Menu Close

उपेक्षित वारकरी !

प्रतिकात्मक छायाचित्र

एका दैनिकाशी झालेल्या वार्तालापात केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘पालखी मार्गाशी माझी भावनिक जवळीक आहे. देहू-पंढरपूर, आळंदी-पंढरपूर या मार्गांसाठी १४ सहस्र कोटी रुपयांचा व्यय अपेक्षित आहे. वारकर्‍यांचे पाय भाजू नयेत, यासाठी विशिष्ट पद्धतीचा रस्ता बनवणे, पालखी मार्गाच्या दुतर्फा स्वच्छतागृहे उभारणे, वारकर्‍यांना विश्रामासाठी जागा उपलब्ध करणे, तसेच ‘ज्ञानेश्वरी’त उल्लेख केलेली झाडे राज्य सरकारच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावणे, आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. या दोन्ही मार्गांचे दीड वर्षानंतर उद्घाटन होईल’, असे सांगितले.

वास्तविक प्रतिवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर अंतर केवळ श्री विठ्ठलाच्या ओढीने श्रद्धेने पायी चालत असतात. आषाढी वारी ही महाराष्ट्रातून भरणारी सगळ्यात मोठी यात्रा म्हटल्यास वागवे ठरणार नाही. ‘आळंदी ते सोलापूर मार्गाचे चौपदरीकरण करा, धर्मपुरी फाटा ते पंढरपूर सहापदरी करा, वारकरी मार्गातील प्रत्येक पालखी तळावर मुक्कामासाठी ५० एकर भूमी आरक्षित करून ठेवा’, या आणि अशा अन्य मागण्या वारकरी गेली अनेक वर्षे करत आहेत; मात्र आतापर्यंतच्या शासनकर्त्यांकडून वारकर्‍यांना नेहमी उपेक्षाच सहन करावी लागत आहे. वारी मार्गावर पाणी, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधाही वारकर्‍यांना मिळत नाहीत. दोन्ही वारी मार्गांवर अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वारकर्‍यांसाठी स्वतंत्र मार्गांची अनेक वेळा घोषणा झाली; मात्र प्रत्यक्षात तरी ती अजून कृतीत न येणे, हे चिंताजनक आहे.

याच समवेत गेली ३५ वर्षे राज्यातील समस्त वारकरी भाविकांकडून ‘राज्यशासनाने प्रत्येक जिल्ह्यात एक ‘वारकरी भवन’ उभारावे’, अशी मागणी केली जात आहे. निधीची कमतरता असल्याचे कारण देत राज्यशासनाकडून नेहमीच या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. तेच शासन काही जिल्ह्यांमध्ये तत्परतेने ‘उर्दू भवन’ निर्माण करण्यासाठी आर्थिक तरतूद करते, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून त्यात वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी केलेली स्तुत्य घोषणा पूर्णत्वास जाईपर्यंत त्यांनीच पाठपुरावा करावा, असे वारकर्‍यांना वाटते. नितीन गडकरी यांच्या कर्तव्यपूर्तीनंतर वारकर्‍यांना होणारा लाभ निश्चितच सर्वांच्या स्मरणात राहील.

– श्री. अजय केळकर, सांगली

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *