ये लोकशाहीचा स्वीकार केला. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत सर्वत्र बेबंदशाही, गुन्हे, भ्रष्टाचार, महिलांचे लैंगिक शोषण, अनाचार, अन्याय, अत्याचार आणि देशद्रोही कृत्ये वाढलेली दिसून येतात. भारतात अजूनही इंग्रजांनी सिद्ध केलेले २२२ कायदे लागू आहेत. याचाच अपलाभ भ्रष्टाचारी उठवत आहेत. हे सर्व पाहून ‘आपण खरोखरच स्वतंत्र झालो आहोत का ?’, असा प्रश्न पडतो.

३. अधिवक्ते समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करू शकतात. त्यांनी राष्ट्र्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिक यांना माहिती अधिकार कायद्याविषयी माहिती दिली पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्याची प्रत्येकालाच इच्छा असते; पण त्याला योग्य मार्गदर्शन आणि दिशा नसते. ही दिशा देण्याचे काम अधिवक्ते करू शकतात. सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात अधिवक्त्यांनी संबंधितांना विनामूल्य साहाय्य केले पाहिजे.

सध्याच्या ‘मेकॉले’प्रणीत शिक्षणप्रणालीमुळे नागरिक केवळ सुशिक्षित होत आहेत; पण सुसंस्कारित होत नाहीत ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. नरेंद्र सुर्वे

१. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याकडे गुरुकुल शिक्षणपद्धतीमध्ये व्यावहारिक शिक्षणासह राष्ट्र्रवाद, कर्तव्यपरायणता, परोपकार आदी नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात होते; परंतु  सध्याच्या ‘मेकॉले’प्रणीत शिक्षणप्रणालीत ते दिले जात नाही. या शिक्षणप्रणालीमुळे नागरिक केवळ सुशिक्षित होत आहेत; पण सुसंस्कारित होत नाहीत. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, आधुनिक वैद्य, अधिवक्ता आदी क्षेत्रांत मोठे झालेले लोक सामान्य लोकांना लुटून भ्रष्टाचार करतांना दिसतात. त्यांना भारतातील कायद्यांचे मुळीच भय वाटत नाही. पोलीस ठाण्यात, तसेच अन्य शासकीय कार्यालयांत अनेक खेपा घातल्या तरी न्याय मिळत नाही, तसेच कामे होत नाहीत. ही स्थिती पालटून आपल्याला सुराज्य स्थापन करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे.

२. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले खरे; पण ‘आपण खरोखर स्वतंत्र आहोत का ?’ हा प्रश्न आपल्याला ७५ वर्षांनंतरही पडणे दुर्दैवी आहे. समाजात न्यायव्यवस्था किंवा कायदे यांची भीती दिसून येत नाही. पोलिसांचेही भय उरलेले नाही. वर्ष २०१८ मध्ये ‘स्टेट्स पोलिसिंग ऑफ इंडिया’ या संस्थेने पहाणी करून अहवाल सादर केला. त्यात ५५ टक्के सामान्य लोक ‘पोलीसयंत्रणा भ्रष्ट आहे’, हे मान्य करतात. यावरून पोलीसयंत्रणेची स्थिती किती बिकट झाली आहे, हे लक्षात येते. न्यायालयात जाण्याविषयीही लोक विचार करतात; कारण बहुतांश वेळा त्यांना खटल्याचे पुढचे पुढचे दिनांकच मिळतात. आजच्या स्थितीत संसदेतील ५० टक्क्यांहून अधिक खासदारांवर विविध गुन्हे नोंद आहेत.

३. समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न हिंदु जनजागृती समिती वेगवेगळ्या अभियानांद्वारे करत आहे. समितीने विविध मंदिरांच्या व्यवस्थापनाकडून केला जाणारा भ्रष्टाचार, तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या आगाऊ रकमेतील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य समिती करत आहे.

४. सुराज्यासाठी प्रयत्न करणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी आपण सर्वांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.

पत्रकारांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिष्ठ पत्रकारितेचा आदर्श समोर ठेवावा ! – सौ. गौरी कुलकर्णी, प्रतिनिधी, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक

सौ. गौरी कुलकर्णी

१. प्रसारमाध्यमांची ताकद फार मोठी आहे. त्यांनी राष्ट्र्र आणि समाज हितैषी भूमिका घेतली पाहिजे. केवळ समस्या न मांडता त्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपायही सांगणे आवश्यक आहे. सुराज्य स्थापनेच्या मोहिमेत पत्रकारितेचे हे मोठे योगदान ठरेल. सुराज्यासाठी सरकारला नवी दिशा देण्याची क्षमता पत्रकारितेमध्ये आहे. त्यासाठी सर्वच पत्रकारांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिष्ठ पत्रकारितेचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.

२. स्वातंत्र्यपूर्व लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या दैनिक ‘केसरी’मध्ये ‘सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का ?’ या अग्रलेखातून सडेतोड शब्दांत सरकारवर टीका केली होती. त्यांची पत्रकारिता राष्ट्रनिष्ठ होती. तथापि आज तथाकथित धर्मनिरपेक्षवादी पत्रकार आणि प्रसारमाध्यमे भारतविरोधी भूमिका घेतात. याद्वारे ते देशाला अपकीर्त करतात. ‘पेड न्यूज’ (पैसे घेऊन बातमी प्रसिद्ध करणे) हा पत्रकारितेला लागलेला कर्करोगच आहे. यामुळे जनतेचा प्रसारमाध्यमांवर विश्वास राहिलेला नाही. अशी प्रसारमाध्यमे ही भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ कशी असू शकतात ?

३. आज प्रसारमाध्यमांमध्ये देशभक्ती किंवा समाजहित यांपेक्षा ‘टीआर्पी’चा (दर्शक संख्या गणतीच्या परिमाणाचा) विचार अधिक केला जातो. त्यामुळे त्यांच्याकडून सामाजिक प्रश्न, भ्रष्टाचार, अन्याय आदींवर प्रकाश टाकला जात नाही. कोरोनाच्या काळात प्रसारमाध्यमांनी नकारात्मक पत्रकारिता केली. त्याचे परिणामही अनेकांनी अनुभवले. हल्लीची बहुतांश वर्तमानपत्रे आणि प्रसारमाध्यमे ही राजकारणी व्यक्तींशी संबंधित असतात. त्यामुळे त्यांच्याकडून नि:पक्ष आणि निर्भीड वृत्तांकन केले जात नाही. उलट भेदभाव आणि द्वेषपूर्ण भाष्य केले जाते.

४. वादविवाद ही सनातन धर्माची परंपराच आहे. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ (अर्थ: वादविवादाची दिशा समाजाला तत्त्वबोध करून देणारी असावी) असे आपल्याकडे म्हटलेच आहे. तथापि विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रे एकदम याविरुद्ध असल्याचे दिसून येते. यांत सहभागी वक्त्यांचा अभ्यास अल्प असतो. ते आरडाओरड आणि हातवारे करून, तसेच इतरांचे ऐकून न घेता सूत्रे मांडतात. बर्‍याचदा त्यांची सूत्रेही अर्थहीन आणि द्वेषपूर्ण असतात. त्यात भरीस भर म्हणून निवेदकही नकारात्मक विचारांचा असतो. एकूणच याद्वारे समाजात गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी या चर्चासत्रांची फलनिष्पत्ती शून्य असते.

५. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक नागरिक हा पत्रकारच आहे. त्याने सामाजिक माध्यमांचा योग्य वापर केला पाहिजे. सध्याची युवा पिढी समाजातील समस्या प्रभावीपणे मांडू शकते. त्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *