सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासू अन् धर्मप्रेमी यांची ‘ऑनलाईन व्हिडिओ’ संपर्काच्या माध्यमातून घेतली भेट !
सोलापूर – सध्या आपत्कालीन परिस्थिती असली, तरी साधनेसाठी काळ अनुकूल असल्याने सर्वांनी साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे करतांना आपल्यातील दोष आणि अहं यांवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात सहभागी असणारे धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांची सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘ऑनलाईन व्हिडिओ’ संपर्काच्या माध्यमातून भेट घेतली. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या वेळी पुणे, चिंचवड, भोर (जिल्हा पुणे), सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड येथील जिज्ञासू अन् धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.
गुरुपौर्णिमेपूर्वी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांना ‘सेवेच्या माध्यमातून गुरुकृपा कशी अनुभवावी ?’, याविषयी मार्गदर्शन केले होते. त्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी ‘व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करून स्वत:मध्ये कसा पालट झाला अन् प्रयत्नांतून कसा आनंद मिळत आहे’, याविषयी या ऑनलाईन भेटीच्यावेळी अनुभवकथन केले. या संपर्काच्या माध्यमातून सर्वच जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे दर्शन लाभल्यामुळे अनेकांचा भाव पुष्कळ जागृत झाला होता.
धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न
१. फलटण (जिल्हा सातारा) येथील श्री. विकास तांबे यांना सद्गुरु (कु.) स्वातीताईंनी सेवाकेंद्रात येऊन सेवा करण्याचा निरोप दिला होता. यानंतर श्री. तांबे यांनी त्वरित १५ दिवसांची सुटी घेऊन गुरुपौर्णिमेपूर्वी सेवेसाठी सोलापूर सेवाकेंद्र येथे आले होते. सेवाकेंद्रात राहिल्यामुळे त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसली अन् अनेक सूत्रेही शिकायला मिळाली. त्यानंतर त्यांनी घरी गेल्यावरही ते प्रयत्न चालू ठेवले. ‘साधनेच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्या बोलण्यात पुष्कळ पालट झाला आहे’, असे सद्गुरु स्वातीताई यांनी या वेळी सांगितले.
२. मुंबई येथील सौ. हेमा शेवाळे या साधनावृद्धी सत्संगात नियमित सहभागी होतात. सद्गुरु स्वातीताईंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करण्यास प्रारंभ केला. त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ४०० हून अधिक जिज्ञासूंना भ्रमणभाषवरून संपर्क करून ऑनलाईन गुरुपौर्णिमा सोहळा पहाण्याचे निमंत्रण दिले.
३. संभाजीनगर येथील सौ. अर्चना पाटील यांना सद्गुरु स्वातीताई यांचा सत्संग लाभल्यानंतर त्यांनी साधनेची तळमळ आणि प्रयत्न पुष्कळ वाढवले. आता सौ. पाटील स्वतः धर्मशिक्षणवर्ग घेत आहेत. ‘साधनेत आता पुष्कळ आनंद मिळत आहे’, हे ‘ऑनलाईन’ संपर्काच्या माध्यमातून सांगतांना त्यांची भावजागृती होत होती.
४. सोलापूर येथील श्रीमती रंजना शेरखाने यांच्या यजमानांचे निधन झाल्याने त्यांचा मानसिक त्रास वाढला होता; मात्र सद्गुरु स्वातीताईंनी गुरुपौर्णिमेपूर्वी ‘ऑनलाईन’ संपर्कात केलेल्या मार्गदर्शनानंतर त्यांची सकारात्मकता वाढली. ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे लिखाण नियमित केल्याने दोषांची तीव्रता ५० टक्के न्यून होते’, हे सूत्र त्यांना सत्संगामध्ये समजल्यानंतर त्यांनी तसे प्रयत्न चालू केले. त्यामुळे त्यांना ‘कुटुंबियांविषयी असलेल्या ५० टक्के अपेक्षा न्यून झाल्या, तसेच सेवेत आणि साधनेत पुष्कळ आनंद मिळत आहे’, असे त्यांनी या वेळी सांगितले. हे सांगतांना श्रीमती शेरखाने यांचा भाव जागृत झाला होता.
५. धाराशिव येथील श्री. आणि सौ. नवनाथ राऊत यांनी नियमित सेवा करण्यास प्रारंभ केला आहे. या वेळी त्यांनी ‘मला सेवेतून वेगळाच आनंद घेता येत आहे’, असे सांगितले.
६. पिलीव (जिल्हा सोलापूर) येथील श्री. विजयकुमार देवकर यांचे सद्गुरु स्वातीताईंच्या ‘ऑनलाईन’ भेटीपूर्वी साधनेचे प्रयत्न अल्प होत होते; मात्र संपर्कानंतर त्यांची साधना करण्याची तळमळ वाढली. श्री. देवकर यांच्याकडे एके दिवशी सकाळी वासुदेव (ग्रामीण भागामध्ये पहाटेच्या वेळी मोरपीस धारण करून अभंग, ओव्या म्हणणारी आणि भविष्य सांगणारी व्यक्ती) आला होता, तेव्हा त्यालाही त्यांनी साधना सांगून सनातनचे ५ ग्रंथ वितरण करण्यासाठी दिले.
७. पुणे येथील श्री. परमेश्वर आंधळे यांनी अनुभवकथन करतांना सांगितले की, गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आदल्या दिवशीपर्यंत पुष्कळ अडथळे येत होते. ‘त्यामुळे गुरुपौर्णिमेचा ऑनलाईन सोहळा पहाता येणार नाही’, असे वाटत होते; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन प्रार्थना केल्यानंतर त्वरित अडथळे दूर झाले आणि गुरुपौर्णिमेचा सोहळा पहाता आला.
वैशिष्ट्यपूर्ण
पुणे येथील धर्मप्रेमी सौ. गौरी येवले यांनी प्रथमच ‘ऑनलाईन व्हिडिओ’ संपर्कामध्ये भावार्चना सांगितली. ही भावार्चना ऐकून सहभागी झालेल्या सर्वांचीच भावजागृती झाली.