Menu Close

भगवद्गीता आणि आनंद !

भारतीय समाजाच्या उत्कर्षासाठी श्रीमद्भगवद्गीता शाळांमधून शिकवणे आवश्यक !

टोकियो येथे चालू असलेल्या ‘पॅरा ऑलिंपिक’मध्ये (विकलांगांसाठीच्या ऑलिंपिकमध्ये) भारतीय खेळाडू शरद कुमार यांनी उंच उडीत कांस्य पदक पटकावले. स्वतःच्या व्यंगावर मात करत जागतिक स्तरावर अशी कामगिरी करणे, हे कौतुकास्पद आहे. यात महत्त्वाचे सूत्र म्हणजे शरद कुमार यांनी ज्या परिस्थितीत ते मिळवले, त्याला विशेष महत्त्व आहे. अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी शरद कुमार यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे ते स्पर्धेतून माघार घेण्याच्या विचारात होते. त्या रात्री त्यांनी वडिलांना संपर्क केला. त्यांच्या वडिलांनी त्यांना ‘श्रीमद्भगवद्गीता’ वाचण्याचा सल्ला दिला. भगवद्गीता वाचल्यावर ते उत्साहित झाले आणि दुखापत विसरून पटांगणात उतरले. पुढे जे घडले, तो इतिहास आहे. धर्मनिरपेक्ष भारतातील बहुतांश हिंदु खेळाडू हे विजयी झाल्यावर त्यांच्या यशाचे श्रेय पालक किंवा त्यांचे प्रशिक्षक यांना देतात. ‘देवामुळे यश मिळाले’, हे त्यांच्या गावीही नसते आणि अशा गोष्टींना ते महत्त्वही देत नाहीत. याउलट शरद कुमार यांनी मोकळेपणाने त्यांना आलेली अनुभूती कृतज्ञतापूर्वक सांगितली आणि त्यांच्या यशाचे श्रेय श्रीमद्भगवद्गीतेला दिले. हिंदूंच्या धर्मग्रंथांना ‘बुरसटलेले’ म्हणणार्‍यांना ही चपराक म्हणावी लागेल.

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जगण्याचा मंत्र आहे, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली त्यात सांगितली आहे. दुःखी, कष्टी आणि भरकटलेल्या लोकांसाठी श्रीमद्भगवद्गीता उपयुक्त आहेच; मात्र त्याही पुढे जाऊन सर्वसामान्य व्यक्तीसाठीही ती मार्गदर्शकाचे कार्य करते. आताचा समाज साधना करत नाही. त्यामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी व्यक्ती तिच्या परीने प्रयत्न करते; मात्र तिला यश मिळत नाही. या यश-अपयशाच्या पलीकडे समस्येकडे पहाण्याचा दृष्टीकोन, त्यावर मात कशी करायची किंवा स्थिती बिकट असेल, तर ती स्वीकारून तिला सामोरे कसे जायचे, याचे विश्लेषण भगवद्गीतेमध्ये आहे. ‘हा ग्रंथ किती हिंदूंनी वाचला ?’ किंवा ‘किती हिंदू त्यानुसार आचरण करतात ?’ हा संशोधनाचा विषय ठरू शकेल. ख्रिस्त्यांना बायबलविषयी आणि मुसलमानांना कुराणविषयी माहिती असते; कारण त्यांनी ते वाचलेले असते. हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथाविषयी ठाऊक नसते; कारण त्यांनी त्याचे वाचनच केलेले नसते. ‘ते कसे वाचायचे ?’ ‘त्यातील अध्यायांचा भावार्थ काय ?’ हे हिंदूंना कुणी शिकवलेले नसते. स्वतःच्या धर्मानुसार आचरण न केल्यामुळे हिंदूंची दुःस्थिती झाली आहे. शरद कुमार यांच्या अनुभूतीतून श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व अधोरेखित होते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने शाळांमधून श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतला पाहिजे. या निर्णयाला नेहमीप्रमाणे निधर्मी आणि हिंदुद्वेषी मंडळी विरोध करतील; मात्र हा विरोध मोडून काढत केंद्र सरकारने या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे. समाजाच्या हितासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *