तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले आहे. जगातील हे पहिले युद्ध असेल, जिथे गोळीही सुटली नाही, रक्तही सांडले नाही आणि साडे तीन लाख सैन्याने शरणागती पत्करली. या परिस्थितीचा भविष्यात भारतावर काय परिणाम होणार आहे ? भारताने कुठल्या सूत्रांवर त्यांच्याशी लढले पाहिजे ? इत्यादींविषयी या लेखात पहाणार आहोत.
१. साडेतीन लाख सैन्य असतांनाही अफगाणिस्तानने तालिबानी आतंकवाद्यांसमोर नांगी टाकणे
‘गेल्या २-३ वर्षांपासून तालिबानशी वाटाघाटी चालू आहेत. ‘अफगाणिस्तानमध्ये युद्ध जिंकणे शक्य नाही’, याची अमेरिकेला जाणीव झाली. त्यांना या युद्धाची मोठी किंमत चुकवावी लागली. यात २ सहस्र अमेरिकी सैनिक मारले गेले आणि १० सहस्रांहून अधिक सैनिक घायाळ झाले, तसेच अनेक खासगी कंत्राटदारही मारले गेले. त्यामुळे अमेरिकेला अफगाणिस्तानातून बाहेर पडायचे होते. अमेरिकेला वाटले की, अफगाणिस्तानला मजबूत सैन्य बनवून द्यावे. त्याप्रमाणे त्यांनी अफगाणिस्तानला साडे तीन लाख सैन्य सिद्ध करून दिले. त्यासह आधुनिक शस्त्रेही दिली. ‘अफगाणी स्वत:च्या बळावर राज्यकारभार करू शकतील आणि वेळ पडल्यास तालिबानशी सत्ता वाटप करतील’, असे अमेरिकेला वाटले. त्या दृष्टीने त्यांच्या वाटाघाटी चालू होेत्या. ज्या वेळी अमेरिकेने अफगाणिस्तानातून परत जायचा निर्णय घेतला, त्यानंतर काही दिवसांमध्येच अफगाणिस्तानचे सैन्य तालिबानला शरण गेले. केवळ मानसिक युद्धानेच त्यांचा पराभव झाला. जगातील हे पहिले युद्ध असेल की, जिथे गोळीही सुटली नाही, रक्तही सांडले नाही आणि साडेतीन लाख सैन्याने काहीही न करता पराभव मान्य केला.
२. अफगाणिस्तानकडे नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे त्यांचे सैन्य आणि सरकार तालिबान्यांसमोर निष्प्रभ ठरणे
अफगाणिस्तानच्या भूमीचे क्षेत्रफळ प्रचंड आहे. त्या तुलनेने शस्त्रधारी तालिबान्यांची संख्या ५० सहस्रांहून अधिक नाही. तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेतले, तेव्हा अफगाणिस्तानच्या प्रत्येक शहरामध्ये ५-६ सहस्र सैनिक आणि काबुलच्या संरक्षणासाठी २० ते ३० सहस्र सैनिक तैनात होते. तरीही ते लढले नाहीत. त्यामुळे ‘हे एक मानसिक युद्ध होते’, असेच म्हणावे लागेल. यात सैन्य आणि सरकार निष्प्रभ ठरले. हे तालिबानचे यश असले, तरी ‘त्याला चीन आणि पाकिस्तान यांनी साहाय्य केले आहे’, हे नाकारून चालणार नाही. अमेरिकाच काय, तर अफगाण सैन्याचीही लढण्याची इच्छा नव्हती. शस्त्रापेक्षाही शस्त्र चालवणारा सैनिक अधिक महत्त्वाचा असतो. त्यांच्याकडे नेतृत्व नव्हते. त्यामुळे सर्वकाही हवेत विरून गेले.
३. अफगाणिस्तान कह्यात घेण्यासाठी पाकिस्तानने तालिबानला सर्वतोपरी साहाय्य करणे आणि त्यातूनच तालिबानी युद्ध जिंकणे
तालिबान आणि पाकिस्तान हे एकच आहेत. पाकिस्तान तालिबानला अनेक वर्षांपासून साहाय्य करत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि पाकिस्तान यांच्या साहाय्याने ‘सोेव्हिएत युनियन’चा पराभव केला होता. त्यानंतर अमेरिकेने तालिबानला दूर केले; पण पाकिस्तानला केले नाही. उलट पाकिस्तान तालिबानला विविध प्रकारचे साहाय्य करतच राहिला. सध्याच्या या मानसिक युद्धाचा विचार केला, तर या युद्धात पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची होती. तालिबानचे सैनिक लढवय्ये आहेत; पण पारंपरिक युद्ध कसे लढायचे, याची त्यांना माहिती नाही. अफगाणिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात सैन्याची एक सशस्त्र मोठी ‘डिव्हिजन’ सिद्ध होती; पण तिनेही प्रतिकार केला नाही. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानेच तालिबान्यांना सर्व नेतृत्व पुरवले. पाकिस्तान त्यांचे काही सैन्याधिकारी आणि विशेष दलाचे अधिकारी यांना तात्पुरते बाजूला काढतो अन् २-३ वर्षांनी परत कामावर घेऊन वरिष्ठता देतो. अनुमाने ३० ते ४० सहस्र पाकिस्तानी सैन्याधिकार्यांना नेतृत्व देण्यात आले. त्यांची क्षमता पुष्कळ चांगली होती. लढाईसाठीचे लष्करी नियोजनही पाकिस्ताननेच केले होते. दारूगोळा, साहित्य, प्रशासन आणि नियोजन हे सगळे पाकिस्तानने पुरवले. अर्थात् त्याची काहीही आवश्यकता भासली नाही. हे काम अतिशय नियोजनपूर्वक होऊन ते सहजपणे युद्ध जिंकले.
४. अफगाणिस्तान हे अमेरिकेला त्रास देण्यासाठीचे मोठे शस्त्र असल्याने, तसेच तेथील मोठ्या प्रमाणात असणारी खनिज संपत्ती यांमुळे चीनने तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानला साहाय्य करणे
चीनचा तालिबानला पाठिंबा आहे, यात तथ्य आहे. गेल्या २ वर्षांपासून चीन पाकिस्तानच्या माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये सक्रीय सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने अफगाणिस्तान आणि तालिबान यांना अनेक स्वप्ने दाखवली. त्याने अफगाणिस्तानच्या शिष्टमंडळाला स्वत:च्या देशात नेऊन पुष्कळ वैभव दाखवले. चीनने त्यांना स्वप्न दाखवले, ‘आम्ही अफगाणिस्तानमध्ये एवढी गुंतवणूक करू की, अफगाणिस्तान एक आधुनिक प्रगत राष्ट्र होईल.’ चीन अतिशय लबाड राष्ट्र आहे. त्याने जे धोरण आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये राबवले, तेच आता तो अफगाणिस्तानमध्येही राबवतांना दिसत आहे. चीनच्या दृष्टीने अफगाणिस्तान हे अमेरिकेला त्रास देण्यासाठीचे मोठे शस्त्र आहे. अफगाणिस्तानमध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. त्या नैसर्गिक संपत्तींवरही चीनचा डोळा आहे.
५. अफगाणिस्तानमध्ये संकटात असलेले हिंदू आणि शीख यांना भारत सरकारने परत आणावे !
आतापर्यंत ज्या भारतियांना अफगाणिस्तानमधून परत आणले गेले, त्यात बहुतांश उच्चायुक्तालयाचे लोक आणि त्यांची कुटुंबे यांचा समावेश होता. अनेक भारतीय तेथे कंत्राटदारांच्या माध्यमातून कामाला आहेत. काही जण उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी तेथे गेलेले आहेत. त्यांची संख्याही काही सहस्रांमध्ये असेल. त्याहून अधिक संख्या तेथील भारतीय हिंदू आणि शीख यांची आहे. तेथे पहिल्यांदा तालिबान येण्यापूर्वी हिंदू आणि शीख यांची लोकसंख्या अडीच लाखांहून अधिक होती. कालांतराने त्यातील अनेक जण मारले गेले, काही धर्मांतरित झाले, तर काही जण भारतात पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीप्रमाणे ही संख्या १ सहस्र ५०० ते २ सहस्र इतकीच असावी. त्यातील अनुमाने ५०० जण काबुलच्या गुरुद्वारामध्ये एकत्र जमले आहेत. या लोकांवर तेथे पुष्कळ अत्याचार झाले आहेत. तालिबान त्यांना ‘आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही’, असे म्हणत आहे. तरीही त्यांना परत आणणे आवश्यक आहे. आधीच त्यांची संख्या ३ लाखांहून १ सहस्र ५०० वर आली आहे. त्यामुळे जे शेष राहिले आहेत, त्यांना वाचवणे हे आपले कर्तव्य आहे.
६. भारताने अफगाणिस्तानमध्ये केलेली गुंतवणूक
भारताने अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डॉलर्सहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारताने तेथे रस्ते आणि धरणे बांधली, तसेच अफगाणिस्तानच्या सरकारी कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले. भारताकडून प्रतिवर्षी अनुमाने ७०० अफगाणींना विविध भारतीय सैन्य अकादमींमध्ये प्रशिक्षण दिले जाते. सहस्रो अफगाणी भारताच्या विविध शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण किंवा प्रशिक्षण घेत आहेत. या सर्वांची भारतातच रहाण्याची इच्छा आहे; परंतु त्यांना येथे राहू देऊ नये. अफगाणिस्तानमधील परिस्थिती सामान्य झाली की, त्यांना परत तिकडे पाठवून द्यावे. भारताने त्यांना अफगाणिस्तानला जाऊन तेथील स्थिती ठीक करण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना तिकडे पाठवले पाहिजे. भारताने उभारलेल्या साधनांची हानी तालिबानी करणार नाहीत; परंतु त्यांच्या बुरख्याआडून पाकिस्तानी हानी करतीलच !
७. भारत-पाकिस्तान युद्धांच्या वेळी भारतीय सैन्याने अनेक वेळा अफगाणी पठाणांचा पराभव करणे
सध्या माध्यमांमध्ये ‘तालिबानी किंवा पठाण हे अतिशय शूर आणि लढवय्ये आहेत’, अशी प्रतिमा रंगवली जाते. भारतीय सैन्य त्यांच्याशी पुष्कळ वेळा लढले आहे. वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले, त्या वेळी त्यांच्याकडे सैन्य नव्हते. त्यांनी पख्तुनिस्तानच्या भागात रहाणारे आदिवासी किंवा पठाण यांना युद्धात उतरवले होते. २० ते ३० सहस्रांहून अधिक पठाण भारताच्या हद्दीत अतिशय वेगाने घुसले होते. त्या वेळी भारतीय सैन्याने ६-७ सहस्र पठाणांना ठार मारले. उरलेले पठाण पळून गेले. त्याकाळी भारतीय सैन्याकडे कोणतीही आधुनिक शस्त्रास्त्रे आणि बाँब नव्हते. धैर्य, लढवय्येपणा आणि नेतृत्व यांच्या जोरावर भारतीय सैन्याने ही कामगिरी केली. केवळ १५ ते २० सहस्र भारतीय सैन्याने पठाणांचा पराभव केला. अशाच प्रकारे लडाखमध्येही भारतीय सैन्याने पठाणांना धूळ चारली होती.
वर्ष १९६५ मध्ये फिल्ड मार्शल अय्युब खान हे पाकिस्तानचे मुख्य होते. तेही याच खैबर पख्तुनवा भागातील पठाण होते. वर्ष १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी अनुमाने १ सहस्र २०० पठाणी सैनिक असलेली १५ कृती दले सिद्ध केली होती. भारतीय सैन्याने पठाणी सैनिकांना ठार मारून वर्ष १९६५ चे युद्ध जिंकले.
८. चीन अफगाणिस्तानला आर्थिक साहाय्य करून त्याला कायम गुलाम करून ठेवील !
सध्या अफगाणिस्तानमधील जनतेचे भविष्य अतिशय भयावह आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांवरून १० लाखांहून अधिक अफगाणी पाकिस्तानमध्ये पळून गेले आहेत, तर काही इराणमध्ये आणि काही सेंट्रल रिपब्लिकमध्ये पळून गेले आहेत. उरलेले त्यांच्या घरांमध्ये टाळे लावून बसले आहेत. कुठलाही देश चालवायचा असेल, तर एक व्यवस्था निर्माण करावी लागते. त्यामुळे तालिबानी सरकार स्थापण्यासाठी सरकारी अधिकार्यांचाच वापर करतील. सरकार स्थापन करून सर्वप्र्रथम अफगाणी जनतेला सुरक्षेसह अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवायला हवा. त्यानंतर इतर सर्व गोेष्टी कराव्या लागतील. सरकार चालवायला आर्थिक साहाय्य लागणार आहे. त्यासाठी त्यांना साधने निर्माण करावी लागतील. पाश्चात्त्य देश त्यांना पैसा देणार नाहीत. चीन त्यांना पैसे देईल; पण तो एका हाताने देईल आणि दुसर्या हाताने परत घेईल. ज्याप्रमाणे चीनने कर्ज देऊन पाकिस्तान आणि आफ्रिकी राष्ट्रे यांना स्वतःचे गुलाम बनवले, तसेच येथेही करील. पैशाच्या मोबदल्यात चीन त्यांना सुरक्षा मागून खनिज संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करील.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे