कला आणि संस्कृती संचालनालयाकडून हनुमानाचे विडंबन !
पणजी– पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाने हिंदूंच्या देवतेचे विडंबन करणे, ही अत्यंत विकृत गोष्ट आहे, असे प्रतिपादन गोमंतक परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी केले आहे.
याविषयी माहिती देतांना ते म्हणाले, ‘‘कला आणि संस्कृती संचालनालयाच्या वित्त विभागासमोर हिंदु धर्मातील देवता श्री हनुमानाचे एक बीभत्स चित्र लावण्यात आले आहे. हिंदु देवतांचा उपमर्द करणे, त्यांना अपमानित करणे अशा प्रकारची निषेधार्ह कृती जर कला आणि संस्कृती संचालनालय करायला लागले, तर ती अत्यंत लज्जास्पद आणि विकृत गोष्ट आहे. हिंदूंच्या देवतांचे असे विडंबन आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे अन् कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक यांनी यामध्ये लक्ष घालून हे चित्र आजच्या आज त्वरित हटवावे. या हनुमानाच्या चित्रामध्ये ‘जीन्स पँटवर घालतात तसा कमरेचा पट्टा श्री हनुमानाच्या कमरेला घातलेला’ दाखवून त्याने अर्धी पँट परिधान केल्याचे दाखवले आहे. आता हिंदु देवतांचा उपमर्द शासकीय पातळीवर व्हायला लागला आहे. आम्ही याचा निषेध करत आहोत. जर हे चित्र आजच्या आज हटवले नाही, तर त्याचे परिणाम गंभीर होतील, अशी चेतावणी आम्ही मुख्यमंत्री आणि कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना देत आहोत.’’