Menu Close

आतंकवाद तात्काळ ठेचावा !

प्रतिकात्मक छायाचित्र

अफगाणिस्तान येथील ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या आतंकवादी संघटनेने काबुल विमानतळावर केलेल्या आत्मघाती बाँबस्फोटात अमेरिकेचे १३ सैनिक ठार झाले. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘आतंकवाद्यांना शोधून ठार करू’, अशी घोषणा केली आणि ३० घंट्यांच्या आत तिने कार्यवाहीही केली. ‘ड्रोन’द्वारे (मानवविरहीत हवाई यंत्र) हवाई आक्रमण करून ‘इस्लामिक स्टेट खुरासान’चे आतंकवादी आणि काबुल विमानतळावरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार यांना ठार केले. अफगाणिस्तान येथून अमेरिकेतील नागरिक आणि अफगाणी नागरिक यांचे बचावकार्य चालू असतांना ‘काही घातपात झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ’, अशी चेतावणी यापूर्वीच राष्ट्रपती जो बायडेन यांनी दिली होती. तरीही आतंकवाद्यांनी आक्रमण केलेच. अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी यामागे पाकचाही हात असल्याचे सांगितले आहे. काही झाले, तरी आतंकवादी आक्रमणानंतर तत्परतेने उत्तर देण्याची अमेरिकेची कृती ही निश्चितच कौतुकास्पद आहे.

११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेतील ‘ट्वीन टॉवर’वर आतंकवादी आक्रमण झाल्यावर तिने त्वरित ‘अल्-कायदा’ या आतंकवादी संघटनेविरुद्ध युद्धाची घोषणा केली. त्यानंतर २० वर्षे अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानच्या भूमीवर ठाण मांडून होते. काही दिवसांपूर्वी पॅलेस्टाईनमधून इस्रायलच्या दिशेने दारूगोळा भरलेले फुगे सोडण्यात आले. त्यापूर्वीही जेरूसलेम येथे पॅलेस्टाईनचे लोक आणि इस्रायली सैन्य यांच्यात काही कारणानिमित्त झटापट झाली. तेव्हा पॅलेस्टाईनमधील आतंकवादी संघटना ‘हमास’कडून इस्रायलवर सहस्रो रॉकेट डागण्यात आली. त्यानंतर इस्रायलने त्वरित अनेक दिवस हमासच्या तळांवर हवाई आक्रमण केले. हमासने नमते घेतल्यावर इस्रायलची हवाई आक्रमणे थांबली. फ्रान्सवर केलेले आतंकवादी आक्रमण असो अथवा रशियात सेंट पीटसबर्ग येथील आक्रमण असो, तेथील शासनकर्त्यांनी केवळ संबंधित आतंकवादी संघटना ओळखून तिला चेतावणीच दिली नाही, तर त्वरित चोख प्रत्युत्तरही दिले. पाश्चात्त्य देशांचे आतंकवादी आक्रमणांविषयी शून्य सहनशीलतेचे, आक्रमकतेचे धोरण अनेक दशके आतंकवादी कारवायांतून होरपळून निघालेल्या भारताने खरेतर कृतीत आणले पाहिजे; पण भारतात तसे होत नाही. आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर काही दिवस सार्वजनिक कार्यक्रम किंवा वाहिन्या यांवर चेतावण्या दिल्या जातात. चर्चा करण्यात वेळ दिला जातो. अमेरिका आणि अन्य देश यांना कळवले जाते. काही दिवस उलटल्यानंतर मग प्रत्यक्ष आक्रमण केले जाते, तेही मोजक्याच प्रमाणात ! मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर पाकवर आक्रमण करण्याचे आदेशच सैन्याला दिले गेले नाहीत. तोच भाग कंदाहार विमान अपहरणाचा. भारतीय सैन्य ‘कमांडो कारवाई’ करून आतंकवाद्यांना ठार मारू इच्छित होते; मात्र त्यालाही आदेश मिळाला नाही. भारताकडे प्रचंड सैन्यशक्ती असली, तरी तिचा उपयोग केला जात नाही. परिणामी आतंकवाद्यांचे फावते. हे पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *