टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेते रवि दहिया यांनी भारतात परतल्यानंतर भगवान शिवाचे दर्शन घेऊन सोहळ्यात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला. स्पर्धेला जाण्यापूर्वी त्यांनी पदक मिळण्यासाठी भगवान शिवाला साकडे घातले होते. जागतिक स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत अतुलनीय कामगिरीच्या बळावर त्यांनी कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. त्यानंतर त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असतांना त्यांनी भारतात परतल्याक्षणी शिव मंदिरांत जलाभिषेक, तसेच रुद्राभिषेक करून कृतज्ञता व्यक्त केली. इतकेच नव्हे, तर श्री वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जातांना संपूर्ण प्रवासात त्यांनी देवीचा जयजयकार केला. मोठे यश संपादन केल्यानंतरही दहिया यांच्या मनामध्ये असलेली ईश्वराच्या कृपेची जाणीव कौतुकास्पद आहे. केवळ दहियाच नव्हे, तर कांस्यपदक पटकावलेल्या बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांनीही ऑलिंपिक स्पर्धेतील यशप्राप्तीनंतर अनेक मंदिरांत जाऊन देवाचे दर्शन घेतले. स्वतःला मिळालेल्या यशामागे भगवंताची कृपाही कारणीभूत आहे, ही जाणीव मनात असल्यानेच अशी कृती होते. विजेत्या खेळाडूंच्या या कृती ईश्वराचे अस्तित्व नाकारून केवळ स्वकर्तृत्वाचा ढोल बडवणार्या प्रयत्नवाद्यांना चपराक लगावणार्या आहेत.
ईश्वरी अधिष्ठानाचे महत्त्व
कुठल्याही क्षेत्रात व्यक्तीचे कष्ट आणि प्रयत्न यांचे महत्त्व असतेच; पण त्या जोडीला ईश्वराचे आशीर्वाद हाही महत्त्वाचा घटक असतो. प्रयत्नवाद आणि दैववाद यांची योग्य प्रकारे सांगड घातली, तर यशाची गवसणी दूर नसते. ऑलिंपिक विजेत्या खेळाडूंनी यशप्राप्तीनंतर देवदर्शन करून ईश्वरी अधिष्ठानाचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. दैवी अधिष्ठान असेल, तर निराशेमुळे मन खचत नाही आणि विजयाची हवाही डोक्यात शिरत नाही. खेळाडूंमध्ये जिद्द, प्रेरणा, विजिगीषू वृत्ती आदी गुण उणे-अधिक प्रमाणात असतातच; पण आध्यात्मिक अधिष्ठानामुळे ते वृद्धींगत होतात. हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. दहिया यांनी त्यांच्या यशामध्ये भगवंतालाही वाटा देणे उल्लेखनीय आहे; कारण आजकाल ‘वलयांकित व्यक्ती’ बनल्यावर खुलेपणाने मंदिरांत जाणे, हा कमीपणा वाटतो. देवावरचा विश्वास म्हणजे अंधश्रद्धा वाटावी, असे वातावरण पुरो(अधो)गाम्यांनी निर्माण करून ठेवले आहे. अनेक दिग्गज खेळाडूही स्वकर्तृत्वाच्या कोषात मग्न असतात. अशांनी दहिया, पी.व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंच्या कृतींतून बोध घेतला पाहिजे.
खेळ म्हटले की, जय-पराजय आलेच. जसे अपयश पचवणे, हे खिलाडूवृत्तीचे दर्शक आहे, त्याप्रमाणे यश पचवणे (गर्व होऊ न देणे) हेही विनम्रतेचे लक्षण आहे. ऑलिंपिकमध्ये यश संपादन केल्यानंतर खेळाडूंवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी विजेत्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. अनेक प्रसिद्धीमाध्यमांनी खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या. खरेतर एवढा सन्मान मिळाल्यानंतर स्वकर्तृत्वाची जाणीव बळकट होते. त्याचे रूपांतर पुढे गर्वात होते. ते न होण्याची दक्षता घेत दहिया देवाच्या चरणी नतमस्तक झाले, हे महत्त्वपूर्ण आहे. अपयश पचवण्यापेक्षा यश पचवणे कठीण आहे. त्यासाठी आध्यात्मिक अधिष्ठानच असावे लागते, हेच खरे !