हिंदूंनो, श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी श्री गणेशाची पूजा करून त्यामध्ये देवत्व आलेल्या श्री गणेशमूर्तीचे दान करू नका !
-
श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास त्यातील श्री गणेशतत्त्वाचा लाभ सर्वांना होतो. – संपादक दैनिक सनातन प्रभात
-
श्री गणेशमूर्तीदान करणे अशास्त्रीय आहे, तसेच दान घेतलेल्या मूर्ती खाणीत टाकल्या जातात. त्यांची अतिशय अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते आणि यातून श्री गणेशमूर्तींचा अवमान होते, हा अनुभव आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात
-
दान म्हणून घेतलेले निर्माल्य नंतर कचर्यात टाकले जाते. – संपादक दैनिक सनातन प्रभात
पिंपरी-चिंचवड – यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करावा, नागरिकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करावे, असे आवाहन महापौर उषा उपाख्य माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. ‘कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होऊ नये, याकरता श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी या वर्षी कृत्रिम हौद उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. त्याऐवजी महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेशमूर्तीदान आणि निर्माल्यदान स्वीकारण्यासाठी फिरत्या रथांची व्यवस्था शहरातील विविध भागांमध्ये करण्यात येणार आहे’, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी या वेळी दिली.
नागरिकांना करण्यात आलेले आवाहन
१. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतांना नागरिकांनी शाडू माती अथवा कागदी लगदा यांसारख्या विघटनशील घटकांपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींची स्थापना करावी. (कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती धर्मशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्ट्याही अयोग्य आहेत. कागद पाण्यात मिसळल्यावर मिथेन नावाचा विषारी वायू सिद्ध होतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. पाण्यातील ऑक्सिजन अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात. – संपादक दैनिक सनातन प्रभात)
२. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशमूर्तींची उंची ४ फुटापर्यंत असावी, तर घरगुती श्री गणेशमूर्तींची उंची २ फुटापर्यंत असावी. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनास प्रतिबंध आहे.
३. आरती, भजन, कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास सक्त मनाई आहे. (केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारे आवाहने केली जातात, हे हिंदूंना लक्षात आले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात) गणेशोत्सव मंडळांनी श्रींची आरती आणि दर्शनाची सुविधा ‘ऑनलाईन’, ‘केबल नेटवर्क’, संकेतस्थळ आणि फेसबूक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे.
४. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाण्याचा स्रोत दूषित करणे, हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित न होणे या कामी सर्व नागरिक आणि गणेशोत्सव मंडळे यांनी सहकार्य करावे. (सांडपाणी, पशूवधगृहातील रक्तमिश्रीत पाणी, कारखान्यांचे घातक-विषारी पाणी थेट नदीच्या पात्रात वा नैसर्गिक जलस्रोतात सोडले जाते, हा दंडनीय अपराध नाही का ? त्यामुळे खरे प्रदूषण होते. मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही. – संपादक दैनिक सनातन प्रभात)
५. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास सक्त मनाई आहे, तसेच गणेश मंडपांचे निर्जंतुकीकरण करावे.