Menu Close

तथाकथित पुरोगाम्यांच्या फसवणुकीला बळी न पडता भक्तांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

पर्यावरणपूरक गणेशोत्सव – दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

धर्मशास्त्रानुसार कृती केल्यासच सण-उत्सवांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

पुणे – ‘श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन केल्याने प्रदूषण होते’, अशी आवई काही तथाकथित पुरोगामी सर्वत्र उठवत आहेत. अगदी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीही पाण्यात विसर्जन केल्याने प्रदूषण होत नाही’, हे विविध प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. असे असूनही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदातच करण्याचा आग्रह प्रशासन ठिकठिकाणी करत आहे. ‘नंतर याच मूर्ती प्रशासन नदीत विसर्जित करते’, असे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. आता तर ‘अमोनिअम बायकार्बोनेट’ या त्वचेला घातक असणार्‍या रसायनात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नव्हे, तर त्या विरघळवण्यास भाविकांना सांगितले जाते. या सर्व उठाठेवी करण्याऐवजी भाविकांना शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्तींचा आग्रह का धरला जात नाही ? शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्यास का देत नाहीत ? जनभावनांचा विचार करून धर्मशास्त्रानुसार विसर्जन करण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाने केली पाहिजे. कोणतीही प्रक्रिया न करता कोट्यवधी लिटर अतीदूषित सांडपाणी अनेक नद्यांमध्ये नगरपालिकांकडून सोडले जाते. प्रदूषणाच्या काळजीचा देखावा करणारे प्रशासन आणि तथाकथित पुरोगामी भाविकांची फसवणूक करत असून अशा कुठल्याही फसवणुकीला बळी न पडता गणेशभक्तांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतातील वहात्या पाण्यातच करावे आणि श्री गणेशाची कृपा संपादन करून घ्यावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव – दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विशेष ‘ऑनलाईन’ संवादात ते बोलत होते. या कार्यक्रमात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सर्वश्री मिलिंद धर्माधिकारी आणि वैभव आफळे यांनी केले. हा कार्यक्रम ३ सहस्र ७०० हून अधिक जणांनी पाहिला.

श्री. सुनील घनवट यांनी मांडलेली अन्य सूत्रे

श्री. सुनील घनवट

१. ‘श्री गणेशमूर्ती सिद्ध करतांना त्यामध्ये रोपांचे बी टाकून मूर्ती सिद्ध करणे आणि ती विसर्जित करणे’, असा अत्यंत अशास्त्रीय प्रकार काही संघटना राबवत आहेत. तो अयोग्य आहे. यामागे व्यावसायिक हेतू तर नाही ना, अशी शंका येते. श्री गणेशमूर्ती ही पृथ्वीतत्त्वाची आहे. त्यामुळे तिचे विसर्जन हे आपतत्त्वात, म्हणजेच पाण्यात होणेच योग्य आणि धर्मसंमत आहे अन् ते विधीवत् होणे आवश्यक आहे.

२. कागदी लगद्याच्या मूर्तींवर बंदी घाला ! : ‘कागदी लगद्याची मूर्ती म्हणजे ‘इको फ्रेंडली’ मूर्ती’ असा प्रचार शासन, प्रशासन, पुरो(अधो)गामी आणि बुद्धीवादी यांनी चालू केला आहे. यावर सांगली येथील पर्यावरणतज्ञ सुब्बाराव यांनी सांगितले की, कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे माशांच्या कल्ल्यांत कागद अडकतो आणि ते मरतात. पाण्यातील ऑक्सिजन अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात, तसेच पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते. त्यातून मिथेन नावाचे घातक रसायन निर्माण होते. ‘रसायन तंत्रज्ञान संस्था’ (आयसीटी) यांच्याकडे कागदी लगद्याच्या ४ मूर्ती दिल्या होत्या. त्याचे संशोधन केले होते. ‘१० किलोची कागदाची मूर्ती १००० लिटर पाणी प्रदूषित करते’, असे शास्त्रीय प्रयोगात सिद्ध झाले आहे. कागदी मूर्ती पर्यावरणास अत्यंत घातक असून त्यावर बंदी घातली गेली पाहिजे. अशांवर न्यायालयीन कारवाईही केली पाहिजे.

३. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष २०१० च्या काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या; पण त्या पाळल्या जात नाहीत. त्यात ‘कृत्रिम हौद निर्माण करतांना, नैसर्गिक स्रोत किंवा नदी यांचा काही भाग घेऊन त्याला जाळीदार कुंपण घालावे, त्यात श्री गणेशमूर्ती विसर्जित करावी, त्यानंतर त्या सर्व मूर्ती पुन्हा नदीमध्ये विधीवत् विसर्जित कराव्यात,’ असेही सांगितलेले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अशी माहिती मिळाली की, कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती किंवा संकलित केलेल्या मूर्ती पुन्हा नदीच्या पाण्यात विधीवत् विसर्जित केल्या जातात. असे आहे तर ‘मूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करा’, असा अट्टाहास का केला जातो ? कि केवळ हिंदु धर्माला विरोध म्हणून किंवा श्री गणेशाचा अपमान म्हणून अशा कृती केल्या जातात का ?

४. ‘श्री गणेशमूर्ती विसर्जित केल्याने पाण्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही’, हे अनेक वेळा प्रयोगातून सिद्ध करण्यात आले आहे. वर्ष २०१७-१८ चा लोकलेखा समितीचा अहवाल सांगतो, ‘महाराष्ट्रातील ३६ नगरपरिषदांमधील २०८.५१ दशलक्ष लिटर प्रदूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदीत सोडले जाते.’ असे असतांना केवळ ‘श्री गणेशमूर्ती विसर्जित केल्याने प्रदूषण होते’, हा अपप्रचार ढोंगीपणाने का केला जातो ?

५. ‘दान केलेल्या मूर्तींचे काय होते ?’ याचा शोध घेतल्यावर असे लक्षात आले की, त्या मूर्ती अल्प किमतीत विकल्या जातात. त्यावर रंगरंगोटी करून पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. यात पालिकेतील अधिकार्‍यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले दिसून येतात. याविषयीचे पुणे येथे गेल्या वर्षी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’ (गुप्त पद्धतीने केलेले ध्वनीचित्रीकरण) करून ते ध्वनीचित्रीकरण दाखवण्यात आले. काही ठिकाणी श्री गणेशमूर्ती खाणीत टाकल्या जातात किंवा खड्डे, विहिरी, तलाव बुजवण्यासाठीही उपयोगात आणल्या जातात.

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा प्रसार करणार्‍यांवर गुन्हे नोंद करण्यासाठी पुढाकार घ्या ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

१. कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा अत्यंत प्रदूषणकारी असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे आम्ही हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने ‘राष्ट्रीय हरित लवादा’कडे प्रविष्ट केलेल्या याचिकेमुळे कागदी लगद्यापासून श्री गणेशमूर्तीचा बनवण्याच्या शासन अध्यादेशावर वर्ष २०१६ मध्ये स्थगिती आली आहे. तरीही आज ‘इकोफ्रेंडली’च्या नावाखाली कागदी लगद्याच्या मूर्तींचा प्रसार सर्रासपणे केला जात आहे. याविरोधात गुन्हे नोंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

२. धर्मद्रोह्यांनी पुरो(अधो)गामी शासनाला ‘मूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यात नको. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नको’, असा अध्यादेश काढायला लावला. त्यात केवळ गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी या सण-उत्सवांच्या वेळी प्रदूषण होते, असा निष्कर्ष होता. बकरी ईदच्या वेळी लाखो बकर्‍यांची हत्या केली जाते. त्यांचे रक्त तसेच नदीत मिसळले जाते. तेव्हा पुरो(अधो) गामी शांत असतात.

३. विज्ञापनांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक देवता, संत आणि महापुरुष यांचा अवमान केला जातो. व्यावसायिक दृष्टीने त्यांचा उपयोग करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीने विडंबन करणार्‍या आस्थापनांना अधिवक्त्यांची एक नोटीस जरी गेली, तरी त्वरित विडंबन थांबू शकते. त्यांना विरोध आणि प्रतिवाद केला पाहिजे. हिंदूंनी जागृत होऊन धर्मप्रेमी अधिवक्त्यांचे मोठ्या प्रमाणावर संघटन करून धर्महानी थांबवली पाहिजे. अधिवक्त्यांनी समष्टी सेवा म्हणून धर्मद्रोही आणि पाखंडी लोकांचा प्रतिवाद केला पाहिजे.

४. अतीउत्साही प्रशासकीय अधिकारी त्या-त्या शहरांतील पुरो(अधो)गाम्यांच्या दबावातून हिंदूंच्या सण-उत्सवांवर विविध बंधने आणतात. कृत्रिम हौदात अशुद्ध आणि घाणेरडे पाणी सोडले जाते. काही ठिकाणी भूमीत खड्डा खणून हौद सिद्ध केला जातो. त्यात श्री गणेशमूर्तीचा विसर्जित केल्यानंतर तो खड्डा माती टाकून बुजवला जातो. अशी अपकृत्ये करणार्‍यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंद केले पाहिजेत.

पार्थिव सिद्धिविनायक व्रतानुसार शाडूमाती किंवा चिकणमाती यांची श्री गणेशमूर्ती आणा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

१. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची श्री गणेशमूर्ती ही धर्मशास्त्रसंमत नाही, तसेच त्यातून श्री गणेशाची पवित्रके येत नाहीत. त्यामुळे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची श्री गणेशमूर्ती घरी आणू नये. पंचगव्य, शेण आदी गोष्टींपासून सुद्धा श्री गणेशमूर्ती बनवू नये. पार्थिव सिद्धिविनायक व्रतानुसार शाडूमाती किंवा चिकणमाती यांची श्री गणेशमूर्ती आणावी.

२. ‘माती स्वत:च ‘इकोफ्रेंडली’ आहे’, हा भाग लक्षात घ्यायला हवा. कोरोनाच्या काळात शाडूची माती उपलब्ध न झाल्यास घराच्या अंगणातील चिकणमातीची ६ ते ७ इंचाची श्री गणेशमूर्तीही बनवू शकतो. माती उपलब्ध न झाल्यास प्राणप्रतिष्ठा विधी न करता श्री गणेशाच्या चित्राचे षोड्शोपचार पूजन करू शकतो.

३. सध्या कुंडीमध्ये ‘बी’ ठेवून श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा प्रचार पर्यावरणवाद्यांकडून केला जातो. ‘वृक्षारोपण करायला वर्षाचे ३६५ दिवस असतांना केवळ गणेशोत्सवात बीजाच्या रूपात श्री गणेशाला का पूजायचे ?’, हा आमचा पर्यावरणवाद्यांना प्रश्न आहे.

४. सध्याच्या कोरोनाच्या आपत्काळात सामूहिक सण आणि उत्सव साजरे करण्यावर बंधने आहेत. सरकारने सांगितलेले नियम आणि उपाययोजना यांचे पालन करणे हेही आपद् धर्मपालनच आहे. आपद् धर्म आणि धर्मशास्त्र यांची योग्य सांगड घालत देखावे आणि रोषणाई न करता पार्थिव सिद्धिविनायकाचे व्रत अन् घरोघरी श्री गणपतीचे पूजन करू शकतो.

५. बाजारातील मूर्ती कोरोनामुक्त हवी असेल, तर आदल्या दिवशी आणावी आणि घरातील सात्त्विक ठिकाणी अलगीकरणात ठेवावी. हे सोपे सूत्र असतांना ‘ती मूर्ती ‘सॅनिटाईज’ करा’, असे सांगणे यात व्यावसायिक दृष्टीकोन असू शकतो. त्यात आर्थिक संबंध गुंतलेले असतात. श्री गणेशमूर्ती म्हणजे गणपतीचे साक्षात् रूपच असते. सॅनिटायझरमधील रासायनिक द्रव्यांनी मूर्तीचे रंग पालटू शकतात. त्यामुळे देवतेतील तत्त्वांची आध्यात्मिक हानी होऊ शकते.

सनातन संस्थेचे ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे ‘ॲप डाऊनलोड’ करा ! – चेतन राजहंस यांचे आवाहन

सध्याच्या काळात ‘ऑनलाईन’ पूजा हा पर्याय असू शकतो. कर्मकांडात मंत्रांच्या उच्चाराला आणि पूजकाच्या भक्तीभावाला महत्त्व असते. पूजा शास्त्रीय पद्धतीनेही होऊ शकते. यासाठी सनातन संस्थेने ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे भ्रमणभाषवरील ‘ॲप’ उपलब्ध केले असून ते विनामूल्य ‘डाऊनलोड’ करता येते. त्यानुसार आपण घरच्या घरीही विधीवत् पूजा करू शकतो.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *